विटा; पुढारी वृत्तसेवा : खोटे लग्न लावून देऊन पावणे दोन लाख रुपयांची फसवणूक करणार्या पाच जणांविरोधात विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत दत्तात्रय नागेश हसबे (वय 31, हिवरे, ता. खानापूर) या तरुणाने फिर्याद दिली आहे.
जयश्री गदगे (रा. जुगूल, ता. चिकोडी, कर्नाटक), सुनील दत्तात्रय शहा (रा. निपाणी, कर्नाटक), धनम्मा नागनाथ बिराजदार व प्रियांका व दीपाली विकास शिंदे (सर्व रा. सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, संशयितांनी संगनमत करून एका 21 वर्षीय मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दत्तात्रय हसबे या तरूणाकडून रोख एक लाख 70 हजार रुपये व उर्वरित पाच हजार रुपये ऑनलाईन फोन पे वरून, असे पावणेदोन लाख रुपये घेतले होते. संबंधित मुलीसोबत हसबे याचे लग्न लावून दिले. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास मुलीचे नातेवाईक हसबे याच्या घरी आले. त्यांनी मुलीला भिवघाट येथे कपडे खरेदीसाठी घेऊन जात असल्याचे सांगून सोबत नेले. हसबे आणि त्याचे नातेवाईक त्यांच्याबरोबर भिवघाट येथे गेले. यावेळी धनम्मा बिराजदार हिने आम्हाला खोटे लग्न करण्यासाठी 20 हजार रुपये दिल्याचे मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे वरील संशयितांनी आपले खोटे लग्न लावून देऊन आपली फसवणूक केल्याची फिर्याद दत्तात्रय हसबे यांनी दिली आहे.