शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : द्वारकामाई व चावडीकडे जाणार्या मार्गावर सावलीसाठी बनविलेला मंडप भिजपावसाने कोसळला. गर्दीने गजबजणार्या या रस्त्यावर सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
उन्हाच्या कडक्यात साई भक्तांना अनवाणी फिरावे लागते. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात जागोजागी पायघड्यांसह मंडप बांधले जातात. केवळ उन्हाळ्यात हे मंडप बांधलेले असतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ते काढले जातात. मंडपावर ताडपत्री असल्याने भाविकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत नाहीत, मात्र काल (मंगळवारी) दुपारी 12 वाजेच्या सुमारास माध्यन्ह आरती सुरू असताना जोरदार पावसाचे आगमन झाले. पावसामुळे मंदिर परिसरातील भाविक सोळा गुंठ्यातील सभा मंडपात आश्रयास थांबले होते. पाऊस मध्यम तीव्र स्वरूपाचा होता. मंडपावर टाकलेल्या ताडपत्रीवर पावसाचे पाणी साठले. या पाण्याच्या वजनाने मारुती मंदिरासमोर टाकलेला मंडप अचानक कोसळला. पाऊस सुरू असल्याने या मंडपाखाली कोणीच नव्हते. त्यामुळे जीवित हानी टळली.
मंडप काढला नाही अन्..!
पावसाळ्याच्या सुरुवातीला मंडप काढले जातात. मात्र यंदा मान्सूनने विलंब लावल्याने उन्हाची व तीव्रता असल्याने काही भागातील मंडप काढले नव्हते. आज अचानक पाऊस झाल्याने मंडप कोसळून गोंधळ उडाला.