Latest

स्वामी विवेकानंद यांचा विचारस्पर्श

अमृता चौगुले

स्वामी विवेकानंद हे अफाट बुद्धिमत्ता लाभलेले हिंदू संन्यासी होते. बंगालमध्ये त्यांना सामाजिक सुधारणांचे प्रणेते मानतात. जात-पात, सोवळे-ओवळे, कर्मकांड आणि आश्रमातील पूजा-विधी यापेक्षा त्यांनी गरिबांची सेवा, त्यांचे शिक्षण, स्त्री-पुरुष समानता यावरच जास्त भर दिला. आज त्यांची जयंती, त्यानिमित्त…

स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तिमत्त्व, कार्य आणि शिकवण यांची निश्चित स्वरूपाची माहिती आजही अनेकांना नाही. स्वामीजींचे वडील कोलकात्यातले मोठी कमाई असलेले वकील होते. स्वामीजी म्हणजे नरेंद्र दत्त हे त्यावेळी महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. प्रखर बुद्धिमत्ता, उत्तम पाठांतर आणि अपार जिज्ञासा यामुळे नरेंद्र दत्तांचे त्यावेळचे अफाट वाचन कोणाही दिग्गज पंडिताला लाजवेल असे होते. परमेश्वर नेमका कसा आहे, अशी जिज्ञासा त्यांच्या मनात होती आणि भेटेल त्या साधूला, संन्याशाला किंवा धार्मिक, सामाजिक कार्य करणार्‍या विचारवंताला नरेंद्र दत्त, 'तुम्ही देव पाहिला आहे का,' असा प्रश्न विचारत. त्यांची जिज्ञासेची तृप्ती कोणीच करू शकले नाही; मात्र कोलकात्यापासून जवळ असलेल्या दक्षिणेश्वर येथील कालिमातेच्या मंदिरातील पुजारी असलेले महान संत रामकृष्ण परमहंस यांची नरेंद्राशी भेट झाली आणि परमेश्वराच्या अस्तित्वाविषयीच्या त्याच्या प्रश्नाला त्यांनी योग्य उत्तर देऊन त्याचे समाधान केले. त्यामुळे नरेंद्राच्या दक्षिणेश्वरकडे चकरा वाढल्या आणि त्याच काळात त्याच्या वडिलांचेही निधन झाले.

वडिलांचे निधन होताच घर उघडे पडले आणि घरात उपासमार सुरू झाली. घरातला कर्ता तरुण मुलगा म्हणून त्याने कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, अशी त्याच्याकडून अपेक्षा व्यक्त व्हायला लागली आणि त्यामुळे त्याला भाकरीचा शोध घ्यावा लागला. एका बाजूला भाकरीचा शोध आणि दुसर्‍या बाजूला परमेश्वराचा शोध. आपल्या देशामध्ये जे लोक परमेश्वराचा शोध घेतात, त्यांची भाकरीची ददात मिटलेली असते. दुसर्‍या बाजूला ज्यांना केवळ भाकरीच्या शोधात दिवस-रात्र मेहनत करावी लागते, त्या श्रमिकांना मात्र परमेश्वराचा शोध घ्यायला वेळ मिळत नाही. भाकरी मिळायला मोताद असलेल्या दरिद्री माणसाच्या भावना त्यांना चांगल्या समजत होत्या. त्यामुळे नरेंद्र दत्ताचा विवेकानंद झाल्यानंतर त्यांनी जे धर्माचे तत्त्वज्ञान सांगितले, त्यामध्ये गरीब माणसाची सेवा करणे हाच धर्म होय, असे ठासून सांगितले. गरीब माणसाविषयीची त्यांची कणव इतकी तीव्र होती की, ती त्यांच्या अनेक भाषणांतून, लिखाणातून आणि प्रवचनांतून वारंवार व्यक्त झालेली आहे. देशातले निम्मे लोक दोन वेळा जेवण मिळवू शकत नसतील आणि अशा वेळी आपण ऐषआरामात राहत असू, तर आपल्याला हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

स्वामीजी हिंदू संन्याशी होते; परंतु त्यांच्या शिकवणुकीत किती तरी पुरोगामी विचार होते. म्हणून बंगालमध्ये त्यांना सामाजिक सुधारणांचे प्रणेते मानतात. जात-पात, सोवळे-ओवळे, कर्मकांड आणि आश्रमातील पूजा-विधी यावर त्यांनी कधीच भर दिला नाही. त्यापेक्षा त्यांनी गरिबांची सेवा, त्यांचे शिक्षण, स्त्री-पुरुष समानता यावरच जास्त भर दिलेला आहे. त्यांच्या शिकवणुकीतला हा सामाजिक आशय प्रकर्षाने भारतीयांसमोर आला पाहिजे, असे आग्रहाने सांगावेसे वाटते.

स्वामीजींनी अमेरिकेत शिकागो शहरातील सर्वधर्म परिषद गाजवली. परंतु, ते सभा गाजवण्यासाठी तिकडे गेलेले नव्हते. ज्या दिवशी तेथे त्यांचे भाषण झाले, त्याच दिवशी रात्री त्यांच्या मनात कोणते विचार आले, याचे वर्णन करणारे एक पत्र त्यांनी मित्राला लिहिले आहे. त्यामध्ये स्वामीजी म्हणतात, 'मला अमेरिकेत येऊन एवढी प्रसिद्धी मिळाली; परंतु या प्रसिद्धीचा माझ्या देशातल्या गरीब-दलित बांधवांना काही उपयोग होणार आहे का, हा प्रश्न माझ्या मनात येत आहे. किंबहुना असा काही उपयोग होणार नाही, हे समजून मी अस्वस्थ झालो आहे.' स्वामीजींचा आत्मा देशातल्या गरीब, दलित, वंचित समाजासाठी सतत तळमळत होता. या लोकांवर उच्चवर्णीयांनी केलेल्या सामाजिक अन्यायाचे परिमार्जन झाले पाहिजे, असे त्यांना तीव्रतेने वाटत होते. ते सामाजिक विचारवंत विवेकानंद आपण समजून घेतले पाहिजेत.

– अरविंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT