प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या 12 प्रेषितांबरोबर गुरुवारी शेवटचे भोजन घेतले. भोजनापूर्वी त्यांनी आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि सेवेत विनम्रता कशी असावी, याचे प्रात्यक्षिक दिले. दुसर्या दिवशी पवित्र शुक्रवारी त्याला वधस्तंभावर खिळून मारण्यात आले. तिसर्या दिवशी रविवारी ख्रिस्त मरणातून पुन्हा जिवंत झाला. ख्रिस्ताने सर्व मानवजातीची पापे स्वत:च्या खांद्यावर घेऊन ती वधस्तंभावर वाहिली. यासाठी की, त्यांनी पापबंधनातून मुक्त व्हावे. ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी यहुदी लोक प्राणी आणि पक्षी यांचे बळी देऊन देवाला पापमुक्तीसाठी होमार्पणे करीत असत. जुन्या करारातील अनेक पुस्तकांत त्याचे वृत्तांत आहेत. स्वत:चाच क्रुसावर बळी देऊन या प्रथेचा व कर्मकांडाचा प्रभू येशूने अंत केला. परमेश्वराने स्वत: पवित्र मारिया मातेच्या पोटी जन्म घेतला आणि वयाच्या तेहतिसाव्या वर्षी सर्व मानवजातीची पापे शिरावर घेऊन आपलाच देह क्रुसावर अर्पण केला.
प्रीतीच्या जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि फारच थोड्यांना तो सापडतो, असे प्रभू येशू म्हणतात. मृत्यूपूर्वी जेरुसलेमनगरीत ख्रिस्ताचे विजयी आगमन झाले. राजसत्ता आणि धास्तावलेली धर्मसत्ता यांनी एकत्र येऊन ख्रिस्ताला क्रुसावर ठार मारण्यासाठी कटकारस्थान केले. ख्रिस्ताच्याच 12 शिष्यांपैकी एक यहुदा होता. तो फितूर झाला. त्याने चांदीच्या तीस नाण्यांसाठी विश्वासघात करून येशूला पकडून दिले. ख्रिस्ताचा अकारण द्वेष करणार्या धर्मसत्तेकडून खोटे साक्षीदार तयार होते. ख्रिस्ताला वधस्तंभाची शिक्षा झाली. त्याचा अनन्वित छळ झाला. हाता-पायात खिळे ठोकून ख्रिस्ताला क्रुसावर खिळण्यात आले. परंतु, ख्रिस्ताने त्याला जीवे मारणार्या लोकांना क्षमा केली. प्रीती क्षमा करते. त्याचे मृत्यूनंतर तिसर्या दिवशी पुनरुत्थान झाले. या सर्व घटना ख्रिस्ताच्या बाबतीत होतील, याची भविष्यवाणी स्वत: ख्रिस्तानेही तीनवेळा केली होती.
प्रभू येशूला वधस्तंभावर खिळण्यासाठी गोलगोधा नावाच्या ठिकाणी नेण्यात आले. गोलगोधाचा अर्थ कवटीची जागा, येथेच सर्वाधिक गंभीर गुन्हेगारांना वधस्तंभावर चढविले जात असे. ते ठिकाण येरुशलेम शहराच्या तटबंदीबाहेर होते. गुन्हेगाराला त्याच्या वधस्तंभाचे ओझे डोंगराच्या माथ्यापर्यंत नेणे भाग पडत असे. परंतु, हा क्रुसभार वाहून नेण्यासाठी येशूला सिरेनिकर शिमोनाची मदतीची गरज लागली. पिलाताच्या दरबारात झालेला छळ, आसुडाचे फटके, रक्तबंबाळ शरीरातून झालेला रक्तस्राव यामुळे येशू शारीरिकद़ृष्ट्या अत्यंत दुर्बल झाला होता. त्याच्या वेदना कमी करण्यासाठी सैनिकांनी त्याला पेय देऊ केले.
परंतु, त्याने ते घेतले नाही. रोमन सैनिकांनी सकाळी 9 वाजता प्रभू येशूला सार्वजनिकपणे वधस्तंभावर खिळले. त्यांनी आणखी दोन मनुष्यांनासुद्धा वधस्तंभावर येशूच्या दोन्ही बाजूंना खिळले व मध्ये येशूला खिळले. तेव्हा दिवसाचा मध्य म्हणजे 12 वाजलेले असतानाही संपूर्ण प्रदेशात अंधार पडला. तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला. मग तीन वाजता प्रभू येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, 'एलोई, एलोई, लमा सबखथनी' म्हणजे माझ्या देवा, माझ्या देवा,
माझा त्याग तू का केलास? मग मोठ्याने आरोळी मारून येशूने प्राण सोडला. ती तारीख शुक्रवार, इसवी सन 1 एप्रिल, 33 होती.
'बायबल'मध्ये क्रुसावर अर्पण केलेल्या प्रभू येशूची तुलना यहुदी लोकांच्या वलहांडण सणात अर्पण केलेल्या कोकर्याशी केली आहे. वलहांडण सण हा इस्रायली लोकांना देवाने गुलामगिरीतून मुक्त केलेल्याची आठवण करून देतो. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा दिवस आठवण करून देतो की, ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकारले आहे. ते सर्व पाप आणि आत्मिक मृत्यूपासून मुक्त झाले आहेत. जे ख्रिस्ताला स्वीकारतात ते त्याचा पवित्र आत्मा स्वीकारतात जो प्रीती, सेवाभाव, क्षमा आणि सामर्थ्याने भरलेला आहे. जे ख्रिस्ताला स्वीकारतात ते सैतानाची द्वेषपूर्ण आणि स्वार्थाने भरलेली दुष्टाई म्हणजेच पापीवृत्ती नाकारतात.
ख्रिस्ताच्या क्रुसावरील समर्पणाच्या दिवसाला 'गुड फ्रायडे' किंवा 'शुभ शुक्रवार' असे म्हणतात. कारण, प्रभू येशूचा शुक्रवारी झालेला क्रुसावरील मृत्यू आणि तिसर्या दिवशी रविवारी झालेले पुनरुत्थान यामुळे मानवाला पापमुक्ती, आत्मिक तारण आणि सार्वकालिक जीवन प्राप्त होते. पुनरुत्थानाचा रविवार हा 'इस्टर संडे'चा सण म्हणून जगभर ओळखला व साजरा केला जातो. पुनरुत्थानानंतर वैयक्तिक व सामूहिकरीत्या शिष्यांना भेटत राहून चाळीसाव्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गारोहण केले.
– डॉ. मार्यान रॉड्रिक्स