Latest

‘हायवे हिप्नॉसिस’ यामुळे होतात महामार्गांवर भीषण अपघात!

Arun Patil

सांगली ; गणेश कांबळे : महामार्गांवर सलग बरेच तास वाहन चालवल्याने चालकाची स्थिती यंत्रवत होते. परिणामी, त्याची तंद्री लागते, डोळे, संपूर्ण शरीर थकते आणि अचानक वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडतात, असे अपघात मुख्यतः मध्यरात्री आणि पहाटे होत असतात. वाहनचालकाच्या ज्या मनोवस्थेमुळे असे अपघात घडतात ते 'हायवे हिप्नॉसिस' मुळे होत असतात, असा निष्कर्ष अलीकडे झालेल्या संशोधनात काढण्यात आला आहे.

मोटारीचा चालक गाडी चालवत असतो, गिअर बदलणे-टर्न घेणे-हॉर्न वाजविणे हे सर्व काही यंत्रवत सुरू असते; पण चालकाची भलत्याच विचारात तंद्री लागलेली असते. गाडी एका मार्गावर आणि चालकाचे विचारचक्र भलत्याच मार्गावर धावत असते. ब्लॅक स्पॉट, तीव्र वळणे आणि डोंगरांवरील चढ-उतारावर 'हायवे हिप्नॉसिस' या मनोवस्थेत बहुतांश भीषण अपघात होतात, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.

'हायवे हिप्नॉसिस' हा नवीन शब्द असला, तरी 1920 मध्ये जी. डब्ल्यू. विल्यम्स या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा ही संकल्पना जगापुढे आणली. 'हायवे हिप्नॉसिस' हे नाव त्यांनीच पहिल्यांदा दिले. 'हायवे हिप्नॉसिस' अवस्थेत चालक हा डोळे उघडे ठेवून अर्धवट झोपलेला आणि अर्धवट जागा असतो.

'हायवे हिप्नॉसिस'ची कारणे

आजकाल रस्त्यांमध्ये प्रगती झालेली आहे. डोंगर फोडून, दर्‍यांतून मार्ग काढून हजारो किलोमीटरचे सरळ रस्ते बनविण्यात आले आहेत. नदीवर पूल उभारून हायवे झालेले आहेत. काही ठिकाणी सिमेंटचे रस्ते आहेत. एक चकाकीपणा रस्त्यांवर आलेला आहे. त्यामुळे वाहने 'सुसाट' झालेली आहेत. हायवेवर वाहनांचा वेग प्रतितास 100 कि.मी.च्या पुढे असतो. चालकांना 'आराम' वाटावा म्हणून वाहनांमध्येच सर्व सुखसोयी निर्माण केलेल्या आहेत.

यामध्ये आरामशीर सीट, गाडीमध्ये झोपता येईल अशी सीटची रचना, कोणत्याही ऋतूशी 'अ‍ॅडजेस्ट' करणारे एसी, त्यातून मिळणारा 'गारवा', मनाला आवडेल ते लावता येईल असे संगीत आणि वाढलेले 'नाईट ड्रायव्हिंग', सलग 250 किलोमीटर असे एकसारखे ड्रायव्हिंग, या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून चालक हा 'स्वसंमोहित' अवस्थेत सहज जाऊ शकतो. सुसाट वेगात असताना अचानक संमोहनाची 'तंद्री' लागून काही समजायच्या आत मोठा अपघात होऊ शकतो. बहुसंख्य अपघात हे अशा 'हायवे हिप्नॉसिस'मुळे घडत असतात, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.

'हायवे हिप्नॉसिस'बाबत 'एनएचएआय'चा इशारा

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण (एचएचएआय) ही देशातील बहुसंख्य महामार्गांची देखभाल करीत आहे. त्यांनी पश्चिम बंगालमधील बराकपूर ते डकुनी यादरम्यान असणार्‍या एनएच 2 या महामार्गाचा अभ्यास केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, 60 टक्के दुर्घटना या 'हायवे हिप्नॉसिस'मुळे होत आहेत. महाराष्ट्रात पुणे ते कागल या महामार्गाचा सर्व्हे करण्यात आला आहे. 'सेव्ह द लाईफ' ही संस्था याबाबत काम करीत आहे. अन्य कारणांबरोबरच चालकाची तंद्री लागणे हेही कारण आता पुढे आले आहे. त्यामुळे चालकांना जागरूकतेचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत असतात.

गाडी चालवता आपण ऑटोमोडवर असतो

संमोहन आणि सजगता याबाबत 'माईंडफूलनेस' हे शास्त्र निर्माण झालेले आहे. या शास्त्रानुसार, आपण कोणतीही शारीरिक कृती करीत नसताना आपल्या मेंदूमध्ये विचारांची साखळी सक्रिय असते. त्यासाठी मेंदू ऊर्जा वापरत असतो. त्यामुळे आपण लगेच थकतो. त्याला डिफॉल्ट मोड नेटवर्क असे म्हणतात. याद्वारे आपल्या मनात एकच विचार सारखासारखा येत असतो. विचारांचे चक्र सुरू असते आणि आपण वाहन चालवत असताना विचारांच्या अनेक फाईल्स ओपन राहिल्या, तर मेंदू अचानक 'हँग' होतो आणि आपली तंद्री लागून अपघात होण्याची शक्यता असते.

कसे टाळाल 'हायवे हिप्नॉसिस'?

सलग अडीच तासांहून अधिक काळ वाहन चालवणे थांबवा. कारमधील एसीच्या तीव्रतेत सतत बदल करीत राहावा. एकच प्रकारचे म्युुझिक ऐकणे टाळावे. थकवा आल्यास गाडी थांबवून झोप काढलेली बरी. दर तासाला गाडी थांबवून तोंड धुणे, पेय घेणे. मोबाईलवर पाहत, हेडफोन लावून गाडी चालवणे टाळावे.

महामार्गांवरील पांढर्‍या पट्ट्यांमुळेही व्यक्ती संमोहित

दुसर्‍या महायुद्धात जेवढे लोक मरण पावले नाहीत, तेवढे रस्त्यांवरील अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. 'हायवे हिप्नॉसिस'मुळे सर्वाधिक अपघात हे रात्री 12 ते पहाटे 3 पर्यंत होत असतात. त्यात रस्त्यावर जे ठराविक अंतरावर शेकडो किलोमीटरवर असणार्‍या पांढर्‍या पट्ट्यांमुळेदेखील वाहनचालकाला संमोहनात तंद्री लागून अपघात होऊ शकतो. त्यामुळे पांढरे पट्टे काढून टाकण्याची मागणी अनेक मानसशास्त्रज्ञांनी केली होती.

जैविक घड्याळ आणि 'मेलॅटोनिन'

आपल्या शरीराचे चलनवलन व्यवस्थित होण्यासाठी निसर्गाने मानवी शरीरात जैविक घड्याळ (बॉडी क्लॉक) फिट केलेले आहे. त्यानुसार दिवस हा काम करण्यासाठी आणि रात्र ही विश्रांतीसाठी असते. शरीराचे घड्याळाचे नियंत्रण हे मेंदूमधील हायपोथॅलामस (मास्टर पिट्यूटरी) या अंतस्रावी ग्रंथीकडे असते. आपल्या शरीरात रात्री 9 नंतर मेलॅटोनिन हे झोपेचे हार्मोन सक्रिय व्हायला सुरुवात होते. मध्यरात्री 1 ते 3 या वेळेत हे हार्मोन सर्वोच्च बिंदूवर असते. शरीराचे तपमान कमी व्हायला लागते आणि काम थांबव आणि झोप, अशा सूचना मेंदूकडून येऊ लागतात. तरीही आपण काम सुरू ठेवले की, अपघात घडण्याची शक्यता जास्त असते. याचा प्रत्यय म्हणून बहुसंख्य भीषण अपघात हे पहाटेच झाल्याचे दिसून येतात.

रस्ते अपघात, 'ब्लॅक स्पॉटस्' आणि मृत्यू

महाराष्ट्रात 2019 या वर्षात महामार्गांवर एकूण 32,925 अपघात झाले. त्यामध्ये 12,788 लोकांचा मृत्यू झाला. 2020 या वर्षात महामार्गांवर एकूण 24,971 अपघात झाले, त्यापैकी 11,569 लोकांचा मृत्यू झाला. 2021 या वर्षात महामार्गावर एकूण 29,494 अपघात झाले, त्यापैकी 13,528 लोकांचा मृत्यू झाला. राज्यात महामार्गांवर सुमारे 1,377 ब्लॅक स्पॉटस् आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नाशिक ग्रामीणमध्ये 98 ब्लॅक स्पॉटस् आहेत तसेच सातार्‍यात 85 ब्लॅक स्पॉटस् आहेत, तर औरंगाबाद शहरात 83 ब्लॅक स्पॉटस् आहेत. या ठिकाणी बहुसंख्य अपघात होत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT