सांगली : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात मंगळवारी पावसाने पूर्णपणे उघडीप दिली. पंधरा दिवसानंतर आज दिवसभर सूर्यदर्शन झाले. यामुळे शिवारात मशागतींची धांदल उडाली आहे. धरण परिसरातही पाऊस कमी झाला आहे. कोयना, चांदोली धरणे पन्नास टक्के भरली आहेत. कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी पाच ते सात फुटांनी कमी झाले आहे. सांगलीत पाणीपातळी 13 फुटापर्यंत आहे.
दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात मंगळवार, दि. 5 रोजी जोरदार पावसास सुरुवात झाली. पहिल्या आठवड्यात धरण परिसर व जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. दुसर्या आठवड्यातही पावसाचा जोर कायम होता. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर सलग 10 ते 12 दिवस अतिवृष्टी सुरू झाली. यामुळे धरणांतून पाणी सोडावे लागले. तसेच ओढे, नाले, शेतातील पाणी नद्यांत आले. त्यामुळे कृष्णा, वारणा, मोरणा नद्यांची पाणीपातळी वेगाने वाढली. ढगाळ वातावरणामुळे पंधरा दिवस सूर्यदर्शन झाले नाही. पाऊस व वाढलेले पाणी जिल्ह्यात दहा दिवस तळ ठोकून होते. सोमवारपासून पाऊस व पाणी हळूहळू कमी होऊ लागले. मंगळवारी मात्र जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली. सांगली शहर, मिरज, जत, खानापूर-विटा, वाळवा-इस्लामपूर, तासगाव, शिराळा, आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव या तालुक्यात दिवसभर वातावरण स्वच्छ होते. यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला. यामुळे शेतात भांगलण, टोकण, खत टाकणे, आळवणी, फवारणी यासह अन्य कामांची धांदल उडाली आहे.
धरण परिसरातील अतिवृष्टीही कमी झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आज पावसात 50 ते 75 टक्के घट झाली. मागील 24 तासात म्हणजे सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते मंगळवार सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे केवळ 23 तर मंगळवारी दिवसभरात 15 मिमी पाऊस पडला. महाबळेश्वर येथेही वरीलप्रमाणे अनुुक्रमे 42 व 11 मिमी पावसाची नोंद झाली. नवजाला 67 व 29 मिमी पाऊस पडला. धोम येथे शून्य व 1, कण्हेरला 4 व 0 तर चांदोलीत 9 व 7 मिमी पाऊस पडला. यामुळे धरणांत पाण्याची आवक घटली आहे. कोयनात प्रतिसेंकद अंदाजे 16 हजार क्युसेक पाणी येत आहे. धोम, कण्हेरमध्ये सुमारे 1500 ते दोन हजार तर चांदोलीत 6 हजार क्युसेक पाणी येत आहे. कोयना धरण सध्या 59.62 टीएमसी भरले आहे. या धरणातून 2100 क्युसेक पाणी सोडणे कायम आहे. धोम धरण 8.11 टीएमसी भरले आहे. कण्हेरमध्ये 8.11 टीएमसी साठा झाला आहे. चांदोली धरण 25.98 टीएमसी भरले आहे. या धरणातून 1835 क्युसेक पाणी प्रतिसेंकद वारणा नदीत सोडले जात आहे.
पाऊस व विसर्ग कमी झाल्याने कृष्णा, वारणा नद्यांचे वाढलेले पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे. आज दिवसभरात पाणी सहा ते सात फुटांनी कमी झाले. बुधवार सायंकाळपर्यंत पाणी पूर्णपणे पात्रात जाण्याची शक्यता आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात धोका पातळी फुटामध्ये पुढीलप्रमाणे : कृष्णा पूल (कराड) -9.4 (55), भिलवडी -16.3 (53), आयर्विन-सांगली -13(45). कर्नाटकातील अलमट्टी धरण 87.227 टीएमसी भरले आहे. या धरणात महाराष्ट्रातून एक लाख 36 हजार 469 क्युसेक पाणी जात आहे. तर या धरणातून आज सकाळी एक लाख 25 क्युसेक पाणी सोडले जात होते. ते सायंकाळी कमी करून 75 हजार करण्यात आले.