पुणे; पुढारी वृत्तसेवा : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची 100 कोटींपेक्षा अधिक संपत्ती बेनामी असून, त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली आहे. हसन मुश्रीफ यांची बेनामी संपत्ती जप्त करा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली.
ठाकरे, पवार कारवाई करणार नाहीत. ते स्वतःच घोटाळेबाज आहेत. त्यामुळे एक घोटाळेबाज दुसर्या घोटाळेबाजाला मदत करत असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला. पुण्यात प्राप्तिकर सदनमध्ये शुक्रवारी (दि.1) दुपारी सोमय्या आले होते. मुश्रीफ यांच्या विरोधात प्राप्तिकर विभागाकडे केलेल्या तक्रारीचे काय झाले, याची विचारणा करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकार्यांची भेट घेतल्यानंतर सोमय्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला.
सोमय्या म्हणाले, हे पैसे कुठून आले याची चौकशी झाली पाहिजे. हा भ—ष्टाचाराचा पैसा आहे. त्यांची पवार, ठाकरे यांनी का चौकशी केली नाही? केंद्र सरकारच्या कंपनी मंत्रालयाने अधिकृत फौजदारी प्रक्रियेची याचिका दाखल केली आहे. एक एक मंत्री घोटाळ्यात सापडत आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. अनिल देशमुख, अनिल परब, हसन मुश्रीफ, संजय राऊत व अजित पवार ही सगळीच नावे घोटाळ्यातील आहेत. हे घोटाळे सिद्ध होत आहेत. तरीही मुख्यमंत्री म्हणून ठाकरे काहीही कारवाई करायला तयार नाहीत. त्यांनी आता बोलणे बंद करून कारवाई करायला हवी.
हा सर्व काळा पैसा कोणत्या माध्यमातून गोळा केला गेला, याची चौकशी करावी. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले.
जरंडेश्वर कारखान्याबाबतही पाठपुरावा करणार
उपमुख्यमंत्री अजित पवार जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांमध्ये भ—म पसरवत आहेत. कारवाई झाली, तर कारखाना बंद पडणार नाही, तो सुरूच राहणार आहे. हा कारखाना पवार यांचा कधी नव्हताच. तो त्यांनी गैरपणे विकत घेतला. गुरू कमोडिटी ही कंपनी त्यांच्याच माणसांची आहे. याही तक्रारीचा आम्ही कायम पाठपुरावा करणार आहोत, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे दोन कार्यकर्ते ताब्यात
हातात राष्ट्रवादीचे झेंडे घेतलेल्या दोन कार्यकर्त्यांनी प्राप्तिकर भवनच्या प्रवेशद्वारासमोर 'किरीट सोमय्या हाय हाय' अशा घोषणा दिल्या. भाजपचे कार्यकर्तेही उपस्थित असल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र अर्जुन गांजे आणि दिनेश खराडे या घोषणा देणार्या दोन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावर सोमय्या म्हणाले, पोलिसांनी पवार यांच्या माणसांना मला भेटू द्यायला हवे होते. घोटाळा कसा झाला हे मी त्यांना सांगितले असते.
ईडी चौकशीला सामोरे जाऊन सहकार्य करू ः हसन मुश्रीफ
कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या सात महिन्यांपासून किरीट सोमय्या यांचे माझ्या विरोधात पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीच त्यांनी ईडीमार्फत चौकशी होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे ईडी चौकशीला आपण सामोरे जाऊन योग्य ते सहकार्य करू, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यातील घोटाळ्यासंदर्भात कारवाईच्या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या शुक्रवारी पुणे येथील आयकर खात्यात गेले होते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने त्यांच्याविरोधात पुणे न्यायालयात याचिका दाखल केल्याचेही सोमय्या यांनी नुकतेच ट्विट करून सांगितले. या पार्श्वभूमीवर विचारता मुश्रीफ बोलत होते.