Latest

सोलापूर : विना रजिस्ट्रेशनच्या 11 ई-बाईक जप्त

अमृता चौगुले

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : ईलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीची क्षमता परस्पर वाढवल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. बॅटरीची क्षमता 250 वॅट व स्पीड ताशी 25 कि.मी. असलेल्या ई-बाईकमध्ये परस्पर बदल केल्याने 11 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून या सर्वांविरुध्द न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजयसिंह गवारे यांनी दिली.

राज्यात 1253 वाहनांची तपासणी केली. यात 347 ई-बाईकमध्ये दोष आढळला. 233 दुचाकी जप्त केल्या. परिवहन विभागाने अनधिकृतरीत्या बदल करणार्‍या ई-वाहनांवर कारवाईचे आदेश 19 मे रोजी दिले. 31 मेपर्यंत राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांनी ही कारवाई केली. यात 139 ई-बाईकच्या शोरुमची झाडाझडती घेतली. सोलापुरातील एका शोरुमची तपासणी केली अन् 11 वाहनांची तपासणी करुन गाड्या जप्त केल्या. विजापूर रोड, होटगी रोड आणि बाळे येथे गेल्या दोन दिवसांत ही तपासणी केली. या कारवाईत 11 गाड्या जप्त केल्या आहेत.

कोणतीही ईलेक्ट्रिक बाईक घेताना तिचा वेग साधारणपणे 25 कि.मी. असतो. याच्या बॅटरी 250 वॅटच्या असतात. मात्र, काही लोकांकडे 50 कि.मी. वेगाने धावणार्‍या गाड्या आढळल्या. गाड्या जर 25 कि.मी.पर्यंत वेगाने धावणार्‍या असतील तर त्याला उपप्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी किंवा नोंदणी गरजेची नाही. त्यामुळे या गाड्यांचा रोड टॅक्स आणि नोंदणी खर्च माफ होतो. जर त्या गाडीचा वेग वाढवला तर या सगळ्या नियमांची रक्कम भरुन गाडी रितसर नोंदणी करुन घ्यावी लागते आणि त्याचसाठी आरटीओने सोलापुरात 11 गाड्या जप्त केल्या आहेत.

या सर्व गाड्यांच्या मालकांविरुध्द न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार आहेत. या कारवाईत मोटार वाहन निरीक्षक राहुल खंदारे, किरण खंदारे आणि शिवाजी सोनटक्के या मोटार वाहन निरीक्षकांचा सहभाग होता.

…म्हणून गाड्या पेटण्याची शक्यता
मोटार वाहन कायद्यानुसार ई-बाईकबाबत नियम ठरलेले आहेत. त्यानुसार 250 वॅटहून कमी क्षमतेच्या वाहनांची गती 25 कि.मी.हून अधिक नको. या वाहनांना आरटीओ नोंदणीची गरज नसून या वाहनचालकांना परवाना लागत नाही. परंतु तपासणी केलेल्या ई-बाईकमध्ये बॅटरीची क्षमता व गती हे दोन्हीही जास्त असल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे वाहनाच्या गतीमुळे बॅटरी गरम होऊन पेट घेण्याची शक्यता असते. वाहनचालकाला वाहनाची तांत्रिक माहिती नसते. वाहन विक्रेताही वाहनचालकला तांत्रिक माहिती न देता वाहन विकतो. मात्र वाहन बनविणार्‍या कंपनीला ही बाब माहिती असते. तरीही कंपनीकडून या ई-बाईक वाहनचालकांना अंधारात ठेऊन विकल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT