न्यूयॉर्क : 'सूर्य' हा पृथ्वीवरून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रंगात दिसत असतो. तो कधी लाल, नारिंगी, पांढरा तर कधी पिवळाही दिसत असतो. पण बहुतेक वेळ तो पिवळाच दिसत असतो. तर मग सूर्याचा वास्तविक रंग कोणता असेल? पृथ्वीच्या वातावरणामुळे सूर्याचा रंग वेगवेगळा दिसत असेल तर अंतराळात कोणत्या रंगाचा असतो? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
'नासा'चे माजी अंतराळयात्री स्कॉट कॅली यांनी सांगितले की, वास्तविकरित्या सूर्याचा रंग हा पिवळा नसून तो पांढरा आहे. मात्र, तो पिवळा दिसण्यात आपल्या डोळ्याची कार्यप्रणालीही जबाबदार असते. आपल्या डोळ्यांना सूर्याच्या किरणांचा कोणताच रंग दिसत नाही. कारण सूर्याच्या प्रकाशाचे प्रमाण हे आपल्या डोळ्यातील फोटोरिसेप्टर कोशिकांना संतृप्त करत असतात. यामुळे सर्व रंग एकमेकांत मिसळून पांढरा रंग तयार होत असतो. यामुळे पृथ्वीवर पिवळा दिसणारा सूर्य अवकाशातून पांढरा दिसत असतो. सूर्याच्या रंगामध्ये पृथ्वीचे वातावरणही महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.
यामुळेच पृथ्वीवरून वेगवेगळ्या वेळी सूर्य वेगवेगळ्या रंगात दिसत असतो. नासाच्या मते, सूर्याचे कमी वेव्हलेंथ असलेले तरंग हे खरे तर निळ्या प्रकाशाचे तरंग असतात. हे तरंग अगदी सहजपणे विखुरले जातात. तर जास्त वेव्हलेंथ असलेले लाल तरंग सहजपणे विखुरले जात नाहीत. काही रंग तर अंतराळातच नाहीसे होतात. यामुळे सूर्य हा पृथ्वीवरून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रंगात दिसत असतो. मात्र, तोच सूर्य अवकाशातून पांढरा दिसत असतो.