सांगली; पुढारी वृत्तसेवा : एकत्रित घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीची कार्यवाही थांबवण्याबाबत महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. घोषित झोपडपट्टी भाग, ग्रुप कनेक्शन, नळ कनेक्शन नसणार्या व खासगी खुल्या भूखंडधारकांना केलेली सरसकट पाणी बिलाच्या आकारणीबाबत येणार्या महासभेमध्ये वसुलीच्या धोरणामध्ये बदल करण्यात येणार आहे. पूर्वीप्रमाणे नागरिकांना पाणी बिले स्वतंत्ररित्या देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली.
सूर्यवंशी म्हणाले, पाणी पुरवठा व घरपट्टी हे दोन स्वतंत्र विभाग आहेत. सध्या महापालिकेत अपुर्या कर्मचार्यांमुळे दोन्ही विभागात कर आकारणी व वसुली यावर मोठा ताण पडत आहे. या दोन्ही विभागांचे एकत्रिकरण करण्याबाबत प्रशासनाच्यावतीने प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे सादर केला होता. त्याअनुंषगाने महासभेत उपस्थित विषयावर प्रशासनाकडे सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणी केलेली होती. पाणी पुरवठा वितरण व्यवस्था देखभाल दुरुस्ती खर्च वसुली करिता व पाणी वितरण व्यवस्थेतील वित्तीय तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतूदीनुसार महानगरपालिका क्षेत्रातील ज्या मालमत्ताधारकांनी नळ जोडणी घेतलेली नाही, अशा मालमत्तानाही दर दोन महिन्याला किमान 320 रुपये दराने पाणीपट्टी आकारणी करण्यास मान्यता दिली. यामधून घोषित झोपडपट्टी भाग व ग्रुप कनेक्शन वगळली. पाणीपट्टी (द्विमासिक) व घरपट्टी बिलांचे एकत्रीकरण करून दोन सहामाहीमध्ये एकत्रित बिले नागरिकांना प्रदान करण्याबाबतही सभेने मंजुरी दिली होती. अनेक मीटर धारकांकडून नादुरुस्त मीटरची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे एक महिन्यापेक्षा जास्तकाळ मीटर नादुरुस्त असल्यास अशा मीटर धारकांना मीटर दुरुस्त करून सुस्थितीत आणेपर्यंत किमान आकारणी अथवा मीटर सुस्थितीत असतानाची आकारणी याच्या दुप्पट दराने पाणीपट्टी आकारणी करण्यासही या सभेने मान्यता दिली होती. वास्तविक मंजूर झालेल्या या ठरावाची अंमलबजावणी प्रशासनाकडून न करता सरसकट पाणीपट्टी व घरपट्टीची आकारणी करून एकत्रित बिले नागरिकांना वितरीत केली आहेत.
घोषित झोपडपट्टी भाग व ग्रुप कनेक्शन यांना पाणी बिलातून वगळणे क्रमप्राप्त होते. परंतु प्रशासनाने नळ कनेक्शन नसणार्या व खासगी खुल्या भूखंडधारकांना सरसकट पाणीपट्टीची आकारणी केली. त्यामुळे नागरिकांचा रोष व तक्रारी वाढल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार महिन्याच्या प्रत्येक शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठीची बैठक आयोजित करण्यात येते. त्यानुसार सांगलीत राष्ट्रवादी कार्यालयात बैठक झाली. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, शेखर माने, विष्णू माने, हरिदास पाटील व नागरिकांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार महापालिका प्रशासनाने घोषित झोपडपट्टी भाग, ग्रुप कनेक्शन, नळ कनेक्शन नसणार्या व खासगी खुल्या भूखंडधारकांना केलेल्या सरसकट पाणी बिलाच्या आकारणीबाबत येणार्या महासभेमध्ये वसुलीचे धोरणामध्ये बदल करण्यात येणार आहे. पूर्वीप्रमाणे नागरिकांना पाणी बिले स्वतंत्ररित्या देण्याबाबत निर्णय घेणेत येणार आहे. घोषित झोपडपट्टी भाग, ग्रुप कनेक्शन, नळ कनेक्शन नसणार्या व खाजगी खुल्या भूखंडधारकांना पाणीबिल आकारणी न करण्याचा निर्णय महासभेत होणार आहे. पूर्वीप्रमाणे नागरिकांना पाणी बिले स्वतंत्ररित्या देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर सूर्यवंशी यांनी दिली.