सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये सोलापूर एस.टी. विभागाला 41 लाख 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे कोरोना आणि कर्मचार्यांच्या संपामुळे तोट्यात असलेल्या एस.टी.ला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीत राज्यातून वारकर्यांसाठी 4 हजार 700 पेक्षा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. 6 जुलैपासून राज्यातील विविध विभागांतून एस.टी. सेवा सुरू करण्यात आली होती. सोलापूर विभागाने नाशिक, पुणे, मुंबई, सांगली, सातारा, अहमदनगर, नांदेड, जालना, अकोला, औरंगाबाद, बीड आदी विभागांतून जादा गाड्या मागवल्या होत्या. आषाढी वारीत जवळपास एकूण 1 हजार 214 फेर्या झाल्या. एस.टी.चा एकूण 1 लाख 12 हजार 562 किलोमीटर प्रवास झाला. सोलापूर डेपोतून जवळपास 200 गाड्या सोडण्यात आल्या होत्या.
कोरोनानंतरची ही पहिलीच वारी मोठ्या प्रमाणावर होणार होती. त्यामुळे तयारी एक महिन्याच्या आधीपासून सुरू होती. त्यासाठी वेगवेगळ्या विभागांतून एस.टी. मागविण्यात आल्या होत्या. त्यामुळे सोलापूर विभागाला वारीतून चांगले उत्पन्न मिळाले आहे. उत्पन्नाचा प्रवास यापुढेही जोमात सुरू राहण्याची आशा व्यक्त होत आहे.
दोन वर्षात कोरोनामुळे आषाढी वारी झाली ती केवळ हाताची बोटे मोजण्या इतपत मानकर्यांच्या उपस्थितीत. त्यामुळे दोन वर्षे वारकरी मंडळी कधी एकदा आषाढी येते याची प्रतिक्षा करत होते. यंदा आषाढी वारी निर्बंधमुक्त होणार याची घोषणा होताच राज्यासह परराज्यातील भाविकांनी तयारी केली होती. पावसाचे वातावरण आणि सुरक्षित प्रवास याचा विचार करुन सर्वच वारकर्यांनी एसटी बसच्या प्रवासास प्राधान्य दिल्याने एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.