Latest

स्मृती इराणी यांच्याकडे प. बंगाल भाजपची जबाबदारी ?

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा – विधानसभा पोटनिवडणुकांत प. बंगाल, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत भाजपची कामगिरी निराशाजनक झाली होती. या पार्श्‍वभूमीवर संबंधित राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांकडून पक्ष नेतृत्वाने विस्तृत अहवाल मागविला असून, गरज पडल्यास आवश्यक तिथे बदल केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पक्षाला प. बंगालमध्ये मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भविष्यात या राज्याची जबाबदारी स्मृती इराणी यांच्याकडे दिली जाण्याची चर्चा आहे.

वरील तिन्ही राज्यांत भाजपचा सुपडासाफ झाला होता. हिमाचल प्रदेशात पक्षाला लोकसभेची जागा गमवावी लागलीच; पण विधानसभेची जागाही राखता आली नाही. प. बंगालमध्ये पक्षाला दोन जागा गमवाव्या लागल्या. मात्र, त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे मतांची टक्केवारी 40 टक्क्यांवरून थेट 15 टक्क्यांवर आली. प. बंगालमध्ये कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी स्मृती इराणी यांच्याकडे जबाबदारी दिली जाऊ शकते.बंगालमध्ये भाजप नेत्यांची गळती ती रोखण्याचे आव्हानही आहे.

हिमाचलमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा

पुढील वर्षी हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या राज्यातला पराभव भाजपसाठी विशेष चिंताजनक आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी पराभवासाठी वाढत्या महागाईला दोषी ठरविले होते. दरम्यान, राज्यात नेतृत्व अथवा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेने वेग घेतला आहे.

राजस्थानात वसुंधराराजेंना पर्याय देणार

राजस्थानमध्येही भाजपला एक जागा गमवावी लागली. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांचा गट निवडणुकीपासून दूर राहिलाच; पण या गटाने आपल्याच पक्षाच्या उमेदवारांचे नुकसान केल्याचे बोलले जात आहे. वसुंधराराजे यांच्याऐवजी दुसरे नेतृत्व विकसित करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचीही अंतर्गत वर्तुळात चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT