वारणावती; पुढारी वृत्तसेवा : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 90 मिलिमीटर पावसासह एकूण 1149 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे. धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. परिणामी येथील जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सोळा मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प आहे.
आठ मेगावॅट क्षमतेची दोन जनित्रे येथे आहेत. यातील एक जनित्र सुरू करून त्यातून 624 क्युसेक तर लो लेवल गेटमधून 1137 क्युसेक असा एकूण 1761 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीची पाणीपातळी वाढली आहे.
पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणात दररोज एक ते दीड टीएमसी पाण्याची वाढ होत आहे. धरणाची पाणीपातळी 614.90 मीटर वर पोहोचली आहे. उद्या परवा हे पाणी सांडवा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.
सध्या धरणात 16 ते 17 हजार क्यूसेक पाण्याची आवक आहे. त्या प्रमाणात हे पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे वारणा नदी पुन्हा पात्रा बाहेर जाऊन पूर येण्याची शक्यता आहे. सध्या धरणात 23.75 टीएमसी पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी 69.04 इतकी आहे.