सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे वारणा नदीला पूर आला आहे तर कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे.
सांगली शहरासह जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला. सर्वत्र संततधार सुरू आहे. शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून वारणा, मोरणा नदीस पूर आला आहे. वारणा नदीवरील तीन पूल पाण्याखाली गेले आहेत.
शिराळा
गुरूवारी सकाळपर्यंत वारणावती येथे 175 मि. मी. पाऊस झाला. चांदोली धरणातील पाण्याचा साठा दोन टीमसीने वाढला आहे. एकूण पाणीसाठा 28.12 टीएमसी झाला आहे. कोकरूड – रेठरे, चरण – सोंडोली, मांगले – सावर्डे हे प्रमुख पूल पाण्याखाली गेले आहेत.
दरम्यान, शिराळा – इस्लामपूर राज्यमहामार्गावर शिराळा येथे झाड पडल्याने वाहतूक काही काळ बंद होती.
तालुक्यात वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरणातून विसर्ग वाढवल्याने वारणा नदीच्या पाण्यात वाढ होत आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
भिलवडीजवळ कृष्णा पाणीपातळीत वाढ
भिलवडी : कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. कोयना धरणक्षेत्रात सुमारे चाळीस हजार क्युसेक दराने पाण्याची आवक होत आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. भिलवडी पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी 21 फूट पाणी पातळी होती. येत्या 24 तासात बारा फूट पाणी पातळी वाढू शकते, असे पाटबंधारे विभागाचे उपअभियंता लालासाहेब मोरे यांनी सांगितले.
मांगले भागातील पूल पाण्याखाली
वारणा नदी पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा, मोरणा नद्यांना महापूर आला आहे. मांगले गावाला जोडणार्या तीन मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
मांगले येथे अतिवृष्टी झाली असून 136 मिली पावसाची नोंद झाली आहे. मांगले परिसराला पुराचा वेढा पडला आहे. वारणा नदीवरील मांगले-सावर्डे, बंधारा, मोरणा नदीवरील मांगले-कांदे, मांगले-शिंगटेवाडी या दरम्यानचे मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प आहे. मोरणा नदीपलीकडील चरापले, ल्हायकर, निकम, दशवंत, शेवडे, कुंभार या वस्त्यावरील लोकांना शिंगटेवाडी मार्गे मांगलेत यावे लागत आहे.
वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस
इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा
वाळवा तालुक्यात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. गुरुवारी सकाळपासूनही पावसाची संततधार सुरू होती. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.
चिकुर्डे येथील बंधारा तसेच कृष्णा नदीवरील बहे व बोरगाव येथील बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णा – वारणा नदीकाठावर पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
प्रभारी प्रांताधिकारी गणेश मरकर यांनी सर्व विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेवून प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी वारणा नदीकाठावरील ऐतवडे खुर्द, निलेवाडी, कणेगाव, भरतवाडी या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांना सूचना दिल्या.
गेल्या आठ दिवसापासून तालुक्यात पाऊस सुरू आहे. बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. पावसाचा जोर वाढत असल्याने पाझर तलावातील पाणीसाठा झपाट्याने वाढतो आहे.
दरम्यान, पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसाने ओढे – ओघळी वाहू लागल्याने कृष्णा – वारणा नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठावरील शेतकर्यांना पुराची धास्ती वाटते आहे.
ऐतवडे पूल पाण्याखाली
ऐतवडे खुर्द ः पुढारी वृत्तसेवा
मुसळधार पावसाने वारणा नदीच्या पाण्याची पातळी वाढते आहे. येथे वारणा पात्राबाहेर पडली आहे. ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील साकव पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. नदीकाठच्या लोकांना व पर्वतवाडी येथील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.