Latest

समुद्रातून बाहेर पडलेली पहिली जमीन होती भारताची!

Arun Patil

न्यूयॉर्क : या समुद्रवलयांकित पृथ्वीवर अब्जावधी वर्षांपूर्वी समुद्रातून भूखंड बाहेर येऊन जमिनीची निर्मिती झाली होती. समुद्रातून बाहेर आलेला जमिनीचा पहिला हिस्सा कोणता आहे हे समजल्यावर अनेकांना आश्चर्य वाटू शकेल. ही पहिली वहिली जमीन भारतीय भूप्रदेशातील होती. याचा अर्थ जगाच्या पाठीवर अस्तित्वात आलेला पहिला देश भारतच होता!

'पीएनएएस' या नियतकालिकामध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. हे संशोधन अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील वैज्ञानिकांनी मिळून केले आहे. त्यामध्ये आढळले की सुमारे 3.1 अब्ज वर्षांपूर्वी धरतीचा पहिला हिस्सा समुद्रातून बाहेर पडला होता.

त्या काळात समुद्रातून जो हिस्सा सर्वात आधी बाहेर पडला तो सध्याच्या झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्याचा असू शकतो असे या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. सिंहभूम जिल्ह्यात आढळणार्‍या खडकांमध्ये सुमारे 3.2 अब्ज वर्षांपूर्वीचे भूगर्भीय संकेत मिळतात. त्यामध्ये प्राचीन नदींचे प्रवाह, भरती-ओहोटी आणि किनारपट्टींचेही संकेत आहेत. त्यावरून असे दिसून येते की पृथ्वीच्या पाठीवरील हाच परिसर सर्वात आधी समुद्रातून बाहेर पडला होता.

मोनाथ युनिव्हर्सिटीतील डॉ. प्रियदर्शिनी चौधरी यांनी याबाबत सांगितले की आम्हाला एक असा वालुकाश्म सापडला होता ज्याच्या वयाचे अनुमान आम्ही युरेनियम आणि छोट्या खनिजांचे विश्लेषण करून काढले. असे अनेक खडक तिथे असून ते 3.2 अब्ज वर्षांपूर्वीचे आहेत. हे खडक प्राचीन नद्या, तट आणि उथळ समुद्रामुळे बनलेले होते. त्यावरून आम्ही असा निष्कर्ष काढला की हा परिसर सुमारे 3.1 अब्ज वर्षांपूर्वी समुद्रातून बाहेर आला होता.

सिंहभूम जिल्ह्यातील जमिनीत ग्रॅनाईट मोठ्या प्रमाणात असून हे ग्रॅनाईट 3.5 अब्ज वर्षांपूर्वीचे आहे. पृथ्वीच्या पोटात सुमारे 35 ते 45 किलोमीटर खोलीवर झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो लाव्हा बाहेर आला त्यापासून हे ग्रॅनाईट बनलेले आहे. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातही जमिनीचे काही प्राचीन हिस्से आढळले आहेत; पण या सर्वांमध्ये सिंहभूम जिल्हा सर्वात अधिक पुरातन असल्याचे आढळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT