Latest

स्वार्थीजनांचे ‘विश्‍व’

backup backup

देशप्रेमाचा ठेका फक्‍त सामान्य माणसांनी घेतलेला असतो. मुळात तेच देशावर प्रेम करीत असतात आणि देशाचा अभिमानही बाळगत असतात. याच मातीत राबून याच मातीत मिसळून जाणे हे त्यांचे प्राक्‍तन असते. अहोरात्र कष्ट करून दोन वेळा हाता-तोंडाची कशीतरी गाठ पडणार्‍या अशा लोकांनाच देशप्रेमाचे धडे दिले जात असतात. याउलट श्रीमंतांसाठी सार्‍या जगाचे नागरिकत्व खुले असल्यासारखी स्थिती अवतीभवती दिसून येते. 'हे विश्‍वचि माझे घर' ही संकल्पना वेगळ्या संदर्भाने वापरली जाते; परंतु आजच्या काळात ती फक्‍त श्रीमंतांनाच आपलीशी वाटणारी आहे. जसजशी श्रीमंती वाढत जाते, तसतसे त्यांना 'विश्‍व' खुणावायला लागते. मग, त्यांना देशातील कायदे जाचक वाटायला लागतात. देशातील सुविधा अपुर्‍या वाटायला लागतात किंवा देशातील जीवनशैलीमध्ये आधुनिकतेचा अभाव जाणवायला लागतो. ही माणसे सहजपणे देश सोडून जातात.

परक्या देशाचे नागरिकत्व स्वीकारून आपल्या देशाशी असलेले नाते तोडून टाकतात. एकशे चाळीस कोटींच्या देशात देश सोडणार्‍या लोकांची संख्या तुलनेने नगण्य असली, तरीसुद्धा दररोज सुमारे साडेचारशे लोक देशाचे नागरिकत्व सोडून अन्य देशांमध्ये स्थायिक होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी कुणा सामाजिक संस्थेने सांगितलेली किंवा सांगोवांगीची नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत देण्यात आलेली ही माहिती आहे. तिच्या अधिकृतपणाविषयी शंका घेण्यास जागा नाही. 2020 मध्ये 85 हजार 256 लोकांनी देश सोडला, तर 2021 मध्ये हा आकडा वाढून एक लाख 63 हजार 370 वर पोहोचला. त्याही आधी 2019 मध्ये एक लाख 44 हजार लोकांनी देश सोडून अन्य देशांचे नागरिकत्व स्वीकारले. स्थलांतर ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्याकडे राज्याच्या एका भागातून दुसर्‍या भागात किंवा एका राज्यातून दुसर्‍या राज्यात स्थलांतर होत असते. ही स्थलांतरे बहुतांश रोजगारासाठी होत असतात. त्यामुळे ती खेड्यातून शहरे, महानगरांकडे होत असतात.

दुष्काळी भागाकडून सुपीक प्रदेशाकडे होत असतात. परदेशी नोकरीसाठी जाणार्‍यांची संख्या अलीकडे वाढलेली आहे; परंतु ही मंडळी नोकरीपुरतीच परदेशी जात असल्याचा सर्वसामान्यांचा समज आहे आणि तो बहुतांश खराही आहे. कारण, परदेशात नोकरीसाठी गेलेल्यांचे आई-वडील भारतातच असतात. त्यामुळे त्यांचे स्थलांतर नोकरीपुरते मर्यादित असते. संसदेत उपस्थित झालेल्या मुद्द्यानुसार देश सोडून जाणारा वर्ग वेगळा आहे आणि त्याची कारणेही वेगळी आहेत. दररोज साडेचारशे लोक देश सोडून जातात म्हणजे दर तासाला पंधरा ते वीस लोक देश सोडत असतात. दर तासाला विमानामध्ये बसणारे तेवढे लोक त्या दिवसानानंतर दुसर्‍या देशाचे नागरिक बनणार असतात. 2017 मध्ये एक लाख 33 हजार, 2018 मध्ये एक लाख 34 हजार असे देश सोडणार्‍यांचे आकडे आहेत. म्हणजे देश सोडून अन्यत्र स्थायिक होणार्‍यांची उड्डाणे आधीपासून सुरू आहेत. अर्थात, प्रत्येक माणसाला कोठेही राहण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य असते. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत देश सोडणार्‍यांची संख्या नगण्य आहे.

परंतु ती कितीही कमी असली तरी ही माणसे का देश सोडून जाताहेत, याचे कुतूहल अनेकांना असते. साधे एका गावात घर बदलायचे असले, तरी माणसाच्या मनात मोठी उलघाल होत असते. इथे तर मामला देश सोडण्याचा, मातृभूमीला अलविदा करण्याचा असतो. त्यामुळे त्याबाबतचे कुतूहल स्वाभाविक आहे. मूळ प्रश्‍न उपस्थित होतो तो म्हणजे देश सोडणारी ही माणसे कोण असतात, ती कोणत्या वर्गातून आलेली असतात आणि देश सोडण्याची कारणे काय असतात. तर यातील महत्त्वाची गोष्ट अशी की, बहुतेक लोकांच्या देश सोडण्यामागे आर्थिक कारणे असतात. रोजगारासाठी लोक दुसर्‍या देशात जातात हे कारण सर्वश्रुत आहे. दुसरे एक कारण समोर येते, ते म्हणजे उच्च शिक्षणासाठी तरुण मंडळी परदेशी जातात आणि शिक्षणानंतर तिकडेच स्थायिक होतात. 2018 पासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर ती खूप मोठी वाटते. परंतु, तेवढीच आश्‍चर्यजनक बाब म्हणजे 2010 ते 2018 या आठ वर्षांत अगदी नगण्य 290 इतक्या लोकांनी देश सोडला. म्हणजे दरवर्षी सुमारे तीस लोकांनी नागरिकत्व सोडून दिले आहे.

जागतिकीकरणाची गती गेल्या चार वर्षांत किती झपाट्याने वाढली आहे, हेही यावरून दिसून येते. याच अनुषंगाने आणखी एक प्रश्‍न निर्माण होतो, तो म्हणजे आपला देश सोडून हे लोक कोणत्या देशांना प्राधान्य देतात? जगभरातील अनेक देशांमध्ये लोक जातात; परंतु भारतीयांकडून सर्वाधिक नागरिकत्व स्वीकारले जाते, त्या देशांमध्ये कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, सिंगापूर आणि ब्रिटन या देशांचा प्रामुख्याने समावेश आहे. नागरिकत्व सोडणारे बहुतांश लोक हे गर्भश्रीमंत असतात. काहींना व्यवसायात असुरक्षितता वाटत असते. आपल्यासाठी आवश्यक असलेली जीवनशैली नसल्याची अनेकांची तक्रार असते. मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या देशापेक्षा बाहेरची परिस्थिती चांगली असल्याची अनेकांची समजूत असते. म्हणजे शिक्षण, रोजगार, आर्थिक संपन्‍नता आणि सुरक्षित भवितव्य ही चार प्रमख कारणे देश सोडण्यामागे असतात. शिक्षणासाठी देश सोडणारे बव्हंशी विद्यार्थी विदेशातच स्थायिक होण्याला प्राधान्य देतात. 'ब्रेन ड्रेन'चा प्रकारही वर्षोनवर्षे सुरू आहेच. तो रोखण्याचे प्रयत्न सुरू असले तरी त्यात अपेक्षेइतके यश आलेले नाही. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणारा देश आज जगाच्या तुलनेत अनेक बाबींमध्ये आघाडीवर आहे, शक्‍तीशाली बनतो आहे. परंतु, ज्यांना व्यक्‍तिगत स्वार्थापलीकडे काहीच दिसत नाही, त्यांच्यासाठी देश, मातृभूमी वगैरे संकल्पनांना फारसा अर्थ नसतो, हेच यातून दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT