सातारा; पुढारी वृत्तसेवा : शेतकरी वर्गासह हिंदू धर्मामध्ये गोमातेचे विशेष स्थान आहे. महिलावर्गातून गोमातेचे पूजन करुन वसुबारस साजरी करण्यात आली. आश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारसेने दीपोत्सवाला प्रारंभ झाला असून पुढील सहा दिवस हा उत्सव सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्वत्र दिवाळीच्या उत्साहाला उधाण आले आहे. अवघ्या जनजीवनाला अभ्यंगस्नानासह लक्षीपूजन, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, भाऊबीजेची आतुरता लागली आहे.
दरम्यान, सातारा शहरातील पंचपाळी हौद येथे गोवत्स पूजनासाठी महिलांनी गर्दी केली होती. हिंदू धर्मात गाईला महत्त्वाचे स्थान असून तिचा सन्मान करण्याचा हा दिवस असल्याने गुरुवारी घरोघरी गाईची पाडसासह पूजा करून वसुबारस साजरी करण्यात आली. ग्रामीण भागात बहुतांश शेतकरीवर्ग असल्याने घरच्या गायीची पूजा करण्यात आली. तर शहरी भागात सामाजिक संस्था, गोशाळांमधील
गाई व वासराचे पूजन महिलांकडून करण्यात आले. सातारा शहरात पंचपाळी हौद, तांबोळी गोशाळा येथे गोवत्स पूजनासाठी महिलांनी गर्दी केली होती.
वसुबारशीने दीपोत्सवाचा उत्साहात प्रारंभ झाला आहे. जोड तिथीमुळे या वर्षी हा दीपोत्सव पुढील सहा दिवस सुरु राहणार आहे. यामध्ये शुक्रवार दि. 10 रोजी धनत्रयोदशीला धनपूजन केले जाणार असून रविवार दि.12 रोजी नरक चतुदर्शी व लक्ष्मी पूजन, मंगळवार दि. 14 रोजी बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा व बुधवार दि. 15 नोव्हेंबर रोजी भाऊबीज अशी सहा दिवस उत्सवाची रेलचेल राहणार आहे. दिवाळीचा सण सर्व स्तरातील नागरिकांमधून आपापल्यापरीने साजरा केला जाणार असून त्याची धूम वसुबारशीपासून सुरु झाली आहे.
शाळांना सुट्ट्या लागल्याने बालगोपाळांचा कल्ला सुरु झाला आहे. महिला वर्गामध्ये फराळ तयार करणे, अभ्यंग स्नानासह लक्ष्मीपूजनाच्या तयारीसाठी धांदल उडाली आहे. बाजारपेठेसह सर्वच ठिकाणी दिपोत्सवाचा माहोल जाणवू लागला आहे. खरेदीसाठी तोबा गर्दी होत असून सातारा शहर व परिसरातील रस्ते नागरिकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. मुख्य बाजारपेठेसह सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.