सांगली मध्ये महापुराचे पाणी घुसल्याने मोठी धास्ती निर्माण झाली आहे. सांगली शहर परिसरात शनिवारी देखील महापुराचे पाणी घुसल्याने नागरिकांमध्ये धास्ती कायम होती. कोयना, चांदोली धरणांमधून विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळी फारशी कमी झाली नाही.
सांगलीतील स्टेशन चौक, दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, बायपास परिसर, दत्त-मारुती रोड, तरुण भारत स्टेडियम, राजवाडा चौक, शिवाजी मंडई, कोल्हापूर रोड, पत्रकारनगर, गणपती पेठ, कर्नाळ नाका, शामरावनगर, हरिपूर रस्ता, शंभरफुटी रोड, खिलारे मंगल कार्यालय या परिसरात पाणी घुसले आहे. शनिवारी स्टेशन चौक परिसरात पाणी घुसले.
दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शनिवारी पावसाने उघडीप दिली. त्याशिवाय चार दिवसांनंतर प्रथमच सूर्यदर्शन झाले. त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे.
मंगळवारी दिवसभर पावसाच्या सरी सुरूच होत्या. मात्र बुधवारपासून सांगलीसह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यातच गुरुवारपासून कोयना आणि वारणा धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्याने सांगलीसह कृष्णा आणिवारणानदीकाठावर महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठावरील हजारो लोकांना स्थलांतरकरावे लागले. अनेकांची पिके, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शुक्रवारी दिवसभर आणि रात्री पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने लोक धास्तावले होते.
वरून दिवसभर संततधार पाऊस आणि कृष्णा नदीची सतत वाढत असलेला पातळी यामुळे सगळीकडे भितीचे वातावरण होते. लोक पाऊस थांबावा आणि पूर ओसरावा यासाठी अक्षरशः प्रार्थना करीत होते. अर्थात शनिवारी शहरातील अनेक भागात पाणी घुसले होते. नवनवीन भागात पाणी घुसून पुढे सरकत होते. त्यामुळे महापुराची धास्ती कायम होती.रात्रीपर्यंत तरी कृष्णा नदीची पातळी अजिबात कमी झालेली नव्हती.
मात्र शनिवारी सकाळी निदान पावसाने तरी उघडीप दिली. चार दिवसानंतर प्रथमच सूर्यदर्शन झाले. त्याचवेळी कोयना आणि वारणा धरणातून शनिवारी सकाळपासून विसर्ग काही प्रमाणात तरी कमी केल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे आहे त्या गंभीर परिस्थीतही नागरिकांना थोडा दिलासा मिळाला होता.