file photo 
Latest

सांगली : अलमट्टीतील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्याचा निर्णय

मोनिका क्षीरसागर

सांगली : पुढारी वृत्तसेवा
कृष्णा उपखोर्‍यातील नदीकाठावरील कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील पूरनियंत्रणासाठी अलमट्टीतील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील जलसंपदा विभागातील अधिकार्‍यांची पूरनियंत्रणाबाबत ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत अलमट्टी धरणातील पाणीपातळी ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत नियंत्रित ठेवण्याचा निर्णय झाला.

ही बैठक जलसंपदा विभाग पुण्याचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत जीवित व वित्त हानी टाळून प्रभावी पूरनियंत्रणाच्या दृष्टीने कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये दररोज जलशास्त्रीय माहितीची देवाण-घेवाण करण्याचे ठरले. विविध धरणांमधून उपखोर्‍यातील विसर्गाचे एकत्रित परिचालन करण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये कृष्णाखोरे पूरनियंत्रण कक्ष, सांगली व अलमट्टी धरण व्यवस्थापन विभागामध्ये समन्वय साधण्यासाठी अनुभवी सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता यांची अलमट्टी धरणावर संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय झाला.

या बैठकीस कर्नाटक राज्याचे अलमट्टी धरण व्यवस्थापन विभागाचे मुख्य अभियंता एच. सुरेश, अधीक्षक अभियंता डी. बसवराज, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलींद नाईक, कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक सुर्वे, सातारा पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहीत बांदवडेकर, कोयना सिंचन विभाग कोयनानगरचे कार्यकारी अभियंता नितेश पोतदार तसेच कोयना, वारणा, दुधगंगा, राधानगरी धरण व्यवस्थापन व सिंचन व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा विभागामार्फत कृष्णा व भीमा खोर्‍यासाठी एककालिक आधार सामग्री अधिग्रहण प्रणाली अधिक सक्षम करण्यात आली आहे. या प्रणालीव्दारे पर्जन्यमान, जलाशयातील आवक, नदीची पाणी पातळी व विसर्ग यांची सध्यस्थिती व पुर्वानुमान उपलब्ध होते. या प्रणालीचा वापर अधिक सक्षमपणे करुन कृष्णा उपखोर्‍यातील सर्व यंत्रणामध्ये समन्वय साधून प्रभावी पूर नियंत्रण करता येईल, असा विश्वास मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांनी यावेळी व्यक्त केला. अशा प्रणालीचा अवलंब कर्नाटक राज्यामध्ये देखील करण्यात येत असल्याचे मुख्य अभियंता एच. सुरेश यांनी या बैठकीत सांगितले.

या बैठकीमध्ये राजापूर बंधार्‍याच्या खालील बाजूस पाच किलोमीटर अंतरावर नदीपात्रात नवीन पूल बांधकामासाठी करण्यात आलेला कॉपरडॅम व अनुषंगिक भरावा काढून घेण्याबाबत अधीक्षक अभियंता मिलींद नाईक यांनी संबंधितांना सूचना करण्यास सुचविले. त्याबाबत अधीक्षक अभियंता डी. बसवराज यांनी सहमती दर्शवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT