कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा गणरायाचे लडीवाळ रूप यंदाही सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजणार आहे. सुंदर आभूषणांनी गणरायाचे नेत्रदीपक रूप अनुभवता यावे यासाठी ग्राहक विविध प्रकारचे पर्याय अवलंबतात. आकर्षक आणि कलाकुसरीच्या वेगवेगळ्या प्रकारची दागिने आणि आभूषणे खरेदीसाठी सराफ बाजारात भाविकांची लगबग दिसून येते आहे.
बाप्पाचे नयनरम्य रूप आणि त्यांना चढवलेला दागिन्यांचा साज गणेशोत्सव सणात सगळीकडे पाहायला मिळतो. गणपतीच्या दागिन्यात नावीन्य पाहायला मिळत आहे. त्यामध्ये किरीट, त्रिशूळ, परशू, माळा, तोडे, शेला या पारंपरिक दागिन्यांसह मोदक, पूजेचे साहित्य दुर्वा, फुले, फळे यांना भाविकांकडून पसंती मिळत आहे. तसेच घरच्या बाप्पासाठीदेखील चांदीचा मूषक, मोदक, मुकुट, जास्वंदाचे फूल, कमळ, केवडा खरेदी करण्यासाठी देखील अनेकांची पावले सराफी पेढ्यांकडे वळत आहेत.
गुजरीमध्ये एक ग्रॅमपासून विविध वजनांचे तयार दागिने भक्तांना आकर्षित करत असून, दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. घरगुती मूर्तींबरोबर मंडळाच्या गणेशमूर्तीलाही सोन्या-चांदीचे दागिने घडविले जात आहेत. सध्या बाजारात सोने 53 हजारांच्या आसपास प्रतितोळा, तर चांदी 56 हजारांवर प्रतिकिलोचा दर आहे. बाजारात सोन्या-चांदीची तयार आकर्षक आभूषणे असून, काही ऑर्डरप्रमाणे बनवून घेत आहेत.
गणेशभक्त गणपतीसाठी चांदीतील मुकुट, मोदक हार, टिकलीहार, श्रीमंतहार, कडे, सोंडपट्टी, कमरपट्टा, तोडे, बाजूबंद, कंगन, कुंडल, दुर्वां,जास्वंदीचा हार, फुलपरडी, फळपरडी, सोन्याचे पाणी दिलेले चांदीचे मोदक, मोत्याची कंठी, खारीक, बदाम, जर्दाळू इत्यादीचा चांदीचा ड्रायफ्रूट सेट, सोन्याचे पाणी दिलेली फळं, कान, उंदीर, दगडूशेठ, सिद्धिविनायक आणि लालबागचा राजा अशा चांदीच्या गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. असे विविध प्रकारचे दागिने तसेच पूजेतील विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करताना दिसतात.
एक मोदक, 11 मोदक, 21 मोदक यांचा सेट प्रत्येकांच्या पसंतीचा आहे. ज्यांना चांदीचेही दागिने शक्य नाहीत, पण गणपतीसमोर सजावट करण्याची इच्छा मात्र खूप आहे ते एक ग्रॅमच्या दागिन्यांचा मार्ग निवडताहेत. एक ग्रॅमचे दागिने घालून आपल्या घरच्या गणपतीची सजावट करतात. तसेच चांदीबरोबर सोन्याचे दागिने तयार करण्याकडे कल वाढला आहे. यंदा विणकाम केलेले चांदीचे केळीचे घडही ग्राहकांची पसंती आहे, अशी माहिती सराफांनी दिली.
सार्वजनिक असो वा घरगुती गणेशमूर्तीला सोन्या-चांदीचे दागिने तयार करून घालण्याबाबत भाविकांमध्ये हौस वाढली आहे. नवसपूर्तीनंतर भक्तगण मूर्तीला चांदीचे किंवा सोन्याचा ऐवज करून घालतात. जास्तीत जास्त चांदीचे दागिने घडविण्यात भाविकांचा कल असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 20 टक्के वाढ झाली आहे. यंदा निर्बंधात शिथिलता आल्याने ग्राहक खरेदीसाठी गर्दी करत असून त्यांचा ऑनलाईनही प्रतिसादही चांगला आहे
– भरत ओसवाल,
अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ.