कोरोना काळात मंदावलेला हवाई प्रवास दररोज उड्डाणांची संख्या वाढवत असताना प्रवाशांच्या गैरवर्तनांच्या घटनांवरून विमानवाहतूक वादात सापडली आहे. मारहाण करणे, लघुशंका करणे, विमान कर्मचार्यांशी हुज्जत घालणे, मद्यपान करून गोंधळ घालणे, हवाई सुंदरींशी असभ्य वर्तन करणे अशा प्रकारच्या वाढत्या घटना पाहता केंद्र सरकारने कडक कायदे करण्याची गरज आहे.
काही दशकांपूर्वी सामान्य नागरिकांसाठी हवाई प्रवास हा दुर्मीळच नव्हता, तर तो त्याचा स्वप्नातही विचार करू शकत नव्हता. विमानातून आपण वाजवी दरात देश-विदेशात प्रवास करू, असे कधीही त्याला वाटले नाही; पण कर्नाटकचे माजी सैनिक कॅप्टन जीआरए गोपीनाथ यांनी स्वस्त विमान प्रवासाचे स्वप्न डेक्कन एअरवेजच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणले. त्यानंतर विमान प्रवासाला एकप्रकारे बूस्ट मिळाला. आता सरकार परदेशाप्रमाणेच मोठ्या संख्येत जिल्ह्याच्या ठिकाणी लहान विमानतळ उभे करत आहे. जुन्या धावपट्टीत डागडुजी करून हवाई प्रवासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हवाई प्रवासातील वाढत्या गैरवर्तनाने आणि बेशिस्तपणाच्या घटनांवरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. या घटना पाहता हवाई प्रवास करणार्यांची संख्या वाढत असली तरी आजही अनेक प्रवाशांचेे विचार मात्र संकुचितच आहेत, हे दिसून येते. हवाई प्रवासाच्या काळात सहकारी प्रवाशांशी केले जाणारे गैरवर्तन लज्जास्पद आहे. अलीकडेच एका विमान कंपनीच्या बिझनेस क्लासमध्ये मद्यपी प्रवाशाने ज्येष्ठ महिलेवर लघुशंका केली. अर्थात, हे पहिले प्रकरण नव्हते. यापूर्वीदेखील अशा घटना घडल्या आहेत. केबिनमध्ये अश्लील चाळे करणे किंवा अश्लील खाणाखुणा करणे, मारहाण करणे या घटना सर्रास घडलेल्या आहेत.
मागच्या आठवड्यात घडलेले प्रकरण हे वेगळे आहे. कारण, विमान कर्मचार्याने पीडित महिलेला एका कोपर्यात बसविले; परंतु आरोपीला कोणताही जाब न विचारता सोडून दिलेे. जेव्हा पीडित महिलेने विमान कंपनीच्या सीईओला मेल केला, तेव्हा हे प्रकरण चव्हाट्यावर आले. आता आरोपीला अटक झाली असून, त्याला महिनाभरासाठी 'नो फ्लाय' लिस्टमध्ये टाकले आहे. केबिनमध्ये अशा प्रकारचा असभ्य प्रकार केवळ भारतीयाने केलेला नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारीत कॅलिफोर्नियात एका प्रवाशाने साऊथ वेस्ट एअरलाईन्सच्या एका विमानात केबिनमध्ये फ्लोअरवर लघुशंका केली आणि फ्लाईट अटेंडंटला शिवीगाळही केली. या प्रवाशावर फेडरल कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले. त्यानुसार त्याला वीस वर्षांचा तुरुंगावास देखील होऊ शकतो.
गतवर्षी जून महिन्यात आणखी एका परकीय प्रवाशाने मद्यपान करून गोंधळ घातला. त्याने विमानात आपल्या भावावरच लघुशंका केली. या कारणाने लंडनहून क्रेटेला जाणारे विमान कोर्फूमध्येच उतरविण्यात आले. आरोपीला ग्रीक पोलिसांच्या हवाली केले. भारतातदेखील एप्रिल 2021 मध्ये बंगळूरहून नवी दिल्लीकडे जाणार्या विमानात मद्यपान केलेल्या एका प्रवाशाने आपले कपडे काढले. त्यामुळे त्या प्रवाशाला दिल्ली पोलिसांच्या हवाली केले. दिल्लीहून पाटण्याकडे जाणार्या एका विमानात एका प्रवाशाने हवाई सुंदरीशी गैरवर्तन केले. हा प्रकार अलीकडेच घडला आहे. याप्रकरणी दोन प्रवाशांना ताब्यात घेतले, तर तिसर्या मद्यपी प्रवाशाने धूम ठोकली. अशा वर्तनामुळे केवळ हवाई प्रवासाची व्यवस्था अडचणीत येत नाही, तर प्रवाशांच्या मनातदेखील कडक कायदे करायला हवेत, अशी भावना निर्माण झाली आहे.
नागरी उड्डाण मंत्रालयाने 2017 मध्ये केलेल्या एका घोषणेनुसार, विमान प्रवासातील नियमांचा भंग करणे किंवा कामात अडथळा आणणे हा दंडनीय गुन्हा असल्याचे म्हटले होते. प्रवाशांच्या अशा वर्तनामुळे विमानातील सुरक्षाही धोक्यात येऊ शकते. अशावेळी आरोपी प्रवाशासंदर्भात पायलट इन कमांडकडे तक्रार करायला हवी. नुकत्याच घडलेल्या लघुशंकाप्रकरणी विमान कंपनीने अंतर्गत चौकशी समिती नेमली असून, या समितीला महिनाभरात निर्णय घ्यावा लागेल. त्याचवेळी संबंधित प्रवाशावर किती दिवसांसाठी बंदी घालायला हवी, हेदेखील पाहावे लागेल. नियमानुसार एअरलाईन्स कंपनी आरोपीवर निर्बंध आणू शकते.
एखादा प्रवासी पुन्हा गुन्हा करत असेल तर त्याला गेल्यावेळी दिलेल्या शिक्षेच्या तुलनेत नवीन शिक्षा अधिक कडक असेल आणि त्याचे प्रमाण दुप्पट राहील. डीजीसीए कायद्यानुसार, प्रवाशांचे अनियंत्रित व्यवहार हे तीन प्रकारचे असतात. पहिले म्हणजे प्रवाशाने तोंडी स्वरूपात कायदा मोडला असेल तर यात तीन महिन्यांची शिक्षा असते. दुसरे म्हणजे शारीरिक रूपाने नियमांचा भंग केला असेल तर त्यास सहा महिन्यापंर्यंत निर्बंध लादू शकतात. तिसरे म्हणजे प्रवाशाचे वर्तन हे एखाद्याचे आयुष्य धोक्यात आणणारे असेल तर अशा प्रकरणात किमान दोन वर्षांची बंदी घालण्याची तरतूद आहे. प्रवाशाचे वर्तन राष्ट्रीय सुरक्षेला हानिकारक असेल तर आणखी कडक कारवाई होऊ शकते. हवाई प्रवास नियम 1937 च्या 22 कलमानुसार विमान कर्मचार्याला धमकावणारा व्यक्ती हा आगामी काळात विमानात बसू शकणार नाही. कामात ढवळाढवळ करणे नियमबाह्य असल्याचे नियमात नमूद केलेे आहे. कधीकाळी हवाई प्रवास हा शिस्तबद्ध प्रवासासाठी ओळखला जायचा.
विमानात प्रवेश करताच कर्मचार्यांकडून प्रेमपूर्वक स्वागत केले जाते आणि प्रवाशांना मदत केली जाते. या आधारे प्रवाशाच्या मनात उच्च स्थान मिळाल्याची भावना निर्माण होते. आता प्रवाशांना दारू देणे किंवा विमानातील हवाई सुंदरीशी असभ्य वर्तन करणे सर्वसामान्य बाब ठरत आहे. त्यावर अंकुश बसविणे गरजेचे आहे. प्रवाशांनी विमान प्रवासात कोणाशीही गैरवर्तन करू नये यासाठी ठोस व्यवस्था करायला हवी. काही नवीन कायदे तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. देशाची मान झुकविणार्या घटनेप्रकरणी आरोपीला केवळ महिनाभरासाठी शिक्षा देऊन भागणार नाही. ते पुन्हा अशा प्रकरचे कृत्य करू शकतात. अशा प्रकारचे कृत्य हे गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवून किमान पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा मिळावी, अशी व्यवस्था कराया हवी. कायदे कडक केल्यास भविष्यात कोणीही अशा प्रकारचे धाडस दाखविणार नाही. हवाई प्रवास असो, रेल्वेे प्रवास असो किंवा बस प्रवास. कोणालाही सहप्रवाशांशी गैरवर्तन करण्याचा अधिकार नाही.
– सुचित्रा दिवाकर