मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने मुद्दाम जुनी प्रकरणे बाहेर काढण्यात येत आहेत. किरीट सोमय्या यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांमागचे सूत्रधार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच आहेत. कोल्हापुरात भाजप भुईसपाट केल्याने गेल्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला भाजप प्रवेशाची ऑफरही दिली होती. आपला आवाज दाबण्यासाठी भाजपने षड्यंत्र रचले असून, ब्रिक्स इंडिया कंपनीशी माझा व माझ्या जावयांचा सूतरामही संबंध नसल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सोमय्या हे मिळून आपल्याला कोठे थांबविता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहेत. भाजप नेत्यांनी सोमय्या यांचा वापर सुरू केला आहे. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असूनही कोल्हापुरात भाजपला भुईसपाट केल्याने त्यांचा राग आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थ दाखवून लढाई लढावी, असे मुश्रीफ म्हणाले.
सोमय्या यांनी सोमवारी केलेला दावा हा पूर्णपणे खोटा आहे. ब्रिक्स इंडिया कंपनीशी आपला व आपल्या जावयाचा सूतरामही संबंध नाही. सोमय्या यांनी आरोप करण्यापूर्वी नीट अभ्यास करावा आणि आजच्या आरोपाबाबत माफी मागावी, असे सांगून मुश्रीफ म्हणाले की, सोमय्या यांच्या सी.ए.च्या पदवीबाबत आपल्याला शंका आहे.
2012-13 साली ब्रिक्स इंडिया कंपनीने गडहिंग्लज साखर कारखाना ताब्यात घेतला. तो दोन वर्षांपूर्वीच कंपनीने संचालक मंडळाकडे सुपूर्द केला आहे. त्यांनी कारखानदारीवर बोलण्यापूर्वी नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन घ्यायला हवे, असा सल्ला देत हसन मुश्रीफ म्हणाले की, तुम्ही एकदा तक्रार केली आहे ना; मग आता तपास यंत्रणांना त्यांचे काम करू द्या. तुम्ही पर्यटन कशासाठी करता? आणि घोटाळेबाज म्हणत बदनामी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असे प्रश्नही मुश्रीफ यांनी उपस्थित केले. ब्रिक्स इंडिया कंपनीमध्ये 44 लाख शेअर कॅपिटल आहेत. मग 100 कोटींचा घोटाळा होईलच कसा? कोल्हापूर मध्यवर्ती बँकेचे या कारखान्याला कर्ज नव्हते, असा दावाही मुश्रीफ यांनी केला.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गडहिंग्लज साखर कारखाना कोणाच्याही ताब्यात दिलेला नाही. मंत्री म्हणून आतापर्यंतच्या कार्यकाळात आपल्यावर कधीही आरोप झाला नाही, असे सांगून मुश्रीफ यांनी भाजप नेत्यांचेही घोटाळे उघड करा, असे आव्हान सोमय्या यांना दिले.
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी आपला कसलाही संबंध नाही. त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण कारखान्याला सहकार्य करतो एवढेच. आरोप करून सोमय्या राज्यातील सहकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असून, कारखाना कसा असावा याचे जरंडेश्वर हे उत्तम उदाहरण आहे. एकदा आपणच बोलावून त्यांना कारखान्याचे पर्यटनही घडवितो आणि पोलिसांत तक्रारीसाठीही नेतो. शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे मुद्दाम जुनी प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. आपल्यालाही आता गप्प बसून चालणार नाही, असे सांगून मुश्रीफ यांनी सोमय्यांवरील कारवाईचा निर्णय हा जिल्हाधिकार्यांच्या पातळीवर घेतल्याचे स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील यांच्या दबावामुळे हे सर्व सुरू असल्याचा दावा करून मुश्रीफ म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असून, ते शरद पवार यांचे नाव घेतात. त्यांची लायकी तरी आहे का? ते उद्धव ठाकरे यांचे नाव घेतात. कोणालाही तुरुंगात टाकण्याची भाषा करतात, हे त्यांना थांबवावे लागेल. त्यासाठी आपणच कोर्टात जाणार आहोत. चंद्रकांत पाटील यांनी घोटाळा केल्याचे आपण महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले आहे. आम्हालाही त्यांचे घोटाळे काढावे लागतील आणि लोकशाही मार्गाने त्यांना सरळ करावे लागेल.