file Photo  
Latest

सांगलीत बनावट नोटांचा कारखाना

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगलीत विश्रामबाग येथील वारणालीत बनावट नोटांचा कारखाना असल्याचा धक्कादायक प्रकार इस्लामपूर पोलिसांच्या तपासातून पुढे आला आहे. यामध्ये मोठी टोळी कार्यरत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा कारखाना सुरू आहे. टोळीने आतापर्यंत सुमारे पन्नास लाख रुपयांच्या नोटांची छपाई करुन त्या पश्चिम महाराष्ट्रात चलनात आणल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

इस्लामपूर पोलिसांनी बनावट नोटांची छपाई करणार्‍या टोळीचा नुकताच पदार्र्फाश केला आहे. टोळीतील चौघांना अटक केली आहे. मुख्य सुत्रधार रमेश चव्हाण हा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याच टोळीने स्थानिक गुन्हेगारांची मदत घेऊन सहा महिन्यांपासून नोटा छपाईचा कारखाना सुरू केला. बनावट नोटांच्या माध्यमातून या टोळीने सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांत चांगलेच हातपाय पसरले. पोलिसांच्या हाती या टोळीतील काहीजण लागूनही बनावट नोटा अजूनही राजरोसपणे चलनात येत असल्याने या टोळीचा पूर्णपणे छडा लावणे, हे एक पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून ही टोळी सांगलीत विश्रामबाग येथील वारणालीत बनावट नोटांची अगदी खुलेआम छपाई करीत होती. ही बाब विश्रामबाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला समजली नसावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घसघसशीत कमिशन व आकर्षक पगार, यामुळे बेरोजगार तरुण या टोळीमध्ये दाखल झाले असावेत. जोपर्यंत याची पाळेमुळे खणून काढली जात नाहीत, तोपर्यंत टोळीचे हे कारनामे सुरुच राहणार आहेत.

खर्‍या नोटेप्रमाणे हुबेहूब दिसणारी बनावट नोट ओळखणे हे बँकांच्या अधिकार्‍यांनाही कठीण बनल्याने दररोज हजारो रुपयांच्या बनावट नोटा बँकेत भरण्यात जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. सांगली जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आणून फसवणुकीचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मोठी साखळी…रात्रभर छपाई!

इस्लामपुरात पकडलेल्या टोळीतील संशयित एकमेकांचे नातेवाईक आहेत. फरारी असलेल्या रमेश चव्हाण याच्या डोक्यातून नोटा छपाईची कल्पना सूचली. दोन हजार व पाचशे व शंभरची नोट ही काही वर्षापूर्वी नवीन चलनात आली आहे. त्याचा कागदही पातळ आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन रमेशने साथीदारांच्या मदतीने हुबेहूब छपाई केली. सहा महिन्यात त्यांनी 50 लाखाहून अधिक नोटांची छपाई करुन त्या चलनात आणल्याचा संशय आहे. नोटांची छपाई ते रात्री करायचे.

सांगलीत दोन टोळ्यांना तुरूंगाची हवा!

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने 2005 मध्ये ओगलेवाडी (ता. कर्‍हाड) येथील बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. बळीराम कांबळेसह सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. टोळीची पाळेमुळे खणून काढली. 16 लाखांच्या नोटा जप्त केल्या. ठोस पुरावे गोळा केल्याने कांबळे व त्याच्या साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा लागल्याने अजूनही ही टोळी तुरुंगाची हवा खात आहे. यामध्ये तत्कालीन सहाय्यक जिल्हा सरकारी वकील भगतसिंग राजपूत यांनी काम पाहिले होते.

टोळीने विश्रामबाग येथे वारणालीत बनावट नोटांची छपाई केली. मुख्य सुत्रधार रमेश चव्हाण हा फरारी आहे. तो सापडल्यानंतर या टोळीची पाळेमुळे खणून काढली जातील.
– शशिकांत चव्हाण
पोलिस निरीक्षक, इस्लामपूर पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT