तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे समारंभपूर्वक अडीच कोटींचा निधी मी सुपूर्द केला. त्यावेळी डावीकडून खा. सदाशिवराव मंडलिक, श्रीमंत शाहू महाराज, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, भरमू सुबराव पाटील, महापौर सौ. कांचन कवाळे, उदयसिंहराव गायकवाड, कल्लाप्पाण्णा आवाडे.  
Latest

सिंहायन आत्मचरित्र : हिमालयावर झेंडा

Arun Patil

पाच नोव्हेंबर 2020 रोजी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी 'पुढारी'ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. 'पुढारी' हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

'As we lose ourselves in the service of others, we discover our own lives and our own happiness.'
जेव्हा आपल्या हातून दुसर्‍यांसाठी काहीतरी भव्यदिव्य घडून जातं, तेव्हा आपल्याला फक्त आनंदच होतो असं नाही, तर आपल्याला आपलं जीवन सार्थकी लागल्याचीही प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. अशा वेळी आपल्या अंतर्मनाच्या गाभार्‍यातून उठणार्‍या आनंदलहरी अवर्णनीय अशाच असतात. त्याचं वर्णन करता येत नाही.

या उक्तीचा अनुभव मी कित्येकदा तरी घेतलेला आहे. हा अनुभव घेण्याचे क्षण मात्र माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या मार्गांनी येत असतात. ध्यानीमनी नसताना मला एखाद्या कार्यात स्वतःला झोकून द्यावं लागतं. किंवा मी त्यात ओढला जातो. अशा प्रकारे माझ्या वाट्याला येणारा प्रत्येक अनुभव हा माझं जीवन अधिक समृद्ध करणारी एक नवी संधीच असते, असं मी मानतो. परंतु, कारगिलचं युद्ध ही माझ्यासाठी देशसेवेची संधी घेऊन येईल, असं मात्र मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. काही काही घटनांच्या गर्भात दुसर्‍या घटनांचा जन्म लपलेला असतो, असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही. अशीच एक घटना घडली, 20 फेब्रुवारी 1999 रोजी.

जगातील सर्वात उत्तुंग रणभूमी असलेल्या सियाचीन येथे दै. 'पुढारी'च्यावतीने उभारण्यात आलेले आणि लष्करी जवानांसाठी संजीवनी ठरलेले हॉस्पिटल.

कविमनाचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यादिवशी एक ऐतिहासिक पाऊल उचललं. भारत आणि पाकिस्तानमधला तणाव कमी व्हावा, दोन्ही देशांनी गुण्यागोविंदानं नांदावं, ही त्यांची मनोमन इच्छा. दोन्ही राष्ट्रं शेजारी शेजारी. भारत एक लोकशाही देश म्हणून प्रगतिपथावर, तर पाकिस्तान कट्टर धार्मिक म्हणून पिछाडीवर. तिथल्या लष्करावरही धर्माचा पगडा. भारत सर्वधर्म समभावाचा पुरस्कर्ता, तर पाक कट्टर धर्मांध!

शिवाय तिथं स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच जनमानसात भारताविरुद्ध रुजवलेला दुस्वास. पुन्हा त्याला काश्मीरप्रश्नाची दिलेली झणझणीत फोडणी! भारतात कशा दहशतवादी कारवाया करता येतील, याच प्रयत्नात तिथले सत्ताधीश. भारतद्वेष हा तेथील सरकारचा एकमेव अजेंडा. जनमानसांवर प्रभाव टाकण्याचं एकमेव हत्यार. भारतात मात्र नेमकं उलट चित्र. भारतानं नेहमीच सामंजस्याची भूमिका घेतलेली. भाईचार्‍याच्या भूमिकेतून शेजारधर्म पाळलेला. त्यात आता पं. नेहरूंनंतर वाजपेयींच्या रूपानं देशाला लाभलेला दुसरा कविमनाचा पंतप्रधान! वाजपेयींना या दोन्ही देशांमधील तणाव कमी व्हावा, असं प्रामाणिकपणे वाटत होतं.

त्यासाठीच पुढचं पाऊल वाजपेयींनं उचललं. दिल्ली-लाहोर बससेवा सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 19 फेब्रुवारी 1999 रोजी ही सेवा सुरू करण्यातही आली. पहिल्याच बसमधून स्वतः वाजपेयी यांनी प्रवास केला. ते वाघा बॉर्डरपर्यंत गेले. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जातीनिशी बॉर्डरवरचा दरवाजा उघडला. वाजपेयींचं जंगी स्वागत केलं. दोघांनी एकमेकांना द़ृढालिंगन दिलं. वाजपेयींच्या सन्मानार्थ 19 तोफांची सलामी देण्यात आली. वाजपेयींच्या रूपानं किमान दहा वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या भूमीवर पाय ठेवला. यावेळी दोन्ही देशांत शांतता करार झाला. साहजिकच दोन्ही देशांतील तणाव निवळेल, अविश्वासाचं वातावरण कमी होईल, सदिच्छापर्व सुरू होईल अशी अपेक्षा होती; पण ती फोल ठरली.

दोस्तीचा हा सिलसिला पाकिस्तानी लष्कराला मानवला नाही. पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी लवकरच आपले खाण्याचे दात दाखवले! आणि कारगिलचे युद्ध भडकलं! पाकनं वाघा बॉर्डरवर वाजपेयींना 19 तोफांची सलामी दिलेली. आता त्याच तोफा भारताकडे वळून आग ओकू लागल्या.

1999 च्या मे महिन्यातील दुर्दैवी घटना. पाकिस्तानी लष्करानं घुसखोरांच्या वेशात कारगिलमध्ये घुसखोरी केली आणि युद्धाला तोंड फुटलं. शत्रू सुरक्षित ठिकाणी होता. मात्र, त्याच्याशी लढताना शूर जवानांना निसर्गाच्या रौद्र रूपाशीही सामना करावा लागत होता. मातृभूमीच्या रक्षणार्थ तळहातावर शिर घेऊन झुंजणार्‍या अनेक भारतीय जवानांना वीरमरण पत्करावं लागलं! तरीही हे भीषणयुद्ध सुरूच होतं.

सियाचीन ही उत्तुंग रणभूमी. तिथं लढताना भारतीय लष्कराला प्राणांची बाजी लावावी लागली. तिथं जवानांसमोर दोन शत्रू होते. एक पाकिस्तानी घुसखोर, तर दुसरा रौद्र रूप धारण केलेला निसर्ग. प्रतिकूल निसर्गामुळे जवानांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आणि सियाचीन येथे सुसज्ज हॉस्पिटलची नितांत गरज प्रकर्षानं अधोरेखित झाली.

सियाचीन हॉस्पिटलचे उद्घाटन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डावीकडून योगेश जाधव, मंदार पाटील, मी, ले. ज. अर्जुन रे आदी.

सियाचीनच्या समरांगणात आपलं लष्कर शत्रूशी कडवी झुंज देत होतं आणि इकडे देशात जनतेच्या मनात देशभक्तीचं स्फुल्लिंग पेटून उठलं होतं. शत्रूचा गळा घोटायला आता जनतेचेच हात शिवशिवलेले होते. 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' अशी अवस्था सार्‍या देशाची झालेली. त्याचवेळी नवी दिल्लीतील सेना मुख्यालयाचे अतिरिक्त महानिर्देशक मेजर जनरल पुरुषोत्तम दत्ता यांचं मला एक पत्र आलं. अर्थात, 'पुढारी'चा संपादक म्हणून मला त्यांनी पत्र पाठवलं होतं.

'आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंड' हा जवानांच्या कल्याणासाठी असलेला निधी. या निधीसाठी जनतेनं साहाय्य करावं म्हणून 'पुढारी'तून जनतेला आवाहन करावं, अशी दत्ता यांनी पत्रातून मला विनंती केली होती. खरं तर अशी पत्रं त्यांनी सगळ्या वृत्तपत्रांना पाठवली होती. 'आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंडा'साठी मदत करण्यासाठी लोकांना आम्ही वृत्तपत्रांनी आवाहन करावं, एवढीच त्यांची माफक अपेक्षा. स्वतंत्र निधी वगैरे उभा करण्याची त्यांची विनंती किंवा सूचना नव्हती; पण आम्हाला देशभक्तीचं बाळकडूच मिळालेलं. जवानांच्या वेल्फेअर फंडासाठी निधी देण्याचं आवाहन करणं, ही आमच्यासाठी सामान्य बाब. सर्वसामान्य बातमीइतकंच त्याला आमच्या लेखी महत्त्व.

अशा प्रकारचं केवळ कोरडं आवाहन करून गप्प बसणं, हे माझ्या मनाला पटणारं नव्हतं. या राष्ट्रीय यज्ञात आपल्याही समिधा पडल्या पाहिजेत. 'पुढारी'च्या वाचकांचा त्यात सक्रिय सहभाग असला पाहिजे, हा विचार माझ्या मनाला स्वस्थ बसू देत नव्हता. साहजिकच, या राष्ट्रीय कार्यासाठी एक स्वतंत्र लोकनिधी उभारण्याचा मी संकल्पच सोडला आणि मग मी 'पुढारी'तून जनतेला तसं आवाहन केलं.

'जरा याद करो कुर्बानी' या वाचकांच्या काळजाला हात घालणार्‍या मथळ्याखाली मी हे आवाहन प्रसिद्ध केलं. त्याचा योग्य तो परिणाम झाला. निधीचा प्रारंभही नेहमीप्रमाणं मी स्वतःपासूनच केला. यापूर्वीही पूरग्रस्त आणि भूकंपग्रस्तांसाठी 'पुढारी'नं निधी जमा केला होता. त्याला उदंड प्रतिसाद मिळालेला. अर्थातच त्या निधीतील पै न् पै सत्कारणी लागलेली. त्यामुळे 'पुढारी'वरील विश्वासाला आणखी बळकटी आलेली. परिणामतः 'पुढारी'तून आवाहन प्रसिद्ध झाले आणि हजारोंच्या संख्येनं मदतीसाठी हात पुढे आले!

आवाहन प्रसिद्ध झालं मात्र, आणि अगदी पहिल्या दिवसांपासूनच निधीसाठी रांगा लागल्या. केवळ कोल्हापुरातच नव्हे; तर सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, बेळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पणजी आणि अन्य शहरांतील 'पुढारी' कार्यालयांतून निधी स्वीकारण्याची सोय केलेली. तिकडेही झुंबड उडाली. समाजाच्या अगदी तळागाळातून लोक निधीसाठी सरसावले, हे विशेष!

सहकारी संस्था, सार्वजनिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, व्यापारी, उद्योगपती, विविध व्यावसायिक, शिक्षण संस्था, डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर्स या सर्वांनीच निधीला सढळपणानं हातभार लावला. इतकंच नव्हे, तर ज्यांचं हातावरचं पोट आहे अशा कष्टकरी, श्रमजीवी आणि कामगारांनीही पोटाला चिमटा काढून आपला खारीचा वाटा उचलला! वयोवृद्ध पेन्शनरांनी आपल्या तुटपुंज्या पेन्शनमधूनही निधीची रक्कम दिली, तर लहान बालबच्च्यांनी त्यांच्या वाढदिवसाला जमलेले खाऊचे पैसेही या निधीसाठी आनंदानं देऊन टाकले.

एक-दोन गुंठेवाल्या शेतकर्‍यापासून ते बड्या बागायतदारापर्यंत सर्व भूमिपुत्रांनीही आपला सहभाग नोंदवला. अक्षरशः दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांपासून ते थेट महानगरापर्यंत सर्व कानाकोपर्‍यातून निधीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अवघ्या दीड-दोन महिन्यांतच अडीच कोटींच्या घरात निधी जमा झाला! देशाच्या वृत्तपत्र इतिहासातील ही एक अभूतपूर्व घटनाच म्हणावी लागेल.

समारंभस्थळी लष्कर आणि शालेय मुलांनी आमचे असे स्वागत केले.

हा निधी उभारत असताना त्याचा पुरेपूर विनियोग व्हावा, ही माझी धारणा. नेमका त्याचवेळी एक प्रसंग घडला आणि मला ती कल्पना सुचली. त्या प्रसंगानं, सियाचीन रणभूमीवर जवानांसाठी एक सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याची आवश्यकता माझ्या मनात अधोरेखित झाली. प्रसंग असा घडला होता. माझे मित्र जनरल शिवाजीराव पाटील. त्यांचाही मुलगा सैन्यातच कॅप्टन. कारगिलच्या रणभूमीवर लढताना तो गंभीररीत्या जखमी झाला. सियाचीन येथे उपचाराची कसलीच सोय नव्हती. एअरक्राप्ट वा हेलिकॉप्टरनं त्याला थेट चंदीगडला नेण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. पण दुर्दैवानं हवामान प्रतिकूल. तिथं हेलिकॉप्टर उतरवणं अशक्य होतं. त्यांनी ही घटना माझ्या कानावर घातली आणि सियाचीनला हॉस्पिटल झालंच पाहिजे, या मतावर मी ठाम झालो.

मग मी कोल्हापुरातील अन्य माजी लष्कर अधिकार्‍यांकडूनही माहिती घेतली. कर्नल गायकवाड, मेजर शिवाजीराव थोरात, ब्रिगेडियर थोरात अशा बिनीच्या माजी अधिकार्‍यांशी मी चर्चा केली. 'सैनिक टाकळी' हे तर जवानांचंच गाव. म्हणूनच त्याला सैनिक टाकळी म्हटलं जातं. या गावालाही मी भेट दिली. तिथल्या माजी सैनिकांशीही मी बोललो. या सर्वांच्या
बोलण्यातून सियाचीन रणभूमी किती खडतर आहे, याची मला चांगलीच कल्पना आली. तिथं कसलीही वैद्यकीय सोय नव्हती.
'Nature causes more causulities than bullets.''
हा एका माजी लष्करी अधिकार्‍याचा सियाचीनबद्दल अभिप्राय होता! निसर्गाच्या कोपामुळे नव्हे, तर गोळीनं मृत्यू यावा, अशी लष्करी अधिकार्‍यांची आणि सैनिकांची रास्त भावना होती.

समजा, त्यातूनही त्या भागात हवामान चांगलं असलं, तरी एखाद्या जखमी जवानाला उपचारासाठी जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं ठरवलं, तर तिथून एअरलिफ्ट करून चंदीगडला आणावं लागायचं. त्यासाठी खर्च येत होता पन्नास हजार रुपये! थोडक्यात म्हणजे, सीमेवरच्या जवानांना शत्रूच्या गोळीची भीती वाटत नव्हती. भीती वाटत होती ती निसर्गाची! निसर्गाच्या लहरीमुळे आपण परत येऊ की नाही, ही भीती त्यांना भेडसावीत होती.

त्यानंतर मी नॉर्दन कमांड चीफ ले. जनरल अर्जुन रे यांच्याशीही चर्चा केली. मी गोळा केलेली माहिती आणि निधीसाठी लष्करानं केलेलं आवाहन या दोन्ही बाबींवर आम्ही प्रदीर्घ आणि सविस्तर चर्चा केली. त्यांनीही तेथील बिकट नैसर्गिक परिस्थितीची मला कल्पना दिली. त्यांना मी त्या परिसरात हॉस्पिटल बांधण्याचा माझा विचार असल्याचं जेव्हा सांगितलं, तेव्हा ते बेहद खूश झाले. त्यांच्या डोळ्यांतील चमक पाहूनच माझा निर्णय योग्य असल्याची मला खात्री पटली.

रे यांच्याशी बोलणं झाल्यानंतर मी थेट संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनाच फोन लावला. जॉर्ज यांचं बरंच आयुष्य मुंबईत गेलेलं. ते कामगार चळवळीतूनच पुढे आलेले. त्यामुळे ते खूप चांगलं मराठी बोलायचे. मी त्यांना सारी हकिकत सांगून, सियाचीनमध्ये हॉस्पिटल का नाही, अशी विचारणा केली.

तेव्हा ते मला म्हणाले, "विचाराधीन आहे. पण सरकारी लालफितीचा कारभार पाहता, तिथं हॉस्पिटल उभारायला अजून तीन-चार वर्षे तरी लागतील."
त्यावर मी त्यांना म्हणालो, "आपण चिंता करू नका. सियाचीनवर हॉस्पिटल उभं करण्याचा मी निर्णय घेतला आहे. त्यासाठी येणारा संपूर्ण खर्चही आम्हीच करू."

जॉर्ज यांच्यासाठी हा गोड धक्काच होता. ते विस्मयानंच उद्गारले, "जबरदस्त निर्णय! आपली ही कल्पना मला खूपच आवडली. आपण लवकरात लवकर त्यावर कार्यवाही करावी."
"सध्या आमच्याकडे एक कोटीचा निधी जमा झाला आहे. तिथं हॉस्पिटल उभारायला किती खर्च येईल; याचं एस्टिमेट पाठवा. आम्ही तेवढा निधी उभा करू." जी जॉर्जना म्हणालो.
"मी अधिकार्‍यांकडून माहिती घेऊन लगेच कळवतो. मात्र, आपला हा निर्णय ऐकून खरंच ऊर अभिमानानं भरून आला." जॉर्जनी सांगितलं.

"आम्ही रक्कम उभी करतो; पण ती स्वीकारण्यासाठी आपण कोल्हापूरला आलं पाहिजे. त्यानिमित्तानं इथल्या लोकांचं मन किती मोठं आहे, हेही आपल्याला कळेल." मी हमी दिली.
"मध्यरात्रीला बोलवा, मी हजर होईन. आपण हातात घेतलेलं काम हे साधंसुधं नाही. मला गर्व वाटतो आपला!" जॉर्ज उत्तरले.
त्यानंतर लगेचच त्यांनी हॉस्पिटल बांधण्यासाठी येणारा खर्च कळवला. ती रक्कम अडीच कोटींच्या घरात जात होती. मग, याच विषयावर रे यांच्यासह काही अधिकार्‍यांचेही मला फोन आले. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आणि निधी उभारण्याचा संकल्प मी केला.

सियाचीनला हॉस्पिटल व्हावं, ही संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांची तळमळीची इच्छा. त्यामुळे ते माझ्या सतत संपर्कात होते. आमच्या अनौपचारिक चर्चाही होत असत. अशीच चर्चा करीत असताना फर्नांडिस यांनी सांगितलेली एक आठवण मला चटका लावणारी आहे. फर्नांडिस नेहमीप्रमाणेच एका उत्तुंग शिखरावर जवानांना भेटायला गेले. जवानांनी त्यांचं रांगडं स्वागत केलं.

त्यातल्या दोन जवानांनी त्यांना अपूर्वाईनं वडापाव खायला दिला. वडापाव हा जॉर्ज यांचा अत्यंत आवडता खाद्यपदार्थ. ते मुंबईत राहिलेले. कामगार चळवळीत वावरलेले. त्यामुळे त्यांचं वडापाववर अत्यंत प्रेम. अगदी पंचपक्वान्न मिळाल्याच्या आनंदात त्यांनी तो वडापाव खाऊन टाकला. थोड्या वेळानं त्या जवानांशी गप्पा मारून जॉर्ज माघारी परतले आणि ती भयंकर घटना घडली! त्या चौकीवर अचानक पाकिस्तानचा हल्ला झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, अवघ्या काही क्षणामागे त्यांना वडापाव खायला देणारे ते दोन्ही जवान त्या चकमकीत शहीद झाले! ही आठवण जॉर्ज यांना नेहमीच अस्वस्थ करीत आलेली होती. जॉर्जनी तो अनुभव सांगितल्यावर मीही अस्वस्थ झालो.

'धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी।
मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा॥'

जेव्हा जेव्हा जॉर्जनी सांगितलेली ती घटना मला आठवते, तेव्हा तेव्हा कुसुमाग्रजांच्या या काव्यपंक्ती माझ्या मनात दाटून येतात.
वास्तविक, आर्मी सेंट्रल फंडात जमा झालेला निधी हा सर्वच कामांसाठी एकत्रितपणे वापरला जातो. विशिष्ट निधी विशिष्ट कामासाठीच वापरायची तशी पद्धत नव्हती. परंतु, मी मात्र आम्ही जमा केलेल्या निधीतून सियाचीन हॉस्पिटलची कल्पना मांडली. फर्नांडिस यांनाही ते बेहद आवडल्यामुळे त्यांनीही त्याला लगेच संमती दिली. त्यामुळे हॉस्पिटलसाठीच हा निधी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आणि माझी संकल्पना प्रत्यक्षात यायला काहीच अडथळा राहिला नाही.

अडीच कोटींच्या घरात निधी जमवण्यात मी यशस्वी झालो. मी जॉर्जना फोन करून निधी जमा झाल्याचं सांगितलं आणि 'निधी स्वीकारण्यासाठी कधी येत आहात?' म्हणून विचारलं. त्यावेळी जॉर्ज कोचीनमध्ये होते. त्यांनी तर तिथूनच इकडे येण्याचा मनोदय व्यक्त केला. या शुभकार्यात त्यांना वेळ दवडायचा नव्हता. त्यांनी मला सांगितलं, "मी कोचीनहून गोव्याला येतो. तिथून मला कोल्हापूरला न्यायची व्यवस्था करावी."

मी लगेचच कामाला लागलो. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंना फोन केला आणि त्यांना कल्पना दिली की, "सियाचीनमध्ये हॉस्पिटल उभारण्यासाठी 'पुढारी'नं निधी जमा केला आहे. तो स्वीकारण्यासाठी दस्तुरखुद्द संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस येणार आहेत. मात्र, त्यांना गोव्याहून राज्य शासनाच्या विमानानं कोल्हापूरला आणावं लागेल."

मुंडेही या कामाचं महत्त्व जाणून होते. त्यांना झालेला आनंद त्यांच्या आवाजातून लपत नव्हता. ते उत्स्फूर्तपणे उद्गारले, "बाळासाहेब, तुम्ही हे वाघाचं काम केलंत! आज खर्‍या अर्थानं सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला! आपण मला तारीख सांगा. मी त्या दिवशी स्वतः संरक्षणमंत्र्यांना घ्यायला गोव्यात हजर असेन!"

मी मुंडेंचे आभार मानून जॉर्जना पुन्हा फोन केला आणि राज्य शासनाच्या विमानाची तरतूद झाल्याचं त्यांच्या कानावर घातलं. त्यांनी लवकरच कोल्हापूरला येण्याची तारीख निश्चित केली. ती होती 2 ऑक्टोबर 1999. केशवराव भोसले नाट्यगृहात हा कार्यक्रम घेण्याचं मी ठरवलं.

उपमुख्यमंत्री मुंडे यांनी ठरल्याप्रमाणे जॉर्ज फर्नांडिसना गोव्याहून घेतलं आणि ते कोल्हापूरला वेळेवर येऊन पोहोचले. कार्यक्रमाची वेळ दुपारची, पण सकाळपासूनच लोकांची पावलं केशवराव भोसले नाट्यगृहाकडे वळू लागली. बघता बघता थिएटर गच्च भरून गेलं. कार्यक्रमापूर्वी लावण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारून गेलं होतं. देशभक्तीचं गारूड प्रत्येकाच्या मनावर आरूढ झालं होतं. व्यासपीठावर उभारलेली हुतात्मा स्मारकाची प्रतिकृती पाहून उपस्थितांच्या भावना हुतात्म्यांच्या प्रती दाटून येत होत्या. एकाअर्थी जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा कार्यक्रम होता.

कार्यक्रमाला माजी सैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी कारगिलच्या युद्धात जे वीरजवान धारातीर्थी पडले, त्यांच्या कुटुंबीयांनाही मदतीचे धनादेश प्रदान करण्यात येणार होते. ती कुटुंबेही त्या वीरमाता आणि वीरपत्नींसह आज उपस्थित होती. या देशातील जनतेवर कधीही न फिटणारं त्यांचं ऋण होतं. 'ऐ मेरे वतन के लोगो' या लतादीदींच्या आवाजातील गीतानं सर्वांचीच हृदयं हेलावून गेली होती. डोळ्यात अश्रू दाटून आले होते. तिथलं सारं वातावरणच आज हळवं झालं होतं.

अशा भारावलेल्या वातावरणातच मी जॉर्ज फर्नांडिस आणि गोपीनाथ मुंडे यांना घेऊन व्यासपीठावर आलो. बिगुलवर शोकधून आळवली गेली आणि सन्माननीय व्यासपीठापासून सर्वांचेच कंठ दाटून आले. अशा या भावगंभीर वातावरणातच कार्यक्रमाची सुरुवात झाली. मी फर्नांडिस यांना निधी प्रदान केला. या निधीबद्दल फर्नांडिस यांनी माझा आणि 'पुढारी'चा अत्यंत भावभरल्या शब्दांत गौरव केला.

"संपूर्ण देशात वृत्तपत्राकडून मिळालेला हा सर्वात मोठा निधी आहे!" अशा शब्दांत त्यांनी या उपक्रमाचं मनमोकळेपणानं तोंडभरून कौतुक केलं.

सियाचीनला जवानांसाठी आधुनिक आणि सुसज्ज असं हॉस्पिटल उभं करावं, अशी इच्छा मी व्यक्त केलेली. त्या माझ्या इच्छेला मान देऊन, खास जवानांच्या उपचारासाठी या निधीतून सियाचीनला परतापूर या ठिकाणी आधुनिक सोयींनी युक्त असं सुसज्ज हॉस्पिटल उभं करण्यात येईल, अशी घोषणा फर्नांडिस यांनी केली. टाळ्यांच्या गगनभेदी कडकडाटात त्यांच्या या घोषणेचं उत्स्फूर्त स्वागत झालं. आपण दिलेल्या निधीतील पै न् पै सत्कारणी लागणार, याची सर्वांनाच खात्री पटली आणि समाधान वाटलं.

फर्नांडिस यांनी तब्बल एक तास दहा मिनिटं भाषण केलं. काश्मीर प्रश्न कसा निर्माण झाला; यापासून ते कारगिल युद्धापर्यंतच्या घटनांचा त्यांनी लेखाजोखा मांडला. जणू ते आँखो देखा हाल सांगत होते. एप्रिलच्या अखेरीस कारगिलमध्ये घुसखोर कसे आले, इथपासून ते भारतानं हा रोमहर्षक विजय कसा मिळवला, याचं त्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांसमोर शब्दचित्रच उभं केलं. हा इतिहास रोमहर्षक असला, तरी त्यामध्ये अनेक बहाद्दूर जवानांची आहुती पडल्यामुळे त्याला दुःखाची किनारही होती.

आपण शर्थीनं गड राखला होता, पण त्या बदल्यात अनेक सिंह आपल्याला गमवावे लागले होते! अठरा हजार फूट उंचीवरील हे युद्ध. त्यात शत्रूला सोयीस्कर अशी स्थिती. अशा प्रतिकूल परिस्थितीत जवानांनी अतुलनीय पराक्रम गाजवून शत्रूचं कंबरडंच मोडलं! फर्नांडिस मूळचे कामगार नेते. त्यांची भाषा स्पष्ट आणि सडेतोड. त्यामुळे त्यांच्या तोंडून ही युद्धकथा ऐकताना सर्वांची छाती अभिमानानं फुलून आली होती, तर डोळ्यात अश्रू तरळले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT