आष्टा; पुढारी वृत्तसेवा : आष्टा नगरीचे ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी (अंबाबाई) देवीच्या 'भावई' उत्सवातील 'मुखवटे', 'आरगडी' व 'पाखरे' हे खेळ मोठ्या उत्साहात व हजारो लोकांच्या उपस्थितीत झाले.
श्री चौंडेश्वरी देवीने स्वत: हातात शस्त्र (तलवार) घेऊन दैत्याबरोबर युद्ध केले. त्याचा वध केला. हे कथानक या खेळामधून दाखविले जाते. श्री चौंडेश्वरी मंदिरातील खोलीत वर्षभर बंद करून ठेवलेले मुखवटे बाहेर काढण्याअगोदर थोरात सरकार यांनी खोलीतील पेटीमधून रणचंडिकेच्या रूपातील मुखवटे बाहेर काढून त्याची पूजा केली. मोगर्यांच्या कळ्यांची आकर्षक जाळी विणून मुखवटे सजविण्यात आले. मुखवटे घेण्याचा मान सुतारांचा आहे. यावेळी देवळात जमलेल्या सोळा खेळगडी व चोवीस मानकर्यांना कुलकर्ण्यांकडून फुलांच्या माळा व पानाचे विडे देण्यात आले. मध्यरात्री दोन मुखवटे मंदिरातून बाहेर पडले.
'धावा' (रणयुद्ध) म्हणजे देवी व दैत्याचे समोरासमोर युद्ध सुरू होते. श्री चौंडेश्वरी (अंबाबार्ई) मंदिरापासून गणपती मंदिर, गांधी चौक, मारुती मंदिर अशा पाच ठिकाणी हा खेळ झाला. शेवटी दैत्य देवीला शरण येतो. यानंतर साजर्या करण्यात येणार्या आनंदोत्सवाला 'पाखरे' म्हणतात. या आनंदोत्सवानंतर मुखवटे देवळाकडे परत गेले. हा खेळ पाहण्यासाठी महाराष्ट्रसह कर्नाटकातून यावर्षीही हजारो भाविक आले होते.