Latest

हार्दिक पंड्या अहमदाबादचा कर्णधार; राशिद खान, गिल यांनाही निवडले

Arun Patil

नवी दिल्‍ली : फिटनेसच्या समस्येला तोंड देणाऱ्या हार्दिक पंड्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामात नव्याने दाखल झालेल्या दोन संघापैकी अहमदाबाद संघाने २०२२ साठी हार्दिकला कर्णधार पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, स्टार क्रिकेटर हार्दिक पंड्या ला मुंबई इंडियन्सने पुढच्या सीझनसाठी रिटेन केलेले नाही.

२०१९ च्या वर्ल्डकपपासून हार्दिक फिट नाही. त्याच्या पाठीवर सर्जरी देखील करण्यात आली होती. पण तरी देखील हार्दिक गोलंदाजी करू शकला नाही. आयपीएलच्या गेल्या हंगामात देखील हार्दिकने गोलंदाजी केली नाही. त्यानंतर झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये देखील सुरुवातीच्या काही सामन्यात तो गोलंदाजी करू शकला नाही. त्याच्या खराब फार्मने असताना त्याला मुंबई इंडियन्सने देखील रिटेन न करण्याचा निर्णय घेतला होता.

आयपीएल-२०२२ मेगा लिलावापूर्वी हार्दिक पंड्या, राशिद खान आणि शुबमन गिल अहमदाबाद फ्रँचायजीचा भाग असणार आहेत. अहमदाबाद हा आयपीएलचा नवा संघ आहे. या संघाला मेगा लिलावापूर्वी महालिलावातील तीन खेळाडूंना निवडण्याचा अधिकार आहे. या अंतर्गत त्यांनी हार्दिक, राशिद आणि शुभमन यांची निवड केली आहे. अहमदाबाद फ्रँचायजीने आपल्या कोचिंग स्टाफचीही निवड केली आहे.

हार्दिक पंड्यासह अहमदाबादच्या या आयपीएल टीममध्ये अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान सुद्धा सामिल झाल्याचे वृत्त आहे. आयपीएलच्या यापूर्वीच्या सीझनमध्ये राशिद हैदराबाद संघात होता. यावेळी तो स्वतः हैदराबाद संघातून बाहेर पडला होता.

आशिष नेहरा आणि गॅरी कर्स्टन यांना संघाने सोबत घेतले आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा माजी फलंदाज विक्रम सोलंकीला संघ संचालक बनविण्यात आले आहे. अहमदाबाद फ्रँचायजीची मालकी सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सकडे आहे. एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, अहमदाबाद आणि लखनौ या दोन नवीन संघांना २२ जानेवारीपर्यंत त्यांच्या तीन निवडलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करायची आहेत.

अहमदाबादने हार्दिक आणि राशिदला प्रत्येकी 15 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे शुभमन गिलला 7 कोटी रुपये मिळणार आहेत. हार्दिक पंड्या संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे.

आयपीएलमध्ये या वर्षापासून ८ ऐवजी १० संघ असणार आहेत. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने प्रत्येक संघाल चार खेळाडू रिटेन करण्यास सांगितले होते. तर नव्या लखनऊ आणि अहमदाबाद संघाला या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काही खेळाडूंची यादी द्यायची आहे. आयपीएलचा मेगा लिलाव ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी चेन्नईत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT