बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात नियोजित 23 नोव्हेंबरची सुनावणी काही दिवसांसाठी पुढे जाण्याची शक्यता होती. अखेर खंडपीठातील न्यायमूर्ती अनुपस्थित राहणार असल्यामुळे 23 नोव्हेंबर रोजीची सुनावणी लांबणीवर पडली आहे. शुक्रवारी (दि. 25) याचिकेवर सुनावणीची नवी तारीख निश्चित होणार आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी याआधी 30 ऑगस्टरोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी अचानक सुनावणी लागली असल्यामुळे तयारीसाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे सुनावणी लांबणीवर टाकावी, अशी विनंती कर्नाटकाच्या वकिलांनी केली होती. त्यावेळी न्यायमूर्तींनी खटल्यातील सुनावणी वारंवार लांबणीवर टाकण्यात येणार नाही. त्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल, असे सांगितले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने आवश्यक तयारी सुरू केली आहे. पण, त्रिसदस्यीय खंडपीठातील न्यायमूर्ती काही कारणास्तव अनुपस्थितीत राहणार असल्यामुळे 23 रोजीची सुनावणी लांबणीवर पडली आहे. शुक्रवारी महाराष्ट्राचे अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव न्यायालयाच्या नोंदपत्रिकेत या खटल्याची नोंद करणार आहेत. त्यानंतर पुढची तारीख जाहीर होईल.