सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) 36, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) मिळून 28 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले. स्थानिक आघाड्यांनी 18 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला. खानापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींवर काँग्रेस व भाजपनेही दावा केला. मनसेने एका ग्रामपंचायतीत विजय मिळवला.
जिल्ह्यातील तहसील मुख्यालय व अप्पर तहसील अशा बारा ठिकाणी मतमोजणी झाली. सकाळी नऊ वाजता सुरू झालेली मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 11 वाजता पूर्ण झाली. निकाल कळू लागताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. विजयी उमेदवारांना खांद्यावर घेऊन फिरवण्यात येत होते.
कडेगाव तालुक्यातील चिंचणी, उपाळे मायणी व शाळगाव या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसने चिंचणी आणि शाळगाव या दोन ग्रामपंचायतींचे सरपंचपद व सत्ता मिळवत वर्चस्व कायम राखले. भाजपला केवळ उपाळे मायणी या ग्रामपंचायतीत सरपंचपद व सत्तेवर समाधान मानावे लागले.
जत तालुक्यातील बिळूर, कोंत्यावबोबलाद ग्रामपंचायतीवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले. त्याचबरोबर कोणबगी, गुलगुजनाळ, खिलारवाडी येथेही भाजपनेच बाजी मारली. तालुक्यातील पाचही ग्रामपंचायतींवर भाजपाने यश मिळविले. त्यामुळे हा निकाल काँग्रेसला धक्का मानला जातो.
तासगाव तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. चिखलगोठण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या गटाने सत्ताधारी राष्ट्रवादी गटाचा पराभव केला. थेट सरपंचपदासह आठही जागावर निर्विवाद वर्चस्व मिळविले. बिरणवाडी येथे काँग्रेसची सत्ता आली. कारंदवाडीची सत्ता सर्वपक्षीय आघाडीकडे आली. याठिकाणी पूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती. वाळवा तालुक्यातील तांबवे, शिरटे व साटपेवाडी येथे राष्ट्रवादीची सत्ता आली. पलूस तालुक्यामध्ये चार ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यामध्ये तीन ठिकाणी आघाडी तर भाजपने एका ठिकाणी विजयी मिळवला.
आटपाडी तालुक्यात 14 पैकी 8 गावात सत्तांतर झाले. यामध्ये भाजपकडे 8 तर शिंदेगट सेनेकडे 5 ग्रामपंचायती आल्या. याठिकाणी काँग्रेसला यश मिळू शकले नाही. सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका या शिराळा तालुक्यात होत्या. एकूण 24 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने झेंडा फडकावला. सात जागी भाजप तर 5ग्रामपंचायतींवर स्थानिक आघाडीची सत्ता आली.
कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये 18 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. यामध्ये 7 ग्रामपंचायती या घोरपडे गटाकडे तर 7 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने झेंडा फडकावला. भाजपा दोन तर आघाडीकडे 2 ग्रामपंचायती आल्या. खानापूर तालुक्यात चार ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यातील दोन ग्रामपंचायतींवर भाजपा आणि राष्ट्रवादी पवार गटाने दावा केला आहे.
मिरज तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींपैकी भाजपाने हरिपूर तर काँग्रेसने नांद्रे ग्रामपंचायतीवर निर्विवाद आघाडीची सत्ता
आली.
जिल्ह्यातील एकूण 94 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. यातील 11 ग्रामपंचायती पूर्ण बिनविरोध निवड झाल्या होत्या. आता नवीन निवडून आलेल्या सदस्यांची नऊ नोव्हेंबरनंतर बैठक बोलावण्यात येणार आहे. सरपंचांच्या अध्यक्षतेखाली सदस्य उपसरपंचांची निवड करणार आहेत.