Latest

सर्जिकल स्ट्राईक अभिमानास्पद : पंतप्रधान नरेंद्र मोदी

अमृता चौगुले

भारतीय लष्कराने 2016 मध्ये दहशतवाद्यांच्या लाँचपॅडवर घुसून केलेला सर्जिकल स्ट्राईक सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. तो प्रसंग आठवताना प्रत्येक भारतीयाची छाती आजही अभिमानाने फुलून येते. या मोहिमेत येथील जवानांनी बजावलेली भूमिका अत्यंत कौतुकास्पद आहे. एअर स्ट्राईक नंतरही येथील शांतता बिघडवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराचा गौरव केला.

पंतप्रधानांनी राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांना मिठाईही वाटली. त्यानंतर जवानांशी संवाद साधताना ते म्हणाले, तुम्ही भारतमातेचे सुरक्षा कवच आहात. तुमच्यामुळेच देशातील नागरिक शांतपणे झोपू शकतात, विविध सणांचा आनंद घेऊ शकतात. सीमेवर लढताना जवान जे धैर्य दाखवतात आणि जो त्याग करतात त्याला तोड नाही.

सर्जिकल स्ट्राईक चा दिवस माझ्या सदैव स्मरणात राहील. त्या दिवशी सर्व जवान मोहीम फत्ते करून सूर्यास्तापूर्वी परत येतील, अशी योजना आखली होती. माझे सर्व जवान सुखरूप परतले आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी मी कॉलची आतुरतेने वाट पाहत होतो. मोहीम फत्ते करून आणि कोणतीही जीवितहानी न होता सर्व शूरवीर विजयी मुद्रेने परतले. सर्व देशवासीयांचा उर अभिमानाने भरून आला, असे गौरवोद‍्गार मोदी यांनी काढले.

सर्जिकल स्ट्राईकनंतर या प्रदेशातील शांतता बिघडवण्याचे असंख्य प्रयत्न केले गेले, अजूनही केले जात आहेत; परंतु प्रत्येकवेळी आपल्या सैन्याने दहशतवादाला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे, असे सांगून ते म्हणाले की, सीमेवर आधुनिक पायाभूत सुविधा देण्यात येतील. त्यामुळे देशाच्या लष्करी क्षमतेत वाढ होईल. आत्मनिर्भरतेच्या बळावर ही क्षमता आणखी बळकट करण्यात येईल, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी आजपासून केदारनाथ दौर्‍यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून (दि. 5) केदारनाथ दौर्‍यावर जाणार आहेत. मात्र, पुजार्‍यांनी मोदी यांच्या दौर्‍याला चार महिन्यांपासून विरोध केल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी यापूर्वीच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांना केदारनाथच्या दौर्‍यावर जावे लागले आहे. पुजार्‍यांच्या नाराजीची दखल घेऊन पंतप्रधान मोदी चारधाम देवस्थान बोर्डासह राज्यातील 51 मंदिरांवरील सरकारी नियंत्रण काढून घेण्याची घोषणा करणार असल्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पुजार्‍यांसमवेत बंद खोलीत झालेल्या चर्चेत पुजार्‍यांच्या विरोधात कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे आश्‍वासन पंतप्रधानांच्या वतीने मुख्यमंत्री धामी यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

15 जानेवारी, 2020 मध्ये उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री यासह उत्तराखंडमधील 51 मंदिरांवर सरकारी नियंत्रणासाठी चारधाम देवस्थान बोर्डाची स्थापना केली होती. या निर्णयाला पुजार्‍यांनी विरोध करून याविरोधात आपले आंदोलन सुरू केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT