कोल्हापूर; राजेंद्र जोशी : गेली काही वर्षे 300 लाख टन उत्पादनाचा उंबरठा ओलांडणार्या भारतीय साखर कारखानदारीवर हक्काचे ग्राहक अडचणीत सापडल्याने सध्या निर्यातीसाठी नवे ग्राहक शोधण्याची वेळ येऊन ठेपली आहे. यंदा नव्याने सुरू झालेल्या हंगामात केंद्र सरकारने निर्धारित केलेले साखर निर्यातीचे उद्दिष्ट गाठावयाचे असेल, तर भारतीय साखर कारखानदारीला पश्चिम आशियाई आणि पूर्व आफ्रिकेतील देशांमध्ये आपला ग्राहक विस्तार करावा लागेल.
भारतीय साखर कारखानदारीमध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका आणि इंडोनेशिया हे निर्यातीचे हक्काचे ग्राहक म्हणून ओळखले जातात. नुकत्याच संपलेल्या साखर वर्षामध्ये भारताने 72 लाख मेट्रिक टन साखर निर्यात करून उच्चांक निर्माण केला होता. यापैकी 50 टक्के साखर वरील तीन देशांमध्ये निर्यात करण्यात आली होती. सध्या अफगाणिस्तानमध्ये असलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे या ग्राहकाच्या व्यवहारापुढे प्रश्नचिन्ह उभे आहे. श्रीलंकेत साखरेची मागणी असली, तरी साखर खरेदी करण्यासाठी तेथील सरकारकडे पुरेसे परकीय चलन नाही. त्याचपाठोपाठ थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन नोंदविले जाण्याचे संकेत असल्याने इंडोनेशियाच्या साखर निर्यातीत थायलंड स्पर्धा करू शकतो. यामुळे भारताला साखर निर्यातीसाठी नवा ग्राहकाचा शोध घ्यावा लागेल, असे चित्र आहे.
भारतामध्ये नव्या हंगामाला सुरुवात करण्यापूर्वी साखरेचा 87 लाख मेट्रिक टन शिल्लक साठा होता. यंदाच्या हंगामामध्ये 'इस्मा'ने सुधारित अंदाजानुसार 305 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचे अनुमान आहे. देशांतर्गत साखरेचा वापर 260 लाख मेट्रिक टन गृहीत धरला, तर हंगामाअखेरीस 132 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहते. यापैकी 34 लाख मेट्रिक टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविण्याचे नियोजन आहे, तर 60 लाख मेट्रिक टन साखर निर्यात होणे आवश्यक आहे. जागतिक बाजारात साखरेचे चढे दर, ब्राझीलमध्ये घसरलेले उत्पादन लक्षात घेतले, तर हंगामाला सुरुवात करण्यापूर्वी केंद्र सरकारच्या अनुदानाशिवाय साखर कारखानदारी निर्यातीचे आपले निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करेल, अशी चिन्हे होती.
'इस्मा'चा उत्पादनाचा सुधारित अंदाज जाहीर
2021-22 च्या साखर हंगामात 'इस्मा'ने देशातील साखर उत्पादनाचा अंदाज काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. यानुसार 310 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित होईल, असे गृहीत धरण्यात आले. तथापि, उत्तर प्रदेशमध्ये दरहेक्टरी ऊस उत्पादनात झालेली घसरण आणि पूर्वोत्तरी राज्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने साखरेचे उत्पादन 5 लाख मेट्रिक टनांनी घसरेल, असे 'इस्मा'चे म्हणणे आहे. यामुळे सुधारित अंदाजानुसार देशात 305 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित होईल, असे अनुमान आहे.