पाच नोव्हेंबर 2020 रोजी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी 'पुढारी'ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. 'पुढारी' हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहे, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी
जीवन एक प्रवास आहे. कोण कोणत्या वाटेनं तो करतो, तर कोण कुठल्या मार्गावरून जातो. तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो. माणूस थांबला, तरी प्रवास थांबत नाही. हे गाडीसारखं असतं. माणूस थांबलेला असतो; पण गाडी पळतच असते. ती तुम्हाला मुक्कामाला घेऊन जातेच. परंतु, काही माणसं स्वतःची वाटचाल स्वतःच ठरवतात. त्या मार्गावरूनच आपली वाटचाल सुरू ठेवतात.
माझी वाटचाल अशीच. ती मी ठरवली आणि ठरवूनच पत्रकारितेच्या मार्गानं गेलो. एक-दोन नव्हे, तर सलग पन्नास वर्षांची वाटचाल. अथकपणे केलेली. कुठे खंड नाही, की सुट्टी नाही. अडथळ्यांची कधी तमा बाळगली नाही. ते दूर हटवून पुढे चालतच राहिलो. खरं तर थांबतो म्हणूनही मला थांबता येणार नव्हतं; कारण माझ्यासोबत 'पुढारी'चा कोट्यवधी वाचकवर्ग होता. माझी त्यांच्याशी कमिटमेंट होती. आजही आहे. पुढेही राहील. माझी त्यांच्याशी नाळ जुळलेली आहे. त्यांच्याही माझ्याकडून काही अपेक्षा आहेत. त्या मी पुर्या करीत आलेलो आहे.
मी सामाजिक बांधिलकी मान्य केलेली आहे. वाचकांच्या हाकेला नेहमीच प्रतिसाद दिलेला आहे. केवळ बातम्या छापल्या नाहीत, तर अन्यायाविरुद्ध दंड थोपटून उभा राहिलो. जनतेच्या प्रश्नात त्यांच्यासोबत राहिलो. म्हणूनच त्यांना मी आपला वाटतो. हे आपलेपण जपण्याची नि जोपासण्याची जबाबदारी माझी आहे. गेली पन्नास वर्षे ती मी पार पाडत आलोय. यापुढेही ती मी पार पाडीनच!
वाचकही 'पुढारी'शी बांधील आहेत. सकाळच्या चहाबरोबर त्यांना 'पुढारी' लागतो; अन्यथा त्यांना चहा गोड लागत नाही. माझा वाचक केवळ बातम्या वाचत नाही. विशिष्ट प्रश्नांवर माझं मत काय आहे, ते तो आजमावून बघतो. म्हणूनच माझी जबाबदारी वाढते. तरीही आता वय वाढलं, जबाबदारीची वाटणी करावी लागली. मागून येणारी पिढीही माझ्याच मार्गावरून वाटचाल करीत आहे. ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडते आहे. त्यांच्यासाठी वाट मोकळी करून देणं शहाणपणाचंच नाही का?
मीही माझ्या खांद्यावरच्या अनेक जबाबदार्या तरुणाईच्या खांद्यावर देऊन टाकल्या. तरीही पत्रकारितेचा लळा सुटत नाही. प्रेम आटत नाही; कारण 'पुढारी'च्या असंख्य वाचकांनाही मी हवा असतो. माझं अस्तित्व त्यांना प्रेरणा देत असतं. 'पुढारी'च्या पाना-पानावर त्यांना मी दिसावा लागतो. अग्रलेखातून मला त्यांच्याशी बोलावं लागतं. ही नाळ तुटतच नाही. तुटणारही नाही. मला माझा प्रवास चालू ठेवावाच लागेल.
पिढी बदलते. समाजही बदलतो. काळ पुढे चाललेला असतो. त्याबरोबर तंत्रज्ञानही बदलतं. तंत्रज्ञानातील बदल म्हणजे अधिक सहजता. ती कोणाला नको असते? शिवाय, स्पर्धा हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. स्पर्धेच्या राजकारणात नव्याचा स्वीकार अपरिहार्यच आहे. पत्रकारितेचं क्षेत्रही त्याला अपवाद नाही. मी ते पाहिले. अनुभवले आणि त्याचा स्वीकारही केला; मग ती आधुनिक छपाई यंत्रणा असेल, लेआऊट असेल किंवा छायाचित्रांमधील बदल असतील. मी ते त्वरित स्वीकारले. आत्मसात केले. वाचकांना ती अपूर्वाई वाटली. वाचक वाढला. मात्र, हे सर्व करताना, मूल्याधारित पत्रकारिता सोडली नाही. ती शिरोधार्य मानली. म्हणूनच सर्व तांत्रिक बडेजावाबरोबरच विश्वासार्हता महत्त्वाची. तो महत्त्वाचा अॅसेट आमच्याकडे होता.
आजही प्रिंट मीडियाची वाटचाल मूल्याधारित विश्वासार्हतेवरच सुरू आहे. त्यामुळेच आमचं जनतेशी नातं जुळलेलं होतं आणि आजही आहे. खरं तर हीच अपेक्षा सोशल मीडियाकडून करायला हवी. तशी ती केली, तर वावगं ठरणार नाही. सोशल मीडिया ही एकविसाव्या शतकाची डायनामिक देणगी आहे. एकविसाव्या शतकाच्या क्षितिजावरच सोशल मीडियानं बांग दिली आणि बघता बघता तिचा विस्फोट झाला. अवघ्या पंधरा-वीस वर्षांतच त्यानं अखिल मानव जातीलाच कवेत घेतलं. माणसांना अॅडिक्ट करून टाकलं. व्यसन लावलं. आता सकाळी उठल्या उठल्या माणसं मोबाईलवरचे मेसेज तपासून पाहतात आणि झोपतानाही मोबाईलचं नामस्मरण करूनच झोपी जातात.
एकंदरीतच, सध्या मोबाईल हे असं भूत आहे की, ते सर्वांच्याच मानगुटीवर बसलेलं आहे. त्यातून अगदी कामगारांपासून गर्भश्रीमंतांपर्यंत कुणीही सुटलेलं नाही. हल्ली तर काही काही भिकार्यांच्या हातातही हे इडियट डिव्हाईस दिसू लागलेलं आहे. एखाद्या शोधानं मानवी जीवन सुसह्य होणं वेगळं आणि त्यानं झपाटून टाकून मानवी जीवन दुसह्य होणं वेगळं. या सर्वच परिस्थितीचा सारासार विचार केला, तर संवादाचं एक माध्यम म्हणून उगम पावलेल्या सोशल मीडियानं आपल्या जीवनाचा फार मोठा भाग व्यापून टाकला आहे, हे निर्विवाद!
इतकेच नव्हे, तर त्यानं प्रस्थापित प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियालाही आव्हान दिलं आहे. सोशल मीडियाला पत्रकारितेचं लोकशाहीकरण अशी संज्ञा दिली जाते. सध्या या मीडियानं वर्तमानपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची मक्तेदारी मोडीत काढल्याचं चित्र दिसत आहे.
तथाकथित बातम्या देणार्या वेबसाईटस्, यूट्यूब चॅनेल, फेसबुक पेज, ट्विटर अकाऊंट, टेलिग्राम अशा असंख्य नावांनी आणि रूपांनी हा अजगर यूझर्सना मिठी मारून बसलेला आहे. त्यातून त्यांची सुटका नाही. त्याचे दुष्परिणामही भविष्यात भोगावे लागतील, यात शंकाच नाही. कारण, वास्तवाचा बोर्या वाजवण्यात सोशल मीडिया अग्रभागी आहे. आपले सुप्त हेतू साध्य करण्यासाठी पूर्वग्रह गोंजारण्यासाठी अनेक प्रकारची असत्य माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवली जातेय. साहजिकच, वापरकर्त्यांना ते खरंच वाटतं. अशा या आचरटपणातून फक्त माध्यमांचीच नव्हे, समाजाचीही विश्वासार्हता धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही; मग अशा या मानभावी समाजमाध्यमांकडून मूल्यवर्धित पत्रकारितेची अपेक्षा ती काय करायची!
सोशल मीडियाच्या या विस्फोटात आज प्रत्येक जण जणू पत्रकारच झालेला दिसतो आहे. तो स्वतःच बातमी लिहितो, फोटो काढतो, ते एडिट करतो आणि सोशल मीडियावर सोडून देतो. तसेच इतरांच्या येणार्या बातम्याही फॉरवर्ड करतो. आता त्यातील सत्यासत्यता कुणी पडताळून पाहायची? संपूर्ण जगाचा कारभार सध्या 'फिंगरटिप्स'वर येऊन एकवटलेला आहे, हे सध्याचं वास्तव आहे. एकंदरीतच, समाजमाध्यमे आणि डिजिटल दुनिया ही केवळ भारताचीच डोकेदुखी नसून, संपूर्ण जगामध्ये हा संसर्गजन्य रोग फैलावलेला आहे.
लोकसंख्येच्या बाबतीत आपला देश जगात दुसर्या क्रमांकावर आहे. कदाचित तो आता लवकरच पहिल्या क्रमांकावर येईल. सध्या तर भारताची लोकसंख्या 130 कोटींच्या घरात पोहोचलेली आहे. जितकी मोठी लोकसंख्या, तेवढी मोठी बाजारपेठ, हे सरळ-साधं सूत्र आहे. मग या बाजारपेठेत सोशल मीडियाही आपला माल विकायला बसणार नाही, असं कसं होईल? कोणतीही नवीन गोष्ट आणली, तर तिच्या विक्रीची हमखास गॅरंटी म्हणजे भारतीय बाजारपेठ!
मास मीडिया हे सतत उत्क्रांत होणारं क्षेत्र. त्यामध्ये बदल हे होतच राहतात. सुरुवातीला वृत्तपत्रं हेच जनसंपर्काचं प्रभावी साधन होतं; मग त्याची जागा रेडिओ आणि दूरदर्शन या सरकारी माध्यमांनी घेतली. तरीही तोपर्यंत सगळं काही ठिकठाक चाललं होतं. परंतु, त्यात मूलभूत बदल झाले आणि खासगी वृत्तवाहिन्यांचं पेव फुटलं. अर्थातच, हा जागतिकीकरणाच्या लाटेचाच साईट इफेक्ट होता; कारण त्यांच्यासोबत 24 तास तुम्हाला टी.व्ही.शी बांधून ठेवणारी मनोरंजनाची चॅनेल्सही सुरू झाली.
21 व्या शतकाची पहाट इंटरनेट घेऊन आली. इंटरनेटनं सगळी कार्यालयीन भाषाच बदलून टाकली. पाठोपाठ आलेल्या 'सोशल मीडिया'नं सारं जगच जिंकून घेतलं. जे सिकंदरला आणि हिटलरलाही जमलं नाही, ते सोशल मीडियानं करून दाखवलं. समाज, अर्थकारण आणि राजकारणाबरोबरच आपल्या जगण्यावरही त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. तो आमच्या मुंबईकरांनी परतवून लावला. दहशतवाद्यांचा समूळ निःपात केला. त्यावेळी आमचे मित्र विलासराव देशमुख घटनास्थळी भेट द्यायला गेले. त्यांच्यासोबत चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा होते. झालं! तेवढंच कारण पुरेसं झालं आणि विलासराव सोशल मीडियावर एवढे ट्रोल झाले की, त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. सोशल मीडिया काय करू शकतो, याची ही एक झलक!
दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरण असो वा अण्णा हजारेंचं रामलीला मैदानावरचं उपोषण असो, ही प्रकरणं सोशल मीडियानंच अधिक भडकपणे वाजवली होती. त्यामुळे केंद्र सरकार भुईसपाट झालं, हा इतिहास आहे. तसेच 2014 ची लोकसभेची निवडणूक सोशल मीडियानंच वाजवली आणि गाजवलीही! एकंदरीत काय, तर सोशल मीडियानं माणसांना नजरकैद करून टाकलंय. त्याच्या जगण्यावर त्यानं ताबा मिळवलाय. सुरुवातीला केवळ उच्चभ्रू वर्गातील लोकांना एकमेकांच्या संपर्कात राहण्याचं एक माध्यम म्हणून अवतरलेला हा सोशल मीडिया आज देशातील संभाषणाचं आणि प्रसाराचं सर्वात मोठं साधन बनलंय. उंटाचं पिल्लू वाटणार्या माध्यमाचा आता उंंट झालाय आणि त्यानं तंबूच फाडून टाकलाय!
अलीकडेच एका संशोधनाचे निष्कर्ष समोर आले. त्यानुसार लोक दररोज 75 मिनिटं सोशल मीडियाशी चिकटलेले असतात. फेसबुकपासून व्हॉटस्अॅपपर्यंत आणि टेलिग्रामपासून ट्विटर आणि इन्स्टाग्रामपर्यंत माणसं झपाटून चॅटिंग किंवा सर्फिंग करीत असतात. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, तरुणांबरोबरच आता वृद्धांनाही याचं वेड लागलेलं दिसून येतं. याचा दुष्परिणाम म्हणजे लोकांचं वृत्तपत्र वाचण्याचं आणि टी.व्ही. पाहण्याचं प्रमाणही कल्पनातीत घटलेलं आहे आणि शोकांतिका म्हणजे, माणसा-माणसांतला थेट संवादच बंद झालाय. एकाच कुटुंबात राहूनही माणसं विभक्तपणे जगत आहेत. प्रत्येकाचं जग वेगळं झालंय आणि दुर्दैवानं ते आभासी जग आहे, हे कुणाच्या लक्षातच येत नाही.
सोशल मीडियावर वापरकर्त्याला तत्काळ, मनसोक्त आणि अमर्याद व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळतं. पोस्ट लिहिणारा पत्रकार (?) आणि वाचक यांच्यात थेट संवाद साधला जातो. शिवाय, ही प्रक्रिया जिथल्या तिथं लगेच घडून येते. त्यासाठी कसलीच वाट पाहावी लागत नाही. त्यामुळेच सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांची संख्याही झपाट्यानं वाढत चाललेली आहे. वाढत्या संख्येबरोबरच इथं वापरकर्त्याला अमर्याद अधिकार मिळाल्याचं सकृतदर्शनी दिसून येतं. विशिष्ट चौकटीत हवं तेवढं व्यक्त होता येतं. त्याचा परिणाम वापरकर्ता त्यात नको तेवढा गुंतून राहतो. अर्थात, मुद्रित माध्यमांसारखा वितरणाचा खर्च इथं नाही. वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणासाठी होणार्या खर्चाची झंझटही नाही. त्यामुळे व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया हे विनाखर्चिक मोठंच व्यासपीठ ठरलं आहे, ही बाब नाकारता येत नाही.
कोणतंही माध्यम जेव्हा जन्म घेतं, तेव्हा त्याला नेहमीच दोन बाजू असतात. एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक. अर्थातच, त्याला सोशल मीडियाही अपवाद नाही. सकारात्मक द़ृष्टीनं पाहायचं झालं, तर समाजमाध्यमांनी आपल्याला कंटेंट म्हणजेच मजकूर किंवा माहिती निर्माण करण्याची क्षमता दिली. त्यात शाब्दिक मजकुराबरोबरच फोटोज् आणि व्हिडीओज्सुद्धा, हे सारंच आलं आणि हे सर्व होतं ते केवळ एका मोबाईल फोनच्या माध्यमातून! सध्या प्रत्येक फोन म्हणजे कॅमेरा आहे, टाईपराईटरही आहे आणि इंटरनेटशी जोडलेलं एक जादुई यंत्रही आहे. याचा अर्थ, इथं प्रत्येक जण कंटेंट निर्माण करू शकतो आणि ते प्रसारितही करू शकतो. अगदी फोटोंपुरतंच बोलायचं झालं, तर एक काळ असा होता की, तुम्हाला फोटो काढायचा असेल; तर तो स्टुडिओत जाऊन काढावा लागत असे किंवा फोटोग्राफरला घरी बोलावून फोटो घेतले जात असत. परंतु, आता मोबाईलमध्ये कॅमेरा आल्यानं कुणीही कुठेही फोटो काढू शकतो. आता तर सेल्फीचं फॅड एवढं आलेलं आहे की, फोटोंचा सुकाळच झालेला आहे. या प्रकारात फोटोग्राफर आणि फोटो स्टुडिओज् हे कायमचे लयाला गेले. इकडे कुणीच गंभीरपणे पाहिलं नाही. एक व्यवसायच बुडाला!
पुन्हा ग्रुपवर टाकलेला कंटेंट जर व्ह्युव्हर्सना आवडला, तर तो पटापट फॉरवर्ड होतो आणि काही क्षणातच लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. म्हटलं तर या माध्यमाच्या माध्यमातून सत्ताधारी राज्यकर्ते आणि समाजात गैरकृत्ये करणार्या लोकांवर वचकही बसवता येतो, ही जमेची बाजू. याउलट कुणा एखाद्याची नाहक बदनामी करून त्याचं राजकीय किंवा सामाजिक करिअर धोक्यात आणलं जातं, ही तोट्याची बाजू! याचा अर्थ, समाजमाध्यम हे जशी जागल्याची भूमिका बजावू शकतं, तसंच ते वेळप्रसंगी एखाद्याचं चारित्र्यहनन करण्याचं कामही करू शकतं. हे दुधारी शस्त्र आहे, याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे.
अर्थातच, प्रसारमाध्यम हे सामान्यांच्या हातातील एक खेळणं बनलेलं आहे. परंतु, त्या खेळण्यामध्ये दडलेला शक्तिशाली बॉम्ब कधी फुटेल, याची जाण आणि भान अद्याप लोकांना आलेलं नाही. जर या माध्यमाचा चांगलाच उपयोग करायचं ठरवलं, तर माहितीचं मुक्तवहन, विविध प्रकारची समानता, एकमेकांशी जोडून राहण्याची उपलब्धता, कुठूनही काम करण्याची आणि जगभरात कुठेही मुक्त संभाषण साधण्याची मोकळीक, हे समाजमाध्यमाचे फायदेही नाकारून कसे चालतील?
'मीडिया' हा शब्द तसा आपल्याला नवीन नाही. मात्र, त्याला मिळालेली 'सोशल' ही उपाधी तशी अलीकडची. हा सोशल मीडिया प्रत्येकाला आपलं वाटत असला, तरी त्याचं नियंत्रण करणारी यंत्रणा तुमच्यावर नजर ठेवून असते, याचं कुणाला भानच नसतं. जो सोशल मीडिया वापरतो तो स्वतःच सोशल मीडिया होऊन गेलेला असतो. परंतु, आपण कळसूत्री बाहुली आहोत आणि आपल्यावर कुणाचं तरी नियंत्रण असतं, हे यूझर्सच्या डोक्यातच येत नाही.
वर्तमानपत्रं किंवा टी.व्ही. चॅनेल्स या प्रसारमाध्यमांमध्ये तसा सर्वसामान्यांचा प्रत्यक्ष हस्तक्षेप असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. ती यंत्रणा वेगळीच होती आणि आजही तशीच आहे, हेही मुद्दाम नमूद करायला हवं. त्यामुळे विश्वासार्हतेच्या कसोटीवर आजही ते बावनकशी सोनंच आहे. या माध्यमांमध्ये पत्रकार, मालक, प्रकाशक, उद्योगपती वा राजकीय व्यक्ती आणि जाहिरातदार असे घटक असतात. परंतु, अशा प्रकारचा कुठलाही, कुणाचाही हस्तक्षेप असणार नाही, याची खबरदारी सोशल मीडियानं आधीपासूनच घेतलेली आहे. त्यामुळेच हा आपलासा वाटणारा सोशल मीडिया एक आभासी जग आहे, याचं यूझर्सना आकलन होईपर्यंत फारच वेळ झालेला असेल. तुमचा वैयक्तिक डेटा कुणाच्या तरी रेकॉर्डला कायमचा गेलेला असून, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, हे दुरुपयोग झाल्यानंतरच लोकांच्या लक्षात येईल!
खरं तर, डिजिटल विश्व ही आद्य क्रांतिकारक घटना. प्रत्येकासाठीच सोशल मीडिया हे एक व्यासपीठ. ते व्यासपीठ बनावं म्हणून त्यात वेळोवेळी अनेक सुधारणा करण्यात आल्या. बदल करण्यात आले. त्यासाठी सुरुवातीपासूनच पावलं उचलण्यात आली. यूझर्सच्या मनात कुतूहल कसं जागरूक ठेवण्यात येईल, याची दक्षता घेण्यात आली. असे नवनवीन प्रयोग करून लोकांना आपल्या भजनी लावताना, त्यातील कळीचे मुद्दे त्यांच्या ध्यानी येऊ नयेत, याचीही चिंता वाहिली होतीच.
लोकांना सोशल मीडियाशी बांधून ठेवण्यासाठी कंपन्यांनी अमाप पैसा खर्च केला. आकर्षक रंगसंगती, संवाद साधण्यासाठी असंख्य पर्याय त्यांनी निर्माण करून लोकांना चटक लावली. इतकेच नव्हे, तर ऑनलाईन गेम खेळण्यासाठीही विविध सुविधा उपलब्ध करून तरुणाईपासून वृद्धांपर्यंत सर्वांना कामाला लावलं. इंटरनेटचा आधार घेऊन हे जाळं अधिकच भक्कम करण्यात आलं. शिवाय, स्वतःचा अंतस्थ हेतू दडवून सर्वसामान्यांच्या आकलनापुरत्याच सुविधा त्यांना पुरवण्यात आल्या.
एकदा लोकांना अॅडिक्ट केल्यावर मात्र या कंपन्यांनी आपले खायचे दात दाखवायला सुरुवात केली. त्यांनी आपला व्यावसायिक चेहरा उघडा केला. सोशल मीडियावर दाखवण्यात येणार्या आकर्षक जाहिराती हाही त्या षड्यंत्राच्याच भाग होत्या. हळूहळू वापरकर्ते त्यांचे प्रॉडक्टस् ग्राहक बनून गेले. आता व्यवसायवृद्धी करायची; तर माणसांच्या गरजा, आवड-निवड या बाबी महत्त्वाच्या आणि मग एकदा लोकांच्या आवडी-निवडी समजल्यावर, या कंपन्यांनी माणसांच्या वैयक्तिक आयुष्यातही ढवळाढवळ करायला सुरुवात केली आणि ते अपरिहार्यच होतं.
आता हा कंपन्यांचा मुजोरपणा उघड होऊ लागल्यामुळे खरं चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात झाली. सोशल मीडियाचा मुखवटा गळून पडला. परंतु, कोट्यवधी लोक जे अॅडिक्ट झाले, त्यांचं काय? तो तर त्यांच्या हक्काचे ग्राहक आहेत.
अल्गोरिदम म्हणजे सूचनांचा संच. सोशल मीडिया असो वा अन्य आधुनिक प्रणाली, त्या त्यांच्या अंगभूत अल्गोरिदमच्या तालावरच चालतात. या अल्गोरिदम किंवा सूचनांच्या आधारे प्रश्न सोडवायचा किंवा समोर ठेवलेलं टास्क पूर्ण करायचं. हेही एक प्रकारचं नियंत्रणच.
सोशल मीडियावर अनेक व्यासपीठं आहेत. अशा व्यासपीठावर यूझरचं अकाऊंट कसं दिसावं, त्यानं आपली माहिती कशी मांडावी तसेच इतरांची माहितीही कशी मिळवावी, इतरांशी संवाद कसा साधावा, यासारख्या अगदी क्षुल्लक असणार्या गोष्टींचंही अल्गोरिदम तयारच असतं. त्यामुळे यूझर्सना आपलं डोकं अजिबात चालवावं लागत नाही. एका अर्थानं यूझर सोशल मीडियाच्या निर्मात्याची वेठबिगारीच करीत असतो. स्वतःचा मेंदू गहाण ठेवून, दुसर्याचा मेंदू भाड्यानं घेतल्यासारखाच प्रकार असतो हा! आणि एकदा वेठबिगारी स्वीकारल्यावर स्वतःचं मत तरी कुठे राहतं? वेठबिगाराला स्वतःचं मत नसतंच.
शिवाय, वापरकर्त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी अल्गोरिदम आहेच की! म्हणजे लग्न करून ब्रह्मचारी अशी अवस्था. बरं, आजचा सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या आवडी-निवडीभोवतीच थांबला आहे का? तसं मुळीच नाही. त्यानं तर आता आपल्या व्यासपीठावरून आर्थिक व्यवहारही करण्यास सुरुवात केलीय. म्हणजेच सोशल मीडियानं आता वापरकर्त्यांचे आर्थिक व्यवहारही आपल्या ताब्यात घेतलेत. त्याला चारी बाजूंनी घेरून टाकलंय.
सोशल मीडिया नावाच्या या राक्षसानं माणसाचं आयुष्य कसं जायबंदी करून टाकलंय, यावर 'सोशल डिप्लोमा'सारखे माहितीपटही आता प्रदर्शित झालेले आहेत; पण पाहतो कोण आणि त्याचा गांभीर्यानं विचार तरी कोण करतो? बरं, असे माहितीपट पाहायचे तरी कुठं? त्यासाठीही यूट्यूब न्यूजसारख्या चॅनेलचाच आधार घ्यावा लागेल. बरं, या प्रवृत्तीवर आवाज उठवायचा झाला, तरी तो सोशल मीडियावरूनच उठवावा लागेल. तसा एखाद्यानं प्रयत्न केलाच, तर त्याला प्रतिसाद मिळणार आहे का? शक्यच नाही. कारण, कोट्यवधी यूझर्स तुमच्या आवाजात आपला आवाज मिसळतीलच याची खात्री काय? त्यामुळे तुम्हीच टार्गेट व्हाल आणि खड्यासारखे बाहेर फेकले जाल!
सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या लक्षात एक गोष्ट कधीच येत नाही की, जगात फुकट काहीच मिळत नाही आणि पदरमोड घालून कुणी जगाला पोसत नाही. इथं एक पैसा पेरला; तर पैशाचं झाड कसं उगवेल, याचा विचार करणारी व्यावसायिक जमात आहे. त्यामुळे सोशल मीडियाची सेवा सकृतदर्शनी जरी मोफत वाटत असली, तरी तशी ती मुळीच नाही. मोबाईलचं बिल भरताना किंवा प्रीपेड फोन रिचार्ज करताना अमुक जीबी डेटा फ्री वगैरे गाजरं ग्राहकांसमोर धरली जातात; पण ती फसवी असतात. त्या बिलामध्ये इंटरनेट डेटा यूज केल्याची किंमत गृहीत धरलेलीच असते. त्याशिवाय विविध प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध करून ते आपला ग्राहक म्हणूनही उपयोग करून घेत असतात, हे लक्षात कोण आणि कधी घेणार?
अलीकडच्या काळात 'डेटा इज न्यू ऑईल' हा परवलीचा कोडवर्ड झाला आहे. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर वापरकर्ता आपली माहिती आणि डेटा अनेकदा पोस्ट करीत असतो. याच डेटाच्या आधारानं संबंधित कंपन्या आपल्यासमोर त्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करीत असतात. ही खुबी वापरकर्त्यांच्या कधीच लक्षात येत नाही. तो त्यांच्या या डावाला फशी पडतो. एकंदरीत काय, तर या सोशल मीडिया कंपन्या एक आयतं गिर्हाईक म्हणूनच वापरकर्त्यांची बोली लावून मोकळ्या होतात. म्हणूनच समाजमाध्यमांबाबत समाजहिताचा जो दावा केला जातो, तो पूर्णपणे फसवा आहे. या माध्यमांना सोशल का म्हणायचं, हा कळीचा प्रश्न आहे आणि तो अनुत्तरितच आहे.
माध्यमं म्हटलं की, व्यवहार हा आलाच. समाजसेवा किंवा समाजहित हे तर केवळ मुखवटे. खरं तर माध्यमाचं जग हा एक मोठा व्यवसायच आहे. ती एक बलाढ्य अशी आर्थिक व्यवस्था आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर ही त्यांची अपरिहार्यता बनली आहे. माध्यमांचा अर्थ राजकीय आणि सांस्कृतिक भलावण करणारी संस्था असाही होतो. तंत्रज्ञानानं लिप्त असं हे माध्यमांचं विश्व गुंतागुंतीचं बनलं आहे. ते प्रचंड वेगवानही आहे. इथं रोज काही तरी नवीन जन्माला येत असतं आणि पहिलं स्वर्गवासी होत असतं! साहजिकच, जेव्हा एखादा सोशल मीडिया आपला सोशल हा शब्द बेगडीपणानं वापरू लागतो, तेव्हा त्याच्या वापरकर्त्यांनी अधिक सजग होण्याची गरज असते.
मात्र, माध्यमं वापरण्याची सवय ही आता वापरकर्त्यांसाठी एक व्यसन बनून गेल्यामुळे बर्यावाईटाचा विचार करण्याची त्याची सद्सद्विवेक बुद्धीच नष्ट झालेली असते. लाईक, शेअर, सबस्क्राईब यासारखी प्रचलित होणारी भाषा ही मुख्य प्रवाहातील मीडियाची नव्हे, हे आता लक्षात घेतलं पाहिजे. परंतु, दुर्दैवानं या शब्दांमुळेच व्यक्त करण्यात येणार्या मजकुराला आशय प्राप्त करून दिला आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात पोचही मिळून जात असते. त्यामुळेच ती आता आजच्या पिढीची अधिकृत भाषा ठरू पाहतेय.
सकृतदर्शनी यामध्ये काही गोष्टी या समाजहिताच्या जरूर भासतात. तशा त्या आहेतही. परंतु, त्या समाजहिताच्या गोष्टींचाच वापर समाजविघातक गोष्टींच्या प्रसारासाठी होतो आहे. त्याचं काय? मात्र वर्तमानपत्रासारख्या मुख्य प्रवाहातील माध्यमांतून सहसा असले प्रकार घडत नाहीत. तिथं प्रत्येक टप्प्यावर चाळण्या असतात. त्या प्रत्येक चाळणीतून चाळून, अगदी तावून-सुलाखूनच एखादी बातमी छापली जात असते. तसेच अंकातून प्रसिद्ध होणार्या अग्रलेखातील मतं, ही त्या संपादकाची स्वतःची मतं असतात आणि त्याची जबाबदारी त्यानं स्वीकारलेली असते.
मात्र, सोशल मीडियावर अशा काही चाळण्या नाहीत. कसले निकष नाहीत आणि चाळणी तरी कोण कुणाला लावणार? इथं सारीच बेबंदशाही आणि बेबंदशाहीत नेहमीच घातक विचारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळत असतं. उलट या कंपन्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उदो उदो करीत राहतात. यातून होणारे तोटे किती गंभीर स्वरूपाचे आहेत, याची कुणकुण आता लागलेली आहे; पण व्यसनाचं काय? दारूचं व्यसन वाईट असतं, हे प्रत्येक दारूड्याला ठाऊक असतं. तरीही संध्याकाळ झाली की, त्याचे पाय गुत्त्याकडे वळतात. अगदी तसंच सोशल मीडियाच्या अॅडिक्शनचं आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्याशिवाय माणूस त्यापासून माघारी वळत नाही आणि जोपर्यंत यूझर्स स्वतःहूनच माघारी वळणार नाही, तोपर्यंत कंपन्या त्याचा फायदा उपटतच राहणार, यात शंका नाही.
कदाचित आज ना उद्या या सोशल मीडियाधारक कंपन्या काही चाळण्या निर्माण करतीलही; पण त्याला खूपच उशीर झालेला असेल. म्हणून सद्यपरिस्थितीत यावर सामाजिक जागृतीची नितांत आवश्यकता आहे. सततच्या समुपदेशनानंच कदाचित यूझर्स या आभासी दुनियेपासून माघारी वळू शकतील.
माध्यमांच्या सुरुवातीच्या टप्प्यात लोकशिक्षणाला अधिक महत्त्व होतं. किंबहुना, तो माध्यमांचा महत्त्वाचा उद्देश होता. पुढे जाऊन माध्यमांनी राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्राला उत्तेजन देण्यातही हातभार लावला. इतकंच नव्हे, तर उद्योग-व्यवसायावर आधारलेल्या आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेच्या निर्मितीलाही त्यांनी उत्तेजन दिलं. त्यातूनच पुढच्या टप्प्यात आर्थिक उतरंडीवर आधारित राजकीय आणि सांस्कृतिक मक्तेदारी जन्माला आली. एका अर्थानं सार्वभौमत्वच झालं.
आता अलीकडच्या सोशल मीडियाचा लेखाजोखा पाहिला, तर त्याची सध्याची वाटचाल ही संपूर्ण मक्तेदारीकडेच झुकणारी आहे, असं म्हणावं लागेल. सोशल मीडियानं माध्यमांचं लोकशाहीकरण केलं, हा निव्वळ भ्रम आहे. उलट त्यांनी लोकशाहीच्या होळीवर स्वतःची पोळी भाजून घेतली. माध्यमांचा आत्मा तंत्रज्ञान आहे. साहजिकच, त्याला मर्यादाही आहेत आणि जे काही तंत्रज्ञान त्यांच्या हाती आहे, त्याचा उपयोग ते वापरकर्त्यांचा डेटा पुरविणार्या खासगी कंपन्यांच्या फायद्याच्या अनुषंगानंच आहे, हे उघड सत्यच म्हणावं लागेल. म्हणूनच सध्याच्या घडीला गरज आहे, ती सोशल मीडियाच्या आधारानं चालणार्या सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक तसेच राजकीय व्यवहार आणि त्यांचे परिणाम तपासून पाहण्यासाठी तसेच त्यांची गती समजून घेण्यासाठी यंत्रणा उभी करण्याची.
सध्या तरी सोशल मीडियाचा विस्तार भयंकर झपाट्यानं होत आहे. साहजिकच, त्याचा वापर करणार्यांची संख्याही विस्फोटाच्या दिशेनं चाललेली आहे. मात्र, त्यामानानं त्यातील तंत्रज्ञानाची आणि तयार होणार्या कंटेंटची जाण मात्र वापरकर्त्यांना अत्यल्पच आहे. तरीही किंवा म्हणूनच त्याचा अतिरेकी वापर होताना दिसतो. त्यातून काही गंभीर प्रश्नही निर्माण होतात. त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मीडियाला नियंत्रणात ठेवण्यासाठी, त्याला वेसण घालण्यासाठी सरकारनं आता कायदे करणं अत्यावश्यक होऊन बसलेलं आहे.
खरं तर वापरकर्त्यांची समज वाढणं ही सामाजिक गरज आहे. त्याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. खरंच सोशल मीडिया हा सोशल आहे का? हा प्रश्न पुन:पुन्हा मनाला भेडसावत राहतो. फायद्याच्या हव्यासापोटी तोट्याची काळी बाजू जन्म घेत असते, हे मी माझ्या पन्नास वर्षांच्या पत्रकारितेच्या कार्यकाळात जवळून अनुभवलंय. समाजमाध्यमांची ही दुसरी बाजू तर गंभीर समस्या निर्माण करणारीच. त्यातून होणारी हानी कल्पनातीत असू शकते. यातून जशा राजकीय आणि सामाजिक उलथापालथी घडू शकतात तसेच अनेकदा निष्पाप मुली आणि महिलांवर अत्याचारही होऊ शकतात. अनेकदा अशाही घटना घडल्या आहेत की, अनेक निष्पाप मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून मोबाईलमध्ये त्यांचे नको त्या अवस्थेतील फोटो काढले जातात. व्हिडीओही केले जातात आणि ते समाजमाध्यमावर टाकण्याची धमकी देऊन त्यांना वारंवार ब्लॅकमेल केलं जातं.
सोशल मीडियानं व्यक्तीला दिलेल्या अधिकारांचा हा गैरवापर असून, तो लोकांना आयुष्यातून उठवूही शकतो. दुर्दैवानं त्यावर मीडियाचाही वचक नाही. कुठलीही पोस्ट सेन्सॉर करूनच ती प्रसारित करण्याची यंत्रणाच त्यांच्याकडे नाही. त्यामुळे सोशल मीडियामधील चित्रफिती आणि छायाचित्रांमुळे अनेकदा दंगली उसळल्याचंही आपण अनेकदा पाहतो. अशा दंगलीतून आणि तोडफोडीतून जीवरक्षक गणली गेलेली रुग्णालयेही सुटलेली नाहीत. अनेकदा तर अशाप्रकारची माहिती हेतूपुरस्सर पसरवून सामाजिक किंवा राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी कधी कधी सरकार त्या विशिष्ट विभागापुरती समाजमाध्यमांवर बंदी घालते. परंतु, ही तात्पुरती मलमपट्टी झाली.
याबाबतीत काश्मीरचं उदाहरण ज्वलंत आहे. तिथे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून देशविघातक कृत्यांना चालना मिळत असल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. सोशल मीडियाच्या अनिर्बंधतेचाच हा परिपाक नव्हे का?
सोशल मीडियासमोर असलेलं सर्वात मोठं आव्हान कुठलं असेल, तर ते फेक न्यूजचं. सोशल मीडियाचं हे जगच इतकं मोठं आहे की, या एवढ्या अवाढव्य पसार्यामध्ये कोणता प्लॅटफॉर्म विश्वासार्ह आहे आणि कोणता नाही, हे वापरकर्त्याच्या पटकन लक्षात येणं कठीणच असतं. अनेकदा विश्वासार्ह नसलेल्या प्लॅटफॉर्मला कसा शह द्यायचा, हा आज प्रस्थापित माध्यमांपुढे पडलेला मोठा प्रश्नच आहे. किंबहुना, ते एक आव्हानच आहे.
वाचकांना आकर्षित करण्यासाठी भडक हेडलाईन देणं, उलटसुलट करून मथळे देणं, हास्यास्पद शब्दांचा वापर करणं, यासारखे यूझर्सची दिशाभूल करणारे प्रकार सर्रास चालू असतात. त्याचा प्रतिकूल परिणाम माध्यमांच्या प्रतिमेवरच होत असतो. ती बदनाम होत असतात; पण तिकडे लक्ष कोण देतो?
एकंदरीतच माझ्या पत्रकारितेचा प्रवास मूल्याधारित पत्रकारिता आणि समाजप्रबोधनापासून आजच्या सोशल मीडियाच्या फिंगरटिप्सपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. काळाची गरज म्हणून मीही त्या-त्या वेळी त्याच्या बदलांना सामोरा गेलो. आता तर माझी पुढची पिढीही ऑनलाईन न्यूज पोर्टल, रेडिओ चॅनेल, युट्यूब यासारख्या आधुनिक माध्यमांना सामोरी गेली आहे. परंतु, आताचा सोशल बदल हा संपूर्ण समाजच ढवळून काढणारा आहे, हेही तितकंच खरं. एकंदरीत सध्याची ही बदलाची गती पाहता उजाडणारा दिवस कोणतं नवीन तंत्रज्ञान घेऊन उगवतो, याची सकाळी उठताना खात्रीच नसते.
बदल हा अपरिहार्यच असतो. तो निसर्गाचाच नियम आहे. परंतु, त्या बदलाचा झपाटा इतकाही अनिर्बंध असू नये, की तो स्वीकारता स्वीकारता नाकीनऊ यावेत. मात्र, या उधळलेल्या वासराच्या गळ्यात लोढणा बांधून त्याची धाव रोखण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे, ही समाधानाचीच बाब. केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील संघर्ष अलीकडेच आपण पाहिला. ही फक्त सुरुवात आहे. भविष्यात सोशल मीडियाच्या मुसक्या आवळल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही.
एक मात्र खरं, की प्रिंट मीडिया असो वा इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्यांनाही आता सोशल मीडियाच्या गतीनंच वाटचाल करावी लागेल. येणार्या प्रत्येक अत्याधुनिक तंत्राचा स्वीकार करावा लागेल. कारण कितीही झालं, तरी बदलाची गती थांबवता येत नाही आणि मग त्या गतीशी तुम्ही जुळवून घेतलं नाही, तर तुम्ही केवळ मागेच पडणार नाही, तर मोडून पडाल. पायदळी तुडवले जाल! मात्र, अशा बदलांना सामोरं जाताना सत्याची चाड बाळगावी. आपण समाजाला वेड लावण्यासाठी नाही, तर समाजाला शहाणं करण्यासाठी हा वसा घेतलेला आहे, याची जाण आणि भान सदैव ठेवावं लागेल.
काळाची पावलं ओळखून दैनिक 'पुढारी'ने ई-पेपर 1999पासून सुरू केला आहे. या ई-पेपरमध्ये आम्ही वेळोवेळी बदलही केले आहेत. डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांच्या कल्पनेतून 2015 ला दैनिक 'पुढारी'ची वेबआवृत्ती सुरू झाली, त्याच वेळी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'पुढारी'च्या बातम्या उपलब्ध होऊ लागल्या. तर 2017 ला अँड्रॉईड आणि आयओएससाठीचे अॅपही लाँच करण्यात आले. जुलै 2020 ला अॅप आणि वेबसाईट नव्या रूपात आणि आधुनिक तंत्रज्ञानासह वाचकांसाठी सादर करण्यात आली. फेसबुक आणि युट्यूबवरील डिजिटल व्हिडीओमध्येही दै.'पुढारी'ने मोठी भरारी घेतली आहे. दररोज काही लाख वाचक 'पुढारी'च्या डिजिटल सेवांचा लाभ घेतात. तर दै.'पुढारी'चे डिजिटल व्हिडीओ पाहणार्या वाचकांची संख्या कोटीत आहे.
काही बहुराष्ट्रीय कंपन्यांशीही 'पुढारी'ने परस्पर सहकार्य करार केला आहे. जेणेकरून डिजिटल अवकाशात 'पुढारी'च्या विश्वासार्ह बातम्या, व्हिडीओ असा कंटेंट वाचकांना मिळेल.
येत्या काळात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मेटाव्हर्ससारखे जे बदल होतील, त्याला सामोरे जाण्याची तयारी डॉ. योगेश यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यासाठी लागणार्या क्षमता ते विकसित करत आहेत. या नव्या बदलांना सामोरे जाताना 'पुढारी' एक पाऊल पुढेच असेल.
मी आयुष्यभर प्रिंट मीडिया हाताळला. साखळी वृत्तपत्रांच्या स्पर्धेतही ताठ मानेनं उभा राहिलो. काळानुरूप योग्य ते बदलही केले. काळाबरोबर राहिलो. प्रत्येक पिढीशी मैत्री केली. त्यांची भाषा आणि प्रश्न समजून घेतले. त्यांच्या नावीन्याचा गौरव करताना मी ते आत्मसातही केलं. माझ्या यशस्वीतेचा वा जीवन प्रवासाचा मूलमंत्र सांगायचा झाला, तर भविष्याचा वेध घेत काळानुरूप बदल हाच होय. कारण बदल स्वीकारायलाच हवा. प्रत्यक्ष श्रीकृष्णांनीच गीतेमधून हा दिव्य संदेश दिलेला आहे.
'जो आज तुम्हारा है, कल किसी और का था ।
परसो किसी और का होगा ।
परिवर्तन संसार का नियम है ।'