Latest

सातारा : नाष्ट्यावरून ‘वर्‍हाड अडले, नवरीने थेट मंडपच सोडला अन् लग्‍न थांबले…

Arun Patil

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : वेळ दुपारी अडीच वाजताची… लग्‍नाची घाई अन् गडबडीची… अक्षता टाकायला तासाचा अवधी… अशातच नाष्टा संपला… वधू बाजूकडील मंडळींनी ही बाब पाहुण्यांना लक्षात आणून दिली… मात्र तरीही हालचाल काही होईना… अखेर नवरी मुलगी तिचे आई-वडील यांनी थेट मंडपच सोडला अन् लग्‍न थांबले… या घटनेने उपस्थित सारेच अवाक् झाले.

त्याचे झाले असे, शुक्रवारी दुपारी सातार्‍यातील एका हायफाय हॉलमध्ये एका लग्‍नसमारंभाचे थाटामाटात आयोजन केले होते. दिवसभर लग्‍नाची धामधूम सुरू होती. लग्‍नासाठी वर व वधू पक्षातील दोन्ही मंडळी नटूनथटून मंडपात आली. लग्नघटिका दुपारी असल्याने अल्पोपहाराची सोय होती. त्यानंतर जेवणाची सोय देखील होती. लग्‍नाचा माहोल असतानाच वधू मंडळींच्या पाहुण्यांना नाष्टा मिळाला नसल्याची कुरबुर सुरू झाली. सकाळपासून भुकेने व्याकूळ झालेली काही मंडळी वधूच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचली. त्यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

नाष्टा संपल्याचा मेसेज वर पक्षाकडे पोहोचवला. मात्र तरीही हालचाल न झाल्याने वधू पक्षात अस्वस्थता पसरली. पाहता पाहता या घटनेने टोकाचे पाऊल उचलले. लग्‍न अवघ्या तासावर आले असतानाच वधू व तिचे आई, वडील नसल्याचा कालवा झाला. वर पक्षाने तातडीने खातरजमा करण्याचा प्रयत्न केला आणि वर्‍हाड हॉलमध्ये नसल्याचे त्यांच्या लक्षात येताच पायाखालची जमीन सरकली. फोनाफोनी करत अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नेमकी माशी कुठ शिंकली हे कोणाला काहीच कळेना. जाणती माणसे कामाला लागली. मध्यस्थीचा शोध सुरू झाला. अखेर नाष्ट्याचे रामायण झाल्याचे समजल्यानंतर वर पक्षाने सांभाळून घेण्याची विनंती केली.

मात्र वधू पक्षाकडील काही मंडळी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. शेवटी सायंकाळी प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी नेमका आदमास घेतला. घटनेचे कारण ऐकून तेही थक्‍क झाले. वर पक्षाने विनंती केल्यावर पोलिसांनी वधू पक्षाला फोन केला. फोनवर थेट वधूच बोलली. माझ्या पाहुण्यांचा अपमान झाला असून हे योग्य नाही. आम्ही लग्‍नाला तयार नाही, असे म्हणत फोन ठेवला गेला. हा सारा मामला पोलिसांनी पाहिल्यानंतर तेही अवाक् झाले. रात्री उशिरापर्यंत प्रकरण पॅचअप करण्याचे प्रयत्न सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT