सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे जिल्ह्यातील मनपा, जि. प. व 11 नगरपालिकांसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसींसाठी मार्ग खुला झाला आहे. त्यातून सोलापूर नगरपालिकेसाठी 113 पैकी 29, जिल्हा परिषदेच्या 77 पैकी 18, तर एकूण 11 नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये पैकी 73 जागा या ओबीसींसाठी आरक्षित आहेत. त्यामध्ये 50 टक्के पुरुष तर 50 टक्के महिलांसाठी आरक्षित आहेत.
मनपामध्ये दोन जागांमध्ये वाढ सोलापूर महापालिकेत ओबीसी सदस्यांची संख्या 27 वरुन 29 होणार आहे, अशी माहिती मनपाचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सन 2017 च्या सोलापूर मनपाच्या निवडणुकीत 102 सदस्य होते. 27 टक्के ओबीसी आरक्षणानुसार मनपात ओबीसी सदस्यांची संख्या 27 इतकी होती. आगामी निवडणुकीसाठी सोलापूर मनपाची सदस्य संख्या 102 वरुन 11 ने वाढून ती 113 इतकी झाली आहे. या नवीन संख्येनुसार आता मनपात ओबीसी सदस्यांची संख्या 29 इतकी राहणार आहे. यापैकी निम्मे पुरुष व निम्मे महिलांची संख्या असेल. निवडणूक आयोगाकडून येणार्या मार्गदर्शक तत्वानुसार ओबीसी आरक्षणाबाबत कार्यवाही होईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेत एक जागा वाढली
सोलापूर जिल्हा परिषदेत पूर्वी 68 जागांपैकी 17 जागा ओबीसींसाठी आरक्षित होत्या. आता जिल्हा परिषद गट वाढल्याने 77 सदस्यसंख्या झालीे आहे. त्यानुसार ओबीसीच्या संख्येतही एकने वाढ होऊन ही संख्या 18 वर गेली आहे.
11 नगरपालिका, नगररपंचायती
या सर्व ओबीसीसाठी 73 आरक्षित जागांपैकी 50 टक्के म्हणजे 37 जागा या महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे आता ओबीसी प्रवर्गातील इच्छुकांमध्ये या निकालाने उत्साहाचे वातावरण आहे.