सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : बँकेचे कर्ज असताना तारण असलेली जागा महिला पोलिस निरीक्षकास विकून पंजाब नॅशनल बँक व महिला पोलिस निरीक्षकांची 92 लाख 58 हजार 921 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पाटील बाप-लेकावर गुन्हा दाखल झाला आहे. शावरप्पा यशवंत पाटील व त्याचा मुलगा दीपक शावरप्पा पाटील (दोघे रा. पाटीलनगर, सैफुल) ही दोन आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी मंजूनाथ शिवराम कलकूर (वय 50, रा. रूद्राक्ष आल्लेनगर, वसंतविहार) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली. यात म्हटले आहे की, पाटील बाप-लेकांनी सन 2016 ते आजपर्यंत पंजाब नॅशनल बँक, कस्तुरबा मार्केट, बाळी वेस शाखेतून 25 लाख रुपये गृहकर्ज, बसवदीप मोटारचे चार भागीदार यांनी सीसी कर्ज 20 लाख रुपये, टर्म लोन 25 लाख, असे एकूण 71 लाख रुपये कर्ज थकीत ठेवले. त्याचे व्याजासह 92 लाख 58 हजार 912 रुपये येणेबाकी आहे.
त्या कर्जाला तारण म्हणून आरोपींनी त्यांच्याकडील पाटीलनगर, सैफुल, विजापूर येथील प्लॉट नं.37 नवीन नं. 54 सर्व्हे नं. 351/1 मधील 322 चौरस मीटर ही जागा बँकेकडे तारण ठेवलेली होती. तीच तारण ठेवलेली जागा सदर बझार पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी शामराव भोसले यांना परस्पर दुय्यम निबंधक वर्ग-2, उत्तर सोलापूर यांच्याकडे नोंदणी खरेदीखत करुन विक्री केली. पंजाब नॅशनल बँक व सदर बझारच्या पोलिस निरीक्षकांनासुध्दा फसविले आहे. या फिर्यादीवरून पाटील बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पाटील हे करत आहेत.