'बी-रिअल' नावाच्या अॅपने लोकप्रियतेबाबत जोरदार मुसंडी मारल्यामुळे, आघाडीच्या टॉप दहा अॅप्सच्या यादीतून 'फेसबुक' बाहेर फेकले गेले. साहजिकच, या 'बी-रिअल' अॅपबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता निर्माण झाली. 'जसे आहात तसे' स्वत:ला सादर करा, हे या अॅपचे आशयसूत्र असल्याचे दिसते. गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये लाखो जणांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. भारतातही हे अॅप वेगाने लोकप्रिय होत आहे.
नव्वदीच्या दशकात इंटरनेटचा उदय झाला. त्यामुळे सर्वाधिक वेगवान दळणवळणाचे साधन उपलब्ध झाले. मात्र, स्थलांतरितांमध्ये गावाचा-मित्रांचा संपर्क कायम ठेवण्याची भावनिक भूक होती. समान विचार असणार्या नागरिकांशी संपर्क ठेवणे, विचारांची देवाण-घेवाण करणे आवश्यक वाटू लागले. आपले विचार मांडण्याची, एखाद्या मुद्द्यावर जनमत तयार करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, अशी गरज वाटू लागली. आणि याच गरजेतून सोशल नेटवर्किंग वेबसाईटची निर्मिती झाली. सुरुवातीला 'द वेल'(1985), 'जिओसिटीज'(1994) आणि 'ट्रायपॉड'(1995) या कम्युनिटींची स्थापना झाली.
एकमेकांशी संवाद साधणे आणि वैयक्तिक मते, कल्पना मांडणे हा या कम्युनिटींचा हेतू होता. याचेच पुढचे पाऊल म्हणून 'क्लासमेट डॉट कॉम'(1995) आणि 'सिक्स डिग्री डॉट कॉम'(1997) यांचा उदय झाला. वर्गमित्रांशी असणारा संपर्क कायम ठेवणे हा 'क्लासमेंट डॉट कॉम'चा उद्देश होता. तर अप्रत्यक्षरित्या बंध निर्माण करण्याचे उद्दिष्ट 'सिक्स डिग्री डॉट कॉम' समोर होते. यातून तरुणांची सोय होत असली तरी त्यांचे समाधान होत नव्हते. त्यांच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या, त्यामुळेच सोशल नेटवर्किंग वेबसाईट्स सुरू झाल्या. 2002 ते 2004 या काळात बहुतांश सोशल नेटवर्किंग वेबसाईट्स सुरू झाल्या. आज जगभरात 400 पेक्षा अधिक सोशल नेटवर्किंग वेबसाईट्स आहेत.
यामध्ये 'फेसबुक', 'ट्विटर', 'इन्स्टाग्राम' आणि 'व्हॉट्स अॅप', 'टेलिग्राम' हे बिनीचे शिलेदार आहेत. यापैकी 'फेसबुक'चा निर्माता मार्क झुकेरबर्ग याने 'व्हॉट्स अॅप' आणि 'इन्स्टाग्राम'चे अधिग्रहण केल्यानंतर तो सोशल मीडियाच्या क्षेत्रातील बडा खेळाडू बनला. जेन क्रूम आणि ब्रायन अॅक्टन यांनी 'व्हॉट्स अॅप'चे लाँचिंग 2009 मध्ये केले होते. तथापि, 2014 मध्ये 'फेसबुक'ने 1.8 लाख कोटींना 'व्हॉट्स अॅप' विकत घेतले. आज जगभरात 'व्हॉट्स अॅप' वापरणार्यांची संख्या 300 कोटींहून अधिक आहे. केविन सिस्ट्रोम आणि माईक क्रीगर यांनी बनवलेली 'इन्स्टाग्राम' 2010 मध्ये सुरू झाली; परंतु 2012 मध्ये 7200 कोटी रुपये देऊन 'फेसबुक'ने त्याची खरेदी केली.
काही महिन्यांपूर्वी 'टेस्ला'चे निर्माते एलॉन मस्क यांनी 'ट्विटर'च्या खरेदीसाठी करार केला होता; परंतु काही मुद्द्यांबाबत अस्पष्टता असल्याच्या कारणावरून हा करार रद्द करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे सद्य:स्थितीत सोशल मीडियाच्या विश्वात मार्क झुकेरबर्ग यांचा वरचष्मा आहे, असे म्हणण्यास जागा आहे. असे असले तरी मध्यंतरीच्या काळात 'फेसबुक'बाबत अनेक नकारात्मक गोष्टी समोर येत गेल्या. विशेषतः 'फेसबुक' वापरकर्त्यांच्या माहितीचा व्यावसायिक वापर करून गोपनीयतेला मूठमाती दिल्याचे आरोप झाले. यादरम्यान झुकेरबर्गने त्याचे नामांतर करून 'मेटा' असे केले; परंतु यूझर्सना ते फारसे रुचल्याचे दिसले नाही. परिणामी 'फेसबुक'चा वापर करणार्यांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याचे समोर आले.
2021 च्या चौथ्या तिमाहीमध्ये जगभरातील जवळपास 5 लाखांहून अधिक यूझर्सनी 'फेसबुक'ला रामराम केला. 'टिकटॉक' आणि 'युट्यूब'कडून 'फेसबुक'पुढे मोठे आव्हान उभे केले आहे. याखेरीज जगभरात विस्तारलेल्या आणि लाखो जणांसाठी 'रोटी, कपडा आणि मकान' यांच्या बरोबरीने जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या 'फेसबुक'ला आर्थिक अडचणी भेडसावू लागल्याच्या बातम्याही समोर येऊ लागल्या. अॅपलच्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे 'फेसबुक' अडचणीत आले आहे.
अशा काहीशा प्रतिकूल बनलेल्या परिस्थितीत 'फेसबुक'ला आणखी एक धक्का बसला आहे. 19 ऑगस्ट रोजी आयओएसच्या अॅप स्टोअरमधील टॉप-10 म्हणजेच आघाडीच्या दहा अॅप्सच्या यादीतून 'फेसबुक' बाहेर फेकले गेले. गेले दशकभर गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित, ग्रामीण-शहरी, विकसित-विकसनशील अशा सर्व स्तरांमध्ये विस्तारलेल्या 'फेसबुक'ची गणना आघाडीच्या दहा अॅप्सच्या यादीत न होणे, ही बाब निश्चितच लक्षणीय आणि आश्चर्यकारक होती.
असे का घडले? याचे कारण 'बी-रिअल' नावाच्या एका नव्या अॅपने लोकप्रियतेबाबत जोरदार मुसंडी मारल्यामुळे 'फेसबुक' बाहेर फेकले गेले. एखाद्या छोट्या किंवा तुलनेने नव्या असलेल्या अॅपने या क्षेत्रातील बॉस असणार्या अॅपला बाहेर फेकले गेल्याची घटना प्रथमच घडली. साहजिकच या 'बी-रिअल' अॅपबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. वास्तविक, हे अॅप 2019 मध्ये सोशल मीडियाच्या विश्वात अवतरले. परंतु, अत्यंत अल्पावधीत ते प्रचंड लोकप्रिय झाल्याचे दिसून आले. खरे पाहता, या अॅपची जागतिक पटलावर चर्चा होण्यास सुरुवात झाली, ती तीन महिन्यांपूर्वी झालेल्या 'दावोस' परिषदेमुळे. 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'ने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट टाकली आणि त्यामध्ये 'बी-रिअल' अॅपचा वापर करण्याचा सल्ला दिला.
फोरमच्या म्हणण्यानुसार, हे अॅप मानसिक आरोग्य आणि सोशल मीडियाचा दबाव यांचा मुकाबला करण्यासाठी प्रभावी आहे. खरे पाहता, या अॅपमध्ये कोणतेही फिल्टर नाहीये, फॉलोअर्स नाहीयेत, खूप सार्या इमोजी पोस्ट करण्याचा कोणताही पर्याय नाहीये. असे असूनही या अॅपकडे तरुण पिढीचा ओढा वाढत चालला आहे.
'बी-रिअल' या अॅपने आपली ओळख स्पष्ट करताना 'नॉट अनादर सोशल नेटवर्क' असे म्हटले आहे. त्यानुसार हे अॅप स्वत:ला सोशल नेटवर्किंगच्या मायाजालातील एक घटक मानत नाही. हे अॅप अॅपलच्या अॅप स्टोअरमध्ये आणि गुगलच्या फ्ले-स्टोअरमध्ये उपलब्ध असून, त्याचा साईज अनुक्रमे 41.9 एमबी आणि 23 एमबी इतका आहे.
या अॅपमध्ये लॉग-इन करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. वापरकर्ता केवळ आपले नाव, मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून यूझरनेम बनवून या अॅपचा वापर करू शकतो. प्रश्न असा उरतो की, 'फेसबुक'ला टक्कर देणार्या या अॅपचे वेगळेपण काय आहे? त्यातील कोणते फिचर तरुणांना आकर्षित करत आहे? याचे उत्तर या अॅपच्या रचनेमध्ये आहे. एकदा हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर दिवसभरात दोन वेळा हे अॅप आपला फोटो काढते आणि तो पोस्ट केला जातो. या दोन वेळा कोणत्या हे ठरवण्याचा अधिकार युजरला नाही. 'बी-रिअल' अॅप कोणत्याही वेळी आपोआप सुरू होऊन हे छायाचित्रण करू शकते.
यासाठी काही मिनिटे आधी आपल्याला एक नोटिफिकेशन येते आणि ते आल्यानंतर लागलीच तुमच्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा सुरू होतो आणि आपल्याला फोटो काढण्यासाठी अवघी दोन मिनिटे दिली जातात. साहजिकच, या दोन मिनिटांमध्ये तुम्ही कसल्याही अवतारात असाल किंवा काहीही करत असाल, तरी ते पुढच्या आणि मागच्या अशा दोन्ही कॅमेर्यातून अचूकपणाने टिपले जाते आणि पोस्ट केले जाते. उदाहरणार्थ, तुम्ही कार्यालयामध्ये अत्यंत वैतागून चिडलेल्या अवस्थेत असाल किंवा कंटाळून गेलेले असाल आणि अशा वेळी अचानक हे अॅप सुरू झाले, तर तुमच्या प्रत्यक्ष स्थितीची प्रतिमा टिपण्याचे काम हे अॅप करते.
नोटिफिकेशन मिळाल्यानंतर काही क्षणात स्मार्टफोनचे दोन्ही कॅमेरे सुरू होत असल्यामुळे, तुम्हाला असलेली स्थिती बदलण्याची संधीच मिळत नाही. रियल टाईम म्हणजेच त्या क्षणाला जे काही घडत आहे ते क्लिक करावे लागते. यासाठी कोणताही रिटेक दिला जात नाही. या अनोख्या फिचरमुळेच अॅपचे नाव 'बी-रिअल' असे ठेवण्यात आले आहे. कारण यामध्ये वास्तवदर्शी चित्र किंवा प्रतिमा शेअर करण्यात येते. यासाठी तुमची परवानगी असेल तर ठीक. नसल्यास तुम्ही त्याला नकार दर्शवू शकता. होकार दर्शवून तुम्ही फोटो काढले, तर त्यावेळी हे अॅप वापरणारे तुमच्या यादीतील जितके मित्र असतील तर त्यांनाच ते पाहता येतात. तसेच तुम्ही फोटो अपलोड करत नाही तोपर्यंत तुम्हाला मित्रांचा कंटेटही दिसू शकत नाही.
सोशल मीडियाच्या क्षेत्रात असलेल्या अॅपपेक्षा अभिनव संकल्पना घेऊन हे अॅप अवतरले आहे. याला 'बी-रिअल' नावही अतिशय चपखल आहे कारण सोशल मीडियाच्या क्षेत्राला आभासी जग म्हटले जाते. याचे कारण सोशल मीडियावर पोस्ट केले जाणारे फोटो, व्हिडीओ हे बहुतेकदा पूर्णपणे वास्तवदर्शी नसतात. त्यातील आकर्षकपणा, सौंदर्य, झगमगाट वाढवण्यासाठी पूर्वनियोजित काम केलेले असते. अगदी सेल्फीचेच उदाहरण घेतले, तर कोणीही व्यक्ती सोशल मीडियावर सेल्फी पोस्ट करण्यापूर्वी आपले केस विंचरतो, ड्रेस व्यवस्थित करतो, चेहरा स्वच्छ करतो.
अनेकजण मेकअप करतात, प्रकाशव्यवस्था कशी आहे पाहतात. इतके करूनही फोटो व्यवस्थित आला नाहीतर पुन्हा काढतात. काढलेल्या फोटोवरही विविध अॅप्लिकेशन्सचा, फीचर्सचा वापर करून त्याचा आकर्षकपणा वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि मगच ते पोस्ट केले जातात. मध्यंतरीच्या काळात तर सेल्फीसाठी काढल्या जाणार्या फोटोंसाठी तोंडाचा विशिष्ट प्रकारचा आकार करण्याची टूम आली होती.
हे फॅड इतके वाढले होते की, त्यासाठी शस्त्रक्रिया करून घेतल्या जात होत्या. हा सर्व आटापिटा करण्याचे कारण एकच, इतरांपेक्षा आपण सर्वस्वी छान दिसले पाहिजे. साहजिकच या प्रयत्न-प्रक्रियांती केल्या गेलेल्या पोस्टस् या वास्तवाशी विसंगत असतात. अन्न पदार्थांच्या क्षेत्रातील जाहिरातींमध्ये ते पदार्थ आकर्षक दिसण्यासाठी विशिष्ट प्रकारची फोटोग्राफी केली जाते. त्यामुळे तो पदार्थ पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटते आणि ग्राहकवर्ग त्याकडे आकर्षित होतो. सोशल मीडियावर अशा असंख्य पदार्थांची छायाचित्रे-व्हिडीओ आपण पाहत असतो. प्रत्यक्षात त्याची चव, त्याचे आरोग्यासाठी असणारे फायदे याचा विचार मागे पडून आकर्षकता हा घटक केंद्रबिंदू बनून पुढे येतो. याला दिखाऊपणाही म्हणता येईल.
हा कृत्रिम दिखाऊपणा वास्तवापेक्षा सर्वार्थाने वेगळा असतो. त्यातून आपल्याला अनुकूल असणारा आभास तयार करण्याचा प्रयत्न होतो. पण यामुळे अनेकदा समोरच्या व्यक्तींची फसगत होण्याची शक्यता असते. 'बी-रिअल' अॅपने नेमकी हीच बाब हेरली आहे. 'जसे आहात तसे' स्वतःला सादर करा, हे या अॅपचे आशयसूत्र असल्याचे दिसते. त्यामुळे उगाचच होणार्या भ्रामक समजांना छेद दिला जातो. हीच बाब तरुण पिढीला रुचली असल्याचे दिसत आहे. कारण गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये लाखो जणांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. भारतातही हे अॅप वेगाने लोकप्रिय होत आहे. 2022 मध्ये हे अॅप 2.8 कोटी जणांनी डाऊनलोड केले आहे.
'फेसबुक' आणि 'इन्स्टाग्राम' वापरून कंटाळलेल्या यूझर्ससाठी हे नवे अॅप नव्या मनोरंजनाचे व्यासपीठ बनताना दिसत आहे. तसेही अलीकडील काळात सोशल मीडियाच्या क्षेत्रातील ठरावीक साईटस् आणि त्यांचे ठरावीक फीचर्स यांचा उबग आल्याच्या भावना अनेक जण व्यक्त करत असतात. यामुळे अनेकांचा या नवसमाजमाध्यमांमधील रसही कमी होत चालल्याचे दिसत आहे. हे लक्षात घेऊन प्रस्थापित कंपन्या सातत्याने छोटी-मोठी नवनवीन फीचर्स यूझर्सना आपल्याशी बांधून ठेवण्यासाठी आणत आहेत. पण सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर हा युवापिढीकडून केला जातो.
आजच्या या नवतरुणाईला 'मॅगी जनरेशन' म्हटले जाते कारण या पिढीला सारे काही झटपट हवे असते. पण कमी वेळाच्या आकर्षणामुळे त्यांच्याकडून होणारी नावीन्याची मागणीही सतत वाढत चालली आहे. आज साधारणतः चाळीशीच्या पुढच्या पिढीला त्यांच्या बालवयात-तरुणवयात सुट्ट्यांमध्ये एखादा व्हिडीओ गेम खेळायला मिळाला तरी आयफेल टॉवर पाहिल्याचा आनंद वाटायचा. पण आज बदलत्या काळातील मुलांसाठी मोबाईलवर हजारो गेम्स उपलब्ध असूनही अनेकांचे मन त्यात रमत नाही. त्यांना सतत नवीन काहीतरी हवे असते. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील व्यावसायिकांनी ही मानसिकता अचूकपणाने हेरल्यामुळे ते सतत नवनवीन गोष्टी आणत असतात.
'बी-रिअल' अॅपही याच प्रयत्नांचा एक भाग म्हणावा लागेल. पण या अॅपच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका घेऊन आता 'मेटा' आणि 'इन्स्टाग्राम'ही तशाच धाटणीचे बदल करू पाहत आहे. 'इन्स्टाग्राम'ने अलीकडेच ड्युअल कॅमेर्याचा वापर करण्याचा पर्याय आणला असून, त्यानुसार यूझर्सना फ्रंट आणि रिअर अशा दोन्ही कॅमेर्यांच्या साहाय्याने एकाच वेळी व्हिडीओ आणि फोटो रेकॉर्ड करता येणार आहे. तसेच कँडिडेट चॅलेंज फीचर नावाने एक नवीन फीचरही आणले जात आहे. हे फीचर 'बी-रिअल' अॅपशी मिळतेजुळते असल्याची चर्चा आहे. एका नवोदित अॅपला मिळालेले हे यश उल्लेखनीय म्हणावे लागेल.
दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे, या घडामोडींमधून आजच्या काळात व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होताना सर्जनशीलता-अभिनव संकल्पना किती महत्त्वाच्या आहेत, हे लक्षात येते. दुसरी गोष्ट म्हणजे, टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील कंपन्यांच्या अशा नवनवीन संकल्पनांमागे अर्थकारण दडलेले असते, याचा विसर सर्वसामान्य म्हणून आपल्याला पडता कामा नये. त्याचबरोबर या कंपन्यांकडून सातत्याने आपल्या खासगीपणाच्या अधिकारावर आणि गोपनीयतेवर गदा आणण्याचे सुप्त प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे नव्या गोष्टींच्या आकर्षकपणाने हुरळून जाताना सावध राहणे गरजेचे असते. कारण अशा अर्थकारणातील 'रिअल' बाजू कधीच लोकांपुढे सहजगत्या येऊ दिली जात नाही.