Latest

सीमाभागातील मल्ल ‘महाराष्ट्र केसरी’आखाड्यापासूनच वंचित

Arun Patil

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : बेळगावसह मराठी सीमाभाग सांस्कृतिकद‍ृष्ट्या महाराष्ट्राशी जोडला गेलेला असला तरी मराठी सीमाभागातील मल्लांना 'महाराष्ट्र केसरी'च्या आखाड्यात प्रवेश नाही! नियमांचे निमित्त पुढे करून बेळगावच्या मल्लांना महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या आखाड्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. मात्र, कुस्तीला पुन्हा चांगले दिवस येत असताना आता नियमांत बदल करून किमान बेळगाव जिल्ह्यातील मल्लांना या आखाड्यात स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्याची गरज आहे.

नुकत्याच सातारा येथे 'महाराष्ट्र केसरी'साठी रंगलेल्या कुस्ती आखाड्याकडे सीमाभागातील कुस्तीशौकिनांचेही लक्ष होते. कारण, कोल्हापूरनंतर सीमाभागात कुस्तीचे फड गाजतात ते बेळगावातच. बेळगाव शहरातच किमान 10 तालमी आहेत. गेली 20 वर्षे बंद पडलेले कुस्तीचे आखाडे 2021 पासून पुन्हा गाजू लागले आहेत. यंदा म्हणजे 2022 च्या मोसमात गेल्या दोन महिन्यांत किमान पाच कुस्ती मैदाने बेळगाव परिसरात झाली आहेत. तर आणखी किमान तीन आखाडे भरणार आहेत. 'हिंद केसरी' पैलवान सत्पाल (पंजाब) विरुद्ध युवराज (युवराज पाटील, कोल्हापूर) यांच्यात बेळगावच्या रेसकोर्स मैदानावर झालेली 40 वर्षांपूर्वीची कुस्ती आजही बेळगावचे कुस्तीशौकीन काल घडल्यासारखी सांगतात.

बेळगावची परंपरा

बेळगाव परिसरातील मल्‍लांचा दबदबा महाराष्ट्र केसरी मैदानात 1968 नंतर बंद झाला. त्याआधी बेळगावच्या मल्लांनी दोनदा 'महाराष्ट्र केसरी' हा किताब जिंकला आहे. कसा? तर कोल्हापूर आणि पुण्याच्या तालमीचे मल्ल या नात्याने सहभाग घेऊन.

बेळगाव तालुक्यातील मुत्नाळ गावचे मल्ल चंबा हे दोनदा 'महाराष्ट्र केसरी' झाले. तर चिकोडी तालुक्यातील एकसंबा गावचे श्रीपती खंचनाळे हे एकदा 'महाराष्ट्र केसरी' झाले. बेळगाव तालुक्यातील सावगावचे परशुराम 'महापौर केसरी'त उपविजेते ठरले होते.

तथापि, चंबा मुत्नाळ हे कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीचे, श्रीपती खंचनाळे शाहूपुरी तालमीत तर परशुराम सावगाव हे पुण्याच्या अगरवाल तालमीचे मल्ल या नात्याने सहभागी झाले होते. त्याने बेळगावचे मल्ल म्हणून सहभागी होता येत नव्हते आणि अजूनही तोच नियम कायम आहे. एकसंबा येथील श्रीपती खंचनाळे यांनी 1959 मध्ये पहिला 'हिंद केसरी' किताब पटकावला. त्याचवर्षी कराड मैदानात आनंद शिरगावकर याला अस्मान दाखवत ते 'महाराष्ट्र केसरी'चे मानकरी ठरले. राष्ट्रीय तालीम संघाचे ते पाच वर्षे अध्यक्ष होते.

महाराष्ट्र कुस्ती परिषद लक्ष देणार का?

बेळगाव सीमाभाग राजकीयद‍ृष्ट्या कर्नाटकात आहे. मात्र सांस्कृतिकद‍ृष्ट्या तो महाराष्ट्राशीच जोडला गेलेला आहे. शिवाय हा भाग महाराष्ट्राच आहे, असे महाराष्ट्र सरकार वेळोवेळी सांगते आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राने दावाही दाखल केला आहे. त्यामुळे बेळगाव सीमाभागातील मल्लांना कर्नाटकी न ठरवता त्यांना 'महाराष्ट्र केसरी' आखाड्यात प्रवेश दिला गेला पाहिजे.

…तर न्याय मिळू शकतो

सीमाभागातच विविध गावांत शंभरहून अधिक तालमी आहेत. नियमित सराव करणारे 500 हून अधिक कुस्तीगीर आहेत. सीमाभागात जिल्हा आणि मध्यवर्ती कुस्ती संघटना कार्यरत असून 25 हून अधिक छोट्या कुस्ती संघटना आहेत. या संघटनांनी कमिटी महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्याकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT