Latest

सोलापूर : विधवा सुनेस 70 वर्षीय सासूने 3 लाखांची पोटगी देण्याचा न्यायालयाचा आदेश

अमृता चौगुले

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा :  सासू श्रीमती राजमणी लक्ष्मण पानगंटी (वय 70, जुना विडी घरकुल,हैद्राबाद रोड, सोलापूर) यांनी विधवा सून मोनिका वय, 35 व नातींना मिळून 3 लाख रुपये एकूण थकीत पोटगी द्यावी, असा निकाल न्यायालयाने दिला.

अधिक माहिती अशी की, सून मोनिका यांचे श्रीनिवास पानगंटी यांच्याशी 2006 मध्ये विवाह झाला होता. त्यांच्या दोन मुली लक्ष्मी (वय 10 वर्षे), श्रृतिका (वय 9) ह्या सध्या आईकडेच राहतात. सन 16 एप्रिल 2010 रोजी श्रीनिवास पानगंटी यांचे आकस्मिक निधन झाले. मुलाच्या निधनानंतर सासू राजमणी हिने विधवा सून मोनिका व दोन नातींना राहत्या घरातून हाकलून दिले. सामाईक प्रॉपर्टीतील हिस्साही दिला नाही.

त्यामुळे विधवा सुनेने अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर यांच्यामार्फत कौटुंबिक हिंसाचार महिला संरक्षण अधिनियम 2005 अन्वये कलम 12,18,19,20,21 अंतर्गत सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या फौजदारी कोर्टात केस दाखल केली. याकामी सुनावणी व न्यायालयीन चौकशी झाली. सुनेतर्फे युक्तीवादामध्ये एकत्र कुटुंबामधील सुनेचा व नातींचा प्रॉपर्टीमध्ये हिस्सा असून, त्या प्रॉपर्टीमध्ये राहण्याचा हक्क विधवा सून व नातींना आहे. त्यामुळे सासुने सुनेस व नातींना दरमहा पोटगी देण्यात यावी असा युक्तिवाद अँड. श्रीनिवास कटकूर यांनी केला.

युक्तीवाद ग्राहय धरून न्यायाधीश व्ही. बी. चव्हाण यांनी आदेश दिला. सासू राजमणी पानगंटी हिने विधवा सून मोनिका यांना दरमहा 2 हजार व प्रत्येक नातीस दरमहा 500 असे एकूण तीन हजार रुपये पोटगी केस दाखल 13 जुलै 2015 पासून ते आजपर्यंत 7 वर्षांची थकीत पोटगी व नुकसान भरपाई खर्च 30 हजार व कोर्ट खर्च 5 हजार असे एकूण 3,10,000/- एकूण रक्कम सुनेस दण्याचा आदेश दिला. याकामी सून व नातींतर्फे अ‍ॅड.श्रीनिवास कटकूर, अँड. किरण कटकूर, अ‍ॅड. आनंद सागर, तर सासूतर्फे अ‍ॅड. बिराजदार यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT