सांगली; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी आज जिल्ह्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. खानापूर – आटपाडी मतदार संघातील कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांना विचारले असता मंत्रिपदाचा फैसला 11 जुलैनंतर होणार आहे, असे सांगितले.
आमदार बाबर हे महाविकास आघाडी सरकारमध्ये असले तरी नाराज होते. दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री शिदे यांच्या उपस्थित आटपाडी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून मतदारसंघात हस्तक्षेप होत असून माजी आमदार सदाशिव पाटील यांनी पाठबळ दिले जात असल्याचा जाहीर आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आ. बाबर हे पहिल्यांदा त्यांच्या गटात गेले. सुरत, गुवाहटी या ठिकाणी बरोबर होते. राज्यात सत्ताबदल होऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातून आ. बाबर यांना मंत्रीपद मिळणार, अशी जोरदार चर्चा आहे.
बाबर हे जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी चौधरी यांची भेट घेतली. आ. बाबर दै. पुढारीशी बोलताना म्हणाले, गेल्या अडीच वर्षात विकास खुंटलेला होता. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. या सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतली.