बामणोली; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील दरे गावचे सुपुत्र ना. एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राजकारणात भूकंप घडवला असून अवघ्या महाराष्ट्राला यामुळे हादरा बसला आहे. राज्यात घडत असलेल्या या राजकीय घडामोडींचे पडसाद त्यांच्या दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) या गावी उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या गावाकडील घरासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ना. एकनाथ शिंदे यांची गावी दोन घरे असून एक
वडिलोपार्जित घर तर दुसरे ना. शिंदे यांनी स्वत: बांधलेले फार्म हाऊस. त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य हे ठाणे येथे वास्तव्यास आहेत. मात्र, राज्यात घडत असलेल्या घडामोडी पाहता त्यांच्या दरेतील या दोन घरांना पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.जरी दरे गावी ना. एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य रहात नसला तरी राज्यातील राजकीय स्फोटक परिस्थिती पाहता गावाकडील घरांबाबत कोणताही अप्रिय प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून येथेे पोलीस कर्मचारी नेमून बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याचे तापोळा पोलीस आऊट पोस्टचे हवालदार मुलाणी यांनी सांगितले.
सध्या शिवसागर जलाशयाची पाणी पातळी पूर्णपणे कमी झाली असल्याने हे पोलिस शिवसागर जलाशयाच्या कोरड्या नदीपात्राला वळसा मारून दरे येथे पोहोचले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.