वारणावती : अष्पाक आत्तार
चांदोलीतील वनखात्याने या आठवड्यात चार शिकार्यांना रंगेहाथ पकडले. त्यामुळे चांदोली अभयारण्यासह सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी आणि जैवविविधतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याशिवाय या चोरट्या शिकारींमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे.
सातारा, कराड, पाटण, चांदोली, शाहुवाडी, राधानगरी, आजरा, चंदगड, संगमेश्वर, लांजा या भागातील जंगलांमध्ये चोरट्या शिकारींच्या अनेक घटना आजपर्यंत उघडकीस आल्या आहेत. प्रामुख्याने छोटी छोटी हरणे, भेकर, ससा, घोरपड, साळींदर, रानडुक्कर, मोर-लांडोर, रानकोंबड्या, ल्हावा, पारवा आदी प्राणीपक्ष्यांची शिकार करण्यात येते. या भागातील जंगलांच्या अंतर्भागात फेरफटका मारला तर ठिकठिकाणी शिकार्यांनी वन्यप्राण्याच्या शिकारी करून मेजवान्या झोडल्याच्या पाऊलखुणा अनेक ठिकाणी बघायला मिळतात.
याशिवाय अजूनही अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पामध्ये रहात असलेल्या काही गावकर्यांकडूनही मोठ्या प्रमाणात शिकारी साधल्या जात असल्याचे आढळून येते. गावठी आणि छर्याच्या बंदुका, भुसुरूंग उडविण्याच्या स्फोटक केपा, पिंजरे, गोफणी, गलोल आदींच्या सहाय्याने या शिकारी साधल्या जातात.
चांदोली अभयारण्यासह सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्या समृध्द जंगलांमध्ये गवा, बिबट्या, हरीण, गेळा, सांबर, भेकर, रानडुक्कर, रानकुत्रा, अस्वल, शेकरू, रानमांजर, उदमांजर, ससा, लंगूर यासह जवळपास 35 प्रकारचे प्राणी आढळून येतात. याशिवाय गरूड, गिधाड, घार, मोर, पोपट, कबूतर, बदक, पाणकोंबडा, माळढोक, धनेश, रानकोंबडा यासह जवळपास 235 प्रकारचे पक्षी आढळून येतात. शिवाय 1800 प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही न आढळून येणार्या 300 प्रकारच्या वनौषधी केवळ याच जंगलामध्ये आढळून येतात.
युनेस्कोने या भागाचा जागतिक वारसास्थळामध्ये समावेश केला आहे. सह्याद्री पठाराच्या आसपास असलेल्या गावांमध्ये अगदी पूर्वापार शिकारीचा छंद जोपासलेला दिसतो. वेगवेगळ्या निमित्ताने जंगलात शिकारीसाठी जाणारे अनेक लोक या भागात पहायला मिळतात. कायद्याने वन्यप्राण्यांच्या शिकारीवर निर्बंध लादले असले तरी दुर्दैवाने अजूनही कित्येकजण चोरीछुपे आपला हा परंपरागत छंद जोपासून आहेत. मात्र या जंगलातील वन्यप्राणी आणि जैवविविधता वाचवायची असेल तर या चोरट्या शिकारींचा कठोर उपाययोजना करून बंदोबस्त करण्याची गरज आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून अतिशय संवेदनशील असलेल्या या जंगलातील छोट्यातील छोटा मानवी हस्तक्षेपसुध्दा मोठ्या नैसर्गिक आपत्तीला कारणीभूत होवू शकतो. संयुक्त राष्ट्र संघाच्या निसर्ग संवर्धन समितीसह पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ समितीनेही आपल्या अहवालातून तसा इशारा दिला आहे.त्यामुळे वनखाते आणि पोलिसांनी शिकार्यांचा बंदाबस्त करून हा नैसर्गिक ठेवा जपण्याची गरज आहे.