धुवाँधार पावसाने महाबळेश्वर - पाचगणी रस्त्यावर पाणी आल्याने या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली. (छाया : प्रेषित गांधी)  
Latest

हवामान रेड ॲलर्ट : कोल्हापूर, कोकणात पुढील आठवड्यातही मुसळधार

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा : हवामान रेड ॲलर्ट देण्यात आला असून कोल्हापूर, कोकणात पुढील आठवड्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वार्‍यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी आठवड्यात पाऊस अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा अजूनही असल्याने कोकण व मध्य महाराष्ट्रात तुफान पाऊस सुरूच आहे. गुरुवार आणि शुक्रवारी कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यांत 'रेड अ‍ॅलर्ट' व पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत 'ऑरेंज अ‍ॅलर्ट' देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र नव्याने निर्माण झाले असून, मान्सून आता कमी दाब निर्माण झालेल्या भागाकडे वेगाने सरकत आहे. यात आंध— प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, पूर्व-मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातील कोकण व विदर्भात जोर वाढणार आहे. अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पाऊस वाढण्याचे संकेत आहेत.

मंगळवारी राज्यात झालेला पाऊस (मि.मी.मध्ये)

कोकण : पालघर : जव्हार 117, विक्रमगड 130, वाडा 114. रायगड : माथेरान 114. रत्नागिरी : चिपळूण 104, जयगड 145, राजापूर 135, रत्नागिरी 112, संगमेश्वर 157. सिंधुदुर्ग : वैभववाडी 157. ठाणे : ठाणे 106.
मध्य महाराष्ट्र : कोल्हापूर : गगनबावडा 149, पन्हाळा 50, राधानगरी 68, शाहूवाडी 61. नाशिक : हर्सूल 75, इगतपुरी 95, सुरगाणा 62. सातारा : महाबळेश्वर 164.

सिंधुदुर्गात पावसाचा जोर !

हवामान खात्याने पुढील पाच दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला असून सिंधुदुर्गासह पाच जिल्ह्यांत ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी दिवसभर धुवाँधार पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले असून अनेक भागात अद्यापही शेती पाण्याखाली आहे.

देवगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे कोर्ले बाणेवाडी येथील मातीचे घर खाली असलेल्या दुसर्‍या घरावर कोसळल्याने दोन्ही घरांचे सुमारे 6 लाखांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने त्या घराचे मालक बालंबाल बचावले.अतिवृष्टीने व सोसाट्याच्या वार्‍याने नाद येथील तिघांच्या घराच्या छप्पराचे पत्रे व कौले उडून नुकसान झाले.

गेले आठवडाभर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. मध्ये दोन दिवस पाऊस काहीसा कमी झाला होता. मात्र, बुधवारपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. गेले पंधरा दिवस झालेल्या धुवाँधार पावसामुळे भात लावणीची कामे आता पूर्ण झाली आहेत. काही भागात भातशेती पाण्याखाली गेली होती.

पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास हीच स्थिती पुन्हा उद्भवण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. बुधवारी झालेल्या धुवाँधार पावसामुळे काही भागात रस्ते पाण्याखाली गेले होते. तर सखल भागातील शेतीतही पाणी घुसले आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT