इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूंवर तिथल्या प्रशासनाकडून अत्याचार सुरूच आहेत. यासंदर्भात आता नव्याने उजेडात आलेल्या घटनेनुसार सिंध प्रांतात राहणार्या 190 हिंदूंना पाकिस्तानी अधिकार्यांनी भारतात जाण्यापासून रोखले आहे. हे लोक कथितरीत्या भारताला भेट देण्याच्या उद्देशाबाबत समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत, असे कारण पाकिस्तानी अधिकार्यांनी यासाठी पुढे केले आहे.
सिंधच्या अनेक भागांतून मुले आणि महिलांसह विविध हिंदू कुटुंबे मंगळवारी वाघा सीमेवर पोहोचली. त्यांच्याकडे व्हिसा होता आणि त्यांना तीर्थयात्रेसाठी भारतात जायचे होते. तथापि, भारतात का जायचे आहे याचे योग्य कारण सांगता न आल्याने पाकिस्तानच्या इमिग्रेशन अधिकार्यांनी त्यांना तिथेच रोखले. अधिकार्यांचे म्हणणे असे की, हिंदू कुटुंबे अनेकदा धार्मिक यात्रेच्या नावाखाली व्हिसा घेतात आणि नंतर दीर्घकाळ भारतात राहतात.
'सेंटर फॉर पीस अँड जस्टिस पाकिस्तान'च्या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू समुदायाची लोकसंख्या 22,10,566 असून, ती तेथील एकूण नोंदणीकृत लोकसंख्येच्या 1.18 टक्का आहे.