सोलापूर; अंबादास पोळ : सोलापूर जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा ज्वारी व बाजरीच्या उत्पादनात अग्रेसर असल्यामुळे ज्वारी व बाजरीवर प्रक्रिया करून 12 प्रकारची ज्वारीची बिस्किटे व कुकिजची निर्मिती केली जाते. ज्वारीवर प्रकिया करून केक, लाह्या, पोहे, रवा, चकली, लाडू, शेवया, पापड व सांडगे इत्यादी पदार्थांचे उत्पादन केले जात आहे. या पदार्थांना महाराष्ट्रासह हैदराबाद, रायचूर, बंगळुरू या शहरांत मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
सध्या शेतीमालाला चांगला भाव मिळेलच, याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. सोन्यासारखा शेतमाल विकून चांगला बाजारभाव मिळत नाही. चांगला बाजारभाव मिळावा, ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपल्बध व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन अनिता माळगे यांनी बोरामणी या छोट्याशा गावात बचत गट स्थापन केले.
गावातील सर्व महिलांना रोजगार मिळावा आणि ज्वारीपासून आपण अनेक बिस्किटे किंवा इतर पदार्थ बनवू शकतो, हा विश्वास आमच्यामध्ये आला. हैदराबाद आणि राज्यातील अनेक कृषी विद्यापीठांनी आम्हाला या सर्व गोष्टींसाठी मार्गदर्शन केले.
– अनिता माळगे, संचालिका