Latest

सूर्यकुमार यादवला तिसर्‍या कसोटीत खेळवा : फारुख इंजिनिअर

Arun Patil

नवी दिल्‍ली; वृत्तसंस्था : भारतीय संघात आता मधल्या फळीत बदल करण्याची वेळ आली आहे. चेतेश्‍वर पुजारा किंवा अजिंक्य रहाणे यापैकी एकाच्या जागेवर सूर्यकुमार यादव या युवा चेहर्‍याला संधी देण्यात यावी, असा सल्‍ला भारतीय क्रिकेट संघातील माजी यष्टिरक्षक कसोटीपटू फारुख इंजिनिअर यांनी दिला आहे. सूर्यकुमार हा 'मॅचविनर' खेळाडू आहे, तो परिस्थितीनुसार स्वत:ला मोल्ड करण्यात पटाईत आहे, असेही इंजिनिअर यांनी म्हटले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टपासून लीडस्वर खेळवण्यात येत आहे. लॉर्डस् मैदानावर भारताने दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे. विजेत्या संघात शक्यतो बदल केले जात नाहीत. परंतु, भारताने पुढच्या कसोटीसाठी एक बदल करणे आवश्यक आहे, असे इंजिनिअर यांना वाटते.

पुजारा, रहाणे टीकाकारांच्या निशाण्यावर

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि तिसर्‍या क्रमांकावरील चेतेश्‍वर पुजारा यांची कामगिरी खालावल्याने ते टीकाकारांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांच्या फलंदाजीत सातत्य नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहेत. तथापि, लॉर्डस् कसोटीत या दोघांनी भारताला अडचणीतून बाहेर काढले. दोघांनी कठीण काळात शतकी भागीदारी केली. यामुळे भारताला कसोटीत पुनरागमन करता आले; पण शमी आणि बुमराहच्या नवव्या विकेटसाठीच्या भागीदारीमुळे त्यांची खेळी नजरेआड झाली.

परंतु, इंजिनिअर यांच्या मते, तिसर्‍या कसोटीसाठी पुजारा किंवा रहाणे यांच्यापैकी एकाच्या स्थानी सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिले पाहिजे. तो मॅचविनर खेळाडू असून, त्याच्यामुळे संघाला फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.

सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ हे दोघे सध्या इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या भारतीय संघासोबत आहेत. परंतु, सुरुवातीला ते संघाचा हिस्सा नव्हते. ते दोघे शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेत मर्यादित षटकांच्या मालिकेत सहभागी झाले होते. परंतु, इंग्लंड दौर्‍यातील शुभमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर जखमी झाल्यानंतर यादव आणि शॉ यांना बॅकअपसाठी बोलवण्यात आले.

हीच ती वेळ

इंजिनिअर म्हणाले की, 'मी सूर्यकुमारचा मोठा फॅन आहे. तो क्‍लास खेळाडू आहे. तो आक्रमक आहे; पण त्याचबरोबर तो संयमानेही खेळू शकतो. मधल्या फळीत जशी गरज असेल त्याप्रमाणे तो स्वत:ला मोल्ड करू शकतो. याशिवाय तो चपळ क्षेत्ररक्षक असल्याने त्याचा संघाला फायदा होऊ शकतो. मर्यादित षटकांच्या सामन्यात त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. हेडिंग्लेची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असते. त्यामुळे यादवसाठी कसोटी पदार्पण करण्याची हीच ती वेळ आहे.

विराटने मर्यादा सांभाळावी

दुसर्‍या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीचा आक्रमक बाणा पाहायला मिळाला. मात्र, आक्रमक बाणा दाखवत असताना विराट कोहलीने सावधगिरी बाळगायला हवी, असा सल्ला इंजिनिअर यांनी दिला आहे. ते म्हणाले, मी विराट कोहलीच्या आक्रमकतेचे कौतुक करतो. तो एक चांगला कर्णधार आहे. मात्र, मर्यादेत राहणे आवश्यक आहे; अन्यथा पंच आणि सामनाधिकारी हस्तक्षेप करू शकतात. त्याने आपली आक्रमकता थोडी कमी करावी. कारण, तो त्यात वाहत जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT