Latest

सांगली-कोल्हापूर बायपास देतोय मृत्यूला निमंत्रण

Arun Patil

जयसिंगपूर ; संतोष बामणे : सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गावर तमदलगे (ता. शिरोळ) येथे असलेल्या पुलाला निम्म्यापर्यंत सुरक्षा पाईप किंवा कठडे नसल्याने येथून प्रवास करताना जीव मुठीत धरून करावा लागत आहे. शिवाय, हा ओढा 50 ते 60 फूट खोल आहे. यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ या ओढ्यावर सुरक्षा पाईप बसवाव्यात, अशी मागणी नागरिकांची व प्रवासधारकांची आहे.

सांगली-कोल्हापूर मुख्य महामार्गाला उदगाव-जयसिंगपूर शहराला बायपास म्हणून उदगाव ते थेट जैनापूर मार्ग तमदलगेपर्यंत प्रशस्त रस्ता करण्यात आला आहे. सध्या सांगली-कोल्हापूर महामार्ग हा रत्नागिरी-नागपूर महामार्गात विलीन झाल्याने या मार्गाच्या दुरुस्तीकडे सध्या बांधकाम विभाग व शासनाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत या मार्गाच्या गलथान कारभारामुळे तब्बल 200 हून अधिक जणांचे बळी गेले आहेत.

शिवाय, दररोज सातत्याने होत असलेल्या अपघातामुळे अनेकांना अपंगत्व आले आहे. यातच भर म्हणावी असेल तर तमदलगे येथील ओढ्याच्या सुरक्षा कठडाविना येथून प्रवास करावा लागतो. हातकणंगलेकडून सांगली-मिरजकडे येणारी वाहने सुसाट येत असतात. तमदलगे गावाच्या सुरुवातीलाच हा मोठा ओढा आहे. या ओढ्यावरील पुलाचे बांधकाम ही अर्धवट स्थितीत आहे. यामुळे एखादे वेळेस चालकाचा ताबा सुटल्यास वाहन थेट ओढ्यात कोसळण्याची भीती आहे. यापुढे तमदलगे गावाच्या सुरुवातीला वळण व पूल चढ असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होते.

याठिकाणी असलेल्या समस्याकडे पाहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळ नाही. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यानंतर या पुलाला सुरक्षा कठडा बसवण्यात येणार? असा सवाल विचारला जात आहे. सध्या हा मार्ग रत्नागिरी नागपूरमध्ये विलगीकरण झाला असला तरी सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या रस्त्यात काही त्रुटी तसेच रस्ते नादुरुस्त व समस्या असतील तर त्या बांधकाम विभागाने पुढाकार घेऊन सोडविण्याची गरज आहे.

..अन्यथा रास्ता रोको करू!

सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गावर तमदलगे येथील ओढ्यावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ओढ्यावर सुरक्षा कठडे बसवावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मात्र, अद्यापही बांधकाम विभागाला जाग आली नाही. त्यामुळे येत्या आठवड्याभरात ओढ्यावर सुरक्षा कठडा न बसवल्यास रास्ता रोको करू, असा इशारा शिवसेनेचे राकेश खोद्रे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT