सांगली; पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारपासून (दि. 1 जुलै) सिंगल यूज प्लास्टिक बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रबोधन तसेच कारवाईसाठी महापालिकेने 20 भरारी पथके, 4 फिरती पथके नियुक्त केली आहेत.
बंदी असलेल्या प्लास्टिकचे उत्पादन, साठवणूक, हाताळणी, विक्री आणि वापर यावर कायद्याने निर्बंध आणलेले आहेत. तरीही बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर सुरू आहे. अस्ताव्यस्त प्लास्टिक कचर्यांमुळे शहरांचे विद्रुपीकरण होत आहे. गटारी तुंबण्यास व त्यामुळे पावसाळ्यात नाल्यासह पावसाचे पाणी नागरी वस्तीत शिरण्यास प्लास्टिक हे एक प्रमुख कारण बनले आहे. त्यामुळे महापालिकेने दि. 1 जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिक विरोधात मोहीम हाती घेतली आहे.
महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, 'बंदी असणार्या प्लास्टिकचा साठा व विक्री विरोधात कडक कायदेशीर व दंडात्मक कारवाई होणार आहे. कारवाईसाठी प्रभागनिहाय 20 भरारी पथके तसेच 4 फिरत्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबविणे गरजेचे आहे'.
वैद्यकीय आरोग्याधिकारी तथा सिंगल यूज प्लास्टिक विरोधी मोहिमेचे समन्वयक डॉ. रवींद्र ताटे म्हणाले, सिंगल यूज प्लास्टिक बंदीसंदर्भात प्रभावी जनजागरणाबरोबरच कारवाईचा मार्गही अवलंबला जाणार आहे. दुकानदार, व्यावसायिकांनी प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणून कागदी अथवा कापडी पिशवीतून ग्राहकांना माल, साहित्य द्यावे.