Latest

सातारा : बंदूक चोरीत बहीण-भावाला अटक

सोनाली जाधव

सातारा : पुढारी वृत्तसेवा
वर्णे, ता. सातारा येथील माजी सैनिक संजय मुरलीधर जातक (वय 57) यांची डबल बोअर रायफलची चोरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) बुधवारी मूळच्या कर्नाटक राज्यातील असलेल्या बहीण-भावाला अटक केली. दरम्यान, पोलिसांनी संशयितांकडून चोरीची रायफल तसेच 14 जिवंत काडतुसे जप्त केली.

प्रवीण रामू पवार (वय 19), संगीता विजय राठोड (वय 30, सध्या रा. चंदननगर, कोडोली, सातारा, मूळ रा. उडगी, ता. बागेवाडी, जि. विजयपूर, राज्य कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या बहीण भावाची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय जातक हे सैन्य दलातून निवृत्त झालेे आहेत. सध्या ते सातार्‍यातील संभाजीनगरमध्ये वास्तव्य करीत आहेत. दि. 12 एप्रिल 2022 रोजी त्यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने डबल बोअरची रायफल आणि 14 जिवंत काडतुसे चोरुन नेली होती. याची तक्रार त्यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिस तपास करत असताना त्यांना संशयितांची नावे मिळाली.

त्यानुसार दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीची कबुली देऊन त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीची रायफल आणि काडतुसे जप्त केली. हे दोघे कर्नाटकातून उसतोडीच्या कामासाठी आले होते. संशयितांकडे पोलिस अधिक चौकशी करत आहेत. पो.नि. भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर मोरे, पोलिस हवालदार सुजीत भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम निकम, संतोष कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT