पाच नोव्हेंबर 2020 रोजी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी 'पुढारी'ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. 'पुढारी' हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी
वर्ष 1999…
एक चिनी म्हण आहे,
'If you are planning for a year, sow rice; if you are planning for a decade, plant trees; if you are planning for a lifetime, educate people.'
या उक्तीप्रमाणेच जर तुम्हाला कोणतीही संस्था किंवा कोणताही उद्योग वा व्यवसाय वाढवायचा असेल, ऊर्जितावस्थेला आणायचा असेल, तर त्यासाठी दूरदृष्टी योग्य असं प्लॅनिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. 'पुढारी'ची उभारणी करतानाही मी सदोदित प्लॅनिंगलाच महत्त्व दिलं आणि त्याबरहुकूम पावलं टाकीत राहिलो. अत्यंत जिद्दीनं, चिकाटीनं आणि कष्टानं उद्यावर नजर ठेवून मी 'पुढारी'चा शकट हाकत राहिलो.
आणि त्याचाच शुभपरिणाम म्हणून 1 जानेवारी 1999 हा दिवस 'पुढारी'च्या कारकिर्दीतला एक मानाचं पान ठरला. याच दिवशी 'पुढारी'नं पाच तपांची वाटचाल पूर्ण करून आपला हीरक महोत्सव साजरा केला! साठ वर्षांपूर्वी आबांनी 'पुढारी' नावाचं एक लहानसं रोपटं लावलं होतं आणि आज त्याचा 'वेलू गगनावेरी' गेला होता! कर्नाटकचा काही भाग आणि गोव्याचं सीमोल्लंघन करता करता, राज्याच्याही सीमा ओलांडून 'पुढारी'च्या नावापुढे 'अखिल भारतीय' ही उपाधी कधी लागली, ते आमचं आम्हालाही कळलं नाही. प्रिंटबरोबरच आता इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे सार्या देशातील मराठी वाचकांच्या जीवनाचा तो एक अविभाज्य अंग बनून गेला.
वाचकांचा अढळ विश्वास आणि सर्वसामान्यांशी असलेलं अतूट नातं, ही तर 'पुढारी'ची जन्मजात कवचकुंडलं! जनसामान्यांच्या कोणत्याही प्रश्नात 'पुढारी' नेहमीच आघाडीवर होता, आहे आणि पुढेही राहील, यात शंकाच नाही. गेल्या साठ वर्षांत हळूहळू 'पुढारी' हे लोकविद्यापीठ बनले आहे, ही बाब निर्विवाद खरी. हीरक महोत्सवानिमित्त लिहिलेल्या अग्रलेखात या सर्व उत्कट भावना मी व्यक्त केल्या होत्या. तसेच जनताजनार्दनानं गेल्या साठ वर्षांत 'पुढारी'वर जे प्रेम केलं, त्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली होती.
स्वाभाविकच, हीरक महोत्सवानिमित्त 'पुढारी'वर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी सकाळपासून ते रात्रीपर्यंत, अगदी उशिरापर्यंत सर्व थरातील लोकांची अगदी रीघच लागली होती. देशातील उच्चपदस्थ राजकीय नेते, उद्योगपती, सहकारातील दिग्गज तसेच कला-क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह अक्षरशः अनेकांचे शेकडो फोन येत होते आणि त्याहूनही हजारो लोकांनी जातीनं उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी आम्ही 'पुढारी'चा रौप्य महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव स्वतंत्र समारंभ घेऊन दणक्यात साजरा केला होता. मात्र, हीरक महोत्सवाचा स्वतंत्र असा औपचारिक समारंभ आम्ही घेतला नाही. तरीही या अनौपचारिक सोहळ्यालासुद्धा प्रमुख अतिथी तेवढ्याच तोलामोलाचा आणि 'पुढारी'च्या परंपरेला साजेसाच होता. अतिथी होत्या, जगद्विख्यात गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर! आपल्या सर्वांच्या लाडक्या लतादीदी! आम्ही पत्रकार हे शब्दांचे जादूगार असलो, तरी शब्दांना साज चढवून त्याचं गीतामध्ये रूपांतर करण्याची किमया लतादीदींचीच! त्यांचा चाहता वर्ग, अगदी तानसेनांपासून ते कानसेनांपर्यंत जगभर पसरलेला. 'पुढारी'चा हीरक महोत्सव म्हटल्यानंतर घरचंच कार्य समजून त्या तत्परतेनं आल्या आणि त्यांच्या उपस्थितीनं 'पुढारी'चा सन्मान वाढला, असं म्हटलं तरी ते वावगं होणार नाही.
'जैसें अंगाचेनि सुंदरपणे।
लेणियासी आंगचि होय लेणें।
अलंकारिसें कवण कवणे।
हे निर्वचेना॥'
ज्ञानेशांचं हे वचन 'पुढारी'च्या हीरक महोत्सवाला तंतोतंत लागू पडतं. कारण या कार्यक्रमात 'पुढारी' आणि लता मंगेशकर हे द्वैत, 'अंगाचेनि सुंदरपणे। लेणियासी आंगचि होय लेणें' अशा स्वरूपाचंच झालं होतं. अशा स्थितीत कुणी कुणाला शोभा आणली, याची निवड करता येत नसते.
हा कार्यक्रम छोटेखानी असला, तरी 'पुढारी'च्या परंपरेनुसार 'चार चाँद' लावणारा असाच होता. सनईच्या महन्मंगल सुरांनी सारं वातावरण शुभ आणि मंगलमय होऊन गेलं होतं. ठायी ठायी उत्साह आणि हर्षोल्हास ओसंडून वाहत होता. अशा चैतन्यमय वातावरणात आणि तुतारीच्या मधूर निनादात गानकोकिळेचं आगमन झालं आणि वातावरण भारून गेलं. लतादीदींनी आपल्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून हीरक महोत्सवाचा शुभारंभ केला. तसा हीरक महोत्सवानिमित्त उभारलेला शामियाना टाळ्यांच्या कडकडाटांनी दणाणून गेला.
लतादीदींनी आपल्या स्वर्गीय वैखरीनं 'पुढारी'ला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या, तेव्हा त्यांचे प्रणवाचे स्वर श्रवण करण्यासाठी, काही क्षण काळही स्तब्ध झाला असेल! एक प्रचंड गारुड सार्या शामियान्याला झपाटून राहिलं होतं.
'पुढारी'च्या वाटचालीस शुभेच्छा देताना आपल्या उत्स्फूर्त भाषणात लतादीदी म्हणाल्या, "साठ वर्षे पूर्ण करणार्या दै.'पुढारी'ला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! आणि अभिनंदन! 'पुढारी'ची वाटचाल अशीच भरभराटीची होवो, हा भाग्याचा सोहळा आहे. यासाठी अनेक मान्यवर इथं आले आहेत. सार्यांना माझ्या नववर्षाच्या शुभेच्छा!"
लतादीदींच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द हा आमच्यासाठी त्यांनी आम्हाला दिलेला शुभेच्छारूपी कोमल गांधारच होता!
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातूनच नव्हे, तर कर्नाटकातून आणि गोव्यातूनही असंख्य मान्यवरांची मांदियाळी या अनौपचारिक सोहळ्यासाठी एकत्र जमली होती. आमच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षावच पडला. यापूर्वी अवकाळी पाऊस कोसळताना मी अनेकदा पाहिला होता; पण शुभेच्छांचा वळीव कोसळताना प्रथमच पाहत होतो. मी, सौ. गीतादेवी आणि चि. योगेश; आम्ही तिघेही या वर्षावात चिंब भिजून निघालो!
शुभेच्छा देणार्यांमध्ये विधान परिषदेचे सभापती ना. स. फरांदे, ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, नगरविकास राज्यमंत्री रवींद्र माने, एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव गोताड, गोव्याचे उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर, गोव्याच्या अन्न आणि पुरवठा मंत्री संगीता परब, कृषिमंत्री व्हिक्टोरिया फर्नांडिस, कर्नाटक विधान परिषदेचे माजी सभापती रामभाऊ पोतदार, आमदार एस. एस. पुजारी, आशियाई सुवर्णपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचा कर्णधार धनराज पिल्ले, छत्रपती शाहू महाराज, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू अरुण निगवेकर, खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, मदन पाटील, अभयसिंहराजे भोसले, पृथ्वीराज चव्हाण या मान्यवरांचा समावेश होता. तसेच सातारच्या छ. कल्पनाराजे भोसले याही आवर्जून या समारंभाला उपस्थित होत्या.
आमदार दिग्विजय खानविलकर, आ. महादेवराव महाडिक, आ. संपतबापू पवार-पाटील, आ. नामदेवराव भोईटे, आ. संजयबाबा घाटगे, आ. संजय गायकवाड, आ. सुभाष दाबके, आ. रामदास फुटाणे, आ. संभाजी पवार, आ. नितीन शिंदे, आ. सुरेश पाटील यांच्याबरोबर अनेक माजी खासदार, आमदार या सर्वांनी जातीनं हजर राहून 'पुढारी'वर शुभेच्छांचा वर्षाव केला. या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जि. प. अध्यक्ष, महापालिकांचे महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू तसेच कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. याशिवाय मंत्रालयापासून राज्यातील विविध विभागांतील ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि पोलिस अधिकारीही उपस्थित होते.
त्यामध्ये भूषण गगराणी, सुरेश खोपडे, अनिल डिग्गीकर, ओमप्रकाश बाली, एस. सी. शर्मा, शिवाजीराव चव्हाण, न्यायमूर्ती एन. डी. देशपांडे यांसारख्या मान्यवरांचा सहभाग होता.
आशियाई स्पर्धेत हॉकीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणार्या भारतीय संघाचे कर्णधार धनराज पिल्ले हे हीरक महोत्सवानिमित्त दै.'पुढारी'च्या पुणे कार्यालयात आले आणि त्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पिल्ले यांनी आशियाई स्पर्धेतील आपले रोमांचक अनुभव कथन केले. तसेच पुढील स्पर्धांबाबत आखण्यात येणारी रणनीतीही त्यांनी विशद केली. आशियाई स्पर्धेतील यश हे कुणा एकाचे नसून ते सांघिक स्वरूपाचं असल्याचं त्यांनी खुल्या दिलानं कबूल करतानाच, जिंकायचंच या जिद्दीतून ते साकार झाल्याचंही ते म्हणाले. धनराज पिल्ले यांनी 'पुढारी'च्या जनमानसातील स्थानाबाबत माहिती घेऊन अंकाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
'प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे।
पिके तरी वाहो नबुगिजे।
पिकासी निवाडु देखिजे।
अधिकाधिक॥'
शेतकरी दरवर्षी शेतात पेरणी करीतच असतो. ते दरवर्षी अधिकाधिक पिकू लागतं म्हणून काही शेतकर्याला त्याचा कंटाळा येत नाही. उलट तो नव्या उमेदीनं शेताची मशागत करीत असतो. त्याप्रमाणेच 'पुढारी'चीही उत्तरोत्तर भरभराट होतच होती आणि न कंटाळता मी त्याची मशागत करीतच होतो. तसेच 'पुढारी'च्या या भरघोस पिकावर जनताजनार्दनही समाधानी होता. लोक 'पुढारी'ला अधिकाधिक प्रतिसाद देतच होते. याचीच प्रचिती हीरक महोत्सवानिमित्त झालेल्या गर्दीतून येत होती.
'पुढारी'च्या हीरक महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून कोल्हापूर महापालिकेनं मला मानपत्र द्यायचा निर्णय घेतला. मी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून मला हे मानपत्र देण्याचा हा निर्णय एकमुखी झाला होता. आबांच्या अमृत महोत्सवाच्यावेळी महापालिकेनं त्यांनाही मानपत्र देऊन सन्मानित केलं होतं.
'आरंभी बीज एकले।
मग तेचिं विरुढलिया बुड जाहलें।
बुडी कोंभ निघाले।
खांदियाचे॥'
'पहिल्यांदा एकच बी असतं. त्याला अंकुर फुटून त्याचा बुंधा तयार होतो. मग त्याच बुंध्यातून फांद्यांचे अंकुर फुटतात.' याच वचनाप्रमाणं, आबांनी लावलेलं हे बी! त्याच्या फांद्यांचा विस्तार मी केला. कोल्हापूर महापालिकेनं बी पेरणारे आबा आणि त्यांच्या फांद्यांचा विस्तार करणारा मी; अशा आम्हा दोघांचाही मानपत्र देऊन सन्मान केला होता. पिता-पुत्रांना महापालिकेचा बहुमान मिळाल्याची ही घटना विरळच म्हणावी लागेल!
13 नोव्हेंबर 1999 रोजी हा भव्य सोहळा प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर शाही इतमामात पार पडला. त्यासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता. त्याप्रसंगी अक्षरशः अफाट जनसागर लोटला होता. त्या जनसागराच्या साक्षीनंच मला हे मानपत्र प्रदान करण्यात आल्यामुळे ते लोकांच्या संमतीनंच मिळालेलं नागरी मानपत्र होतं, यावर शिक्कामोर्तब झालं. माझे दोन तपांचे मित्र तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते मला हे मानपत्र बहाल करण्यात आलं. त्यावेळी माझ्या या जिवलग मित्राला, माझ्याविषयी किती बोलू, असं झालं होतं. ते म्हणाले,
"स्वतःसाठी कधीही, काहीही न मागणारा संपादक. राज्यात घडलेल्या अनेक आपत्तींच्या वेळी ते धावून आले. त्यांनी कधीच कसल्याही पदाची अभिलाषा धरली नाही. मित्र म्हणून कधी मला व्यक्तिगत कामासाठी शब्द टाकला नाही. ते नावाप्रमाणेच प्रतापसिंह आहेत.
'पुढारी'नं खर्या अर्थानं महाराष्ट्राचं पुढारीपण केलेलं आहे."
विलासरावांच्या या वक्तव्यावर जनसागरातून टाळ्यांच्या लाटांवर लाटा उसळल्या.
"बाळासाहेबांना मानपत्र द्यायला आलो असता, कोल्हापूरला काही दिलं नाही, असं होणार नाही."
असं सांगत त्यांनी कोल्हापूर महापालिकेला दोन कोटींचं खास अनुदान जाहीर केलं. तसेच कोल्हापूरच्या पाणी प्रश्नासह विविध प्रश्नांवर मार्ग काढण्याची ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली. विलासरावांच्या या निर्णयाचंही जनसागरातून उत्स्फूर्तपणे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत झालं. माझ्या मानपत्राच्या निमित्तानं विलासरावांनी हे निर्णय घेतल्यानं उपस्थित मान्यवर आणि नागरिकांमध्ये खुशीची लाट उसळली.
या सोहळ्यासाठी बहुतांश मंत्रिमंडळ होतं. तसेच अनेक जिल्ह्यांतून लोक आलेले होते. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक अशा सर्व थरांतील लोकांनी शामियाना खच्चून भरला होता. त्याशिवाय बाहेर रस्त्यावरही गर्दी ओसंडून वाहत होती. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक मान्यवरांचे शुभेच्छा संदेश आले होते, ते वेगळंच! व्यासपीठावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री होेते. त्यांचा संदर्भ घेत माझ्या भाषणात मी म्हणालो, "1982 मध्ये आबांच्या अमृत महोत्सवाला यशवंतराव चव्हाण आणि वसंतरावदादा पाटील एकत्र आले होते. नवमहाराष्ट्राच्या उभारणीसाठी अशा एकजुटीची गरज आहे."
या माझ्या उद्गारावर टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी दाद दिली. माझं हे म्हणणं विलासरावांना तर खूपच भावलं. 'एकजुटीचं' महत्त्व त्यांना माहीत होतं आणि त्यांच्या अंतरीचे बोलच मी बोलत होतो. हीरक महोत्सवानिमित्त
एक जानेवारीपासून 'पुढारी' इंटरनेटवर जात असल्याची घोषणा मी केली. या घोषणेचं जोरदार स्वागत झालं.
दृष्ट लागावी असा हा मानपत्र सोहळा झाला –
'An investment in knowledge pays the best interest.'
बेंजामिन फ्रँकलिन या अमेरिकन विचारवंताचं हे मत उचितच म्हटलं पाहिजे. आपण प्रेमाची गुंतवणूक करीत गेल्यास लोकही आपल्यावर व्याजासह प्रेम करतात आणि दामदुपटीनं ते आपल्या प्रेमाची परतफेड करीत असतात. मला मिळालेलं हे मानपत्र ही त्याचीच प्रचिती होती, यात शंकाच नाही!