Latest

समाजभान – वर्णद्वेषातून हिंसाचार

सोनाली जाधव
समाजभान – वर्णद्वेषातून हिंसाचार (आरती आर्दाळकर-मंडलिक)

श्‍वेतवर्णीयांच्या वर्चस्ववादी विचारधारेत 'ग्रेट रिप्लेसमेंट थिएरी' म्हणजे महान बदल ही संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजू होताना दिसत आहे. श्‍वेतवर्णीय समुदायाची जागा, त्यांचे हक्‍क, महत्त्व, संधी हे स्थलांतरित लोक बळकावत आहेत; अशा तत्त्वावर ही संकल्पना आधारलेली आहे. त्यातूनच इतर वंश, वर्णाच्या लोकांच्याप्रती द्वेष मनात धरून हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे.

दिनांक 14 मे 2022 रोजी न्यूयॉर्क राज्यातील बफेलो या शहरातील एका सुपरमार्केटमध्ये एका व्यक्‍तीने बेछूट गोळीबार केला. त्यात 10 लोक मारले गेले व तीन गंभीररित्या जखमी झाले. हल्लेखोर हा 18 वर्षांचा श्‍वेतवर्णीय तरुण होता. त्याचे नाव पायटॉन गेन्ड्रॉन. त्याने हे कृत्य श्‍वेतवर्णीय श्रेष्ठता व वर्चस्वामधूनच केले होते. ज्याला 'व्हाईट सुप्रिमसी' म्हणतात. या तरुणाने हल्ल्याच्या आधी 180 पानांचा वांशिकतेवर जाहीरनामा लिहून तो प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये त्याने तथाकथित वर्णद्वेषी सिद्धांतावरच भर दिला होता. त्यामधून त्याचा इतर वंश विशेषतः कृष्णवर्णीयांबद्दल असलेला तिरस्कार स्पष्ट होतो. हल्ला झालेल्या एकूण 13 लोकांपैकी 11 लोक हे कृष्णवर्णीय होते. तो त्या शहरातला रहिवासी नव्हता, दोनशे मैलांवरून येऊन त्याने अशा निर्दयी हत्या केल्या आणि पुन्हा अमेरिकेतील वंशभेद चव्हाट्यावर आला. अटर्नी जनरल मेरिक यांनी या हल्ल्याला 'तिरस्कारातून व वर्णभेदातून प्रवृत्त होऊन केलेला हिंसाचार' असे म्हटले आहे.

श्‍वेतवर्णीय लोक हे सर्व वर्णात, वंशात श्रेष्ठ आहेत, त्यामुळे त्यांनी बाकीच्या लोकांच्यावर सत्ता गाजवली पाहिजे, असा एकंदर श्‍वेतवर्णीय वर्चस्वाचा सूर दिसून येतो. अमेरिकेमध्ये प्रामुख्याने दक्षिणेकडील राज्यात 19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत गुलाम ठेवण्यास कुणाचीही मनाई नव्हती. 1865 साली गुलामगिरीला कायद्याने बंदी घालण्यात आली. पण ती कागदोपत्रीच राहिली. श्‍वेतवर्णीयांनी गुलाम ठेवले नाहीत. पण इतर वर्ण, वंशाबद्दलची अढी त्यांच्या मनातून गेली नाही. ती तशीच राहिली. त्याला खतपाणी घालण्याचे काम राजकारण्यांनी केले, त्यामुळे तो द्वेष तसाच धगधगत राहिला. निवडणुका आल्या की, सत्ता काबीज करण्यासाठी हे असले वंश, वर्ण, जात, धर्म, विचारसरणी यावर आधारलेले ब्रह्मास्त्र बाहेर काढले जाते. त्याला कोणत्याही देशाचे राजकारण अपवाद नाही. जगात सगळीकडे कमी-जास्त प्रमाणात हे सुरूच आहे.

अँटी-डीफेमशन लीगच्या सर्व्हेनुसार गेल्या दशकात अमेरिकेत या अशाच राजकीय पक्षांच्या जहाल विचारांच्या अतिरेकपणामुळे 450 लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. यासाठी उजव्या विचारसरणीचे 75% तर इस्लामिक अतिरेकी 20% व डाव्या विचारसरणीचे 4% जबाबदार आहेत. त्यातले अर्धे लोक हे श्‍वेतवर्णीय वर्चस्वाचे बळी ठरले आहेत. वरील टक्केवारीवरून असे दिसते की, डाव्या विचारसरणीपेक्षा उजवा राजकीय गट हिंसाचाराला प्रोत्साहन देतो. हा उजवा विचारसरणीचा गट म्हणजे रिपब्लिकन पक्ष. हे कट्टरवादी हत्येसोबत इतरही अनेक बेकायदेशीर मार्ग पत्करून हिंसा पसरवितात. त्याचे अलीकडेच उदाहरण म्हणजे 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेच्या संसदेवर स्वकीयांनीच (?) केलेला हल्ला. त्यांच्या नेत्यांची चेतावणीची भाषाच या त्यांच्या अनुयायांना असे कृत्य करण्यास प्रोत्साहन देत असते. त्यात ट्रम्प यांचा नंबर सर्वात आधी लागतो. याशिवाय पुरातनमतवादी माध्यमे जी अशा बेकायदेशीर, हिंसाचाराला राजकीय पक्षप्रेम, पक्षाचा अजेंडा, देशप्रेम अशी गोंडस नावे देऊन त्याचे समर्थन करतो. बरेच उजव्या विचारसरणीचे राजकीय नेते ही अशी चेतावणीची भाषा वापरीत नाहीत; पण पक्षातील जे वापरतात, त्यांना आडवीतही नाहीत.

या श्‍वेतवर्णीयांच्या वर्चस्ववादी विचारधारेत 'ग्रेट रिप्लेसमेंट थिएरी' म्हणजे महान बदल ही संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजू होताना दिसत आहे. श्‍वेतवर्णीय समुदायाची जागा, त्यांचे हक्‍क, महत्त्व, संधी हे स्थलांतरित लोक बळकावत आहेत अशा निराधार तत्त्वावर ही ग्रेट संकल्पना आधारलेली आहे. त्यातूनच इतर वंश, वर्णाच्या लोकांच्याप्रती द्वेष मनात धरून हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे आणि या संकल्पनेवर अगणित अमेरिकन लोक विश्‍वास ठेवतात, ही बाब जास्त धक्‍कादायक आहे. 'दि असोसिएटेड प्रेस' व 'नॉर्क सेंटर फॉर पब्लिक अफेयर्स रिसर्च' यांनी डिसेंबरमध्ये घेतलेल्या सर्व्हेनुसार, अमेरिकेत जन्मलेल्या लोकांना जाणूनबुजून डावलून त्यांची जागा स्थलांतरितांना दिली जात आहे, असा विश्‍वास एक तृतीयांश अमेरिकन प्रौढांना आहे. तर जसजसे बाहेरचे लोक अमेरिकेत येत आहेत, तसतसा मूळच्या अमेरिकन लोकांचा आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक प्रभाव कमी होत जाण्याची भीती 29% लोक बाळगतात. यामध्ये रिपब्लिकन लोक जास्त आहेत. मॅच्यचुट्स युनिव्हर्सिटीच्या सर्व्हेनुसार दोन तृतीयांश रिपब्लिकन लोकांना असे वाटते की, 'स्थलांतरितांची संख्या वाढणे म्हणजे अमेरिकेची संस्कृती व ओळखीवर त्याचा घातक परिणाम होणे.' तसेच राजकीय सत्ता ही या बाहेरून आलेल्यांच्या व अल्पसंख्याकांच्या हातात जात आहे, असा गवगवा या श्‍वेतवर्णीय समुदायाकडून करण्यात येतो. त्यातूनच 'पुन्हा एकदा अमेरिकेला महान बनवूया'सारख्या घोषणा ऐकायला मिळतात. आपणच देशाचे, समाजाचे हितचिंतक असून; आपला हक्‍क, आपले स्थान सरळपणे नाही जमले तर हल्ला करून, हिंसाचाराच्या मार्गाने मिळवले पाहिजे, अशी शिकवण ग्रेट रिप्लेसमेंटसारख्या तथाकथित संकल्पनेतून रुजवली जाते.

या संकल्पनेचे मूळ युरोपमध्ये सापडते. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रेंच राष्ट्रवादाचा जनक मौरीअस बर्रेस याने ज्यु लोक आपल्यावर सत्ता गाजवतील व आपली मातृभूमी नष्ट करतील, असे म्हटले होते. अशाच प्रकारची संकल्पना जर्मनीमध्ये नाझी लोकांनी राबवली होती. ख्रिश्‍चनधर्मीय व ज्यु लोकांचे पहिल्यापासूनच वैर आहे. ज्यु लोकांची अमेरिकेतील वाढती संख्या त्यांना धोकादायक वाटू लागली. त्यातूनच त्यांना विरोध करण्यासाठी ग्रेट रिप्लेसमेंट संकल्पना उदयास आली. हळूहळू कृष्णवर्णीय, इतर वंशाचे, अल्पसंख्याक असे सगळेच त्यांना आपले विरोधक वाटू लागले. 2017 साली श्‍वेतवर्णीय समुदायाने व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीमध्ये 'ज्यु लोक वा इतर कुणीही आमची जागा घेऊ शकणार नाही,' असे म्हणत मोर्चा काढला. 2012 साली विस्कॉन्सिन येथील गुरुद्वारावर हल्ला झाला होता, त्यात सहा शीख बळी पडले. 2015 साली साऊथ कॅरोलिना येथील हल्ल्यात नऊ, तर 2019 साली टेक्सासमधील वॉलमार्ट या सुपरमार्केटमध्ये तेवीस लोकांना या श्‍वेतवर्णीयांच्या तिरस्कारामुळे आपले प्राण गमवावे लागले. याच द्वेषभावनेतून दोन वर्षांपूर्वी एका पोलिस अधिकार्‍याने जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्‍तीचा क्षुल्लक अपराधासाठी त्याच्या मानेवर आपला गुडघा दाबून जीव घेतला होता. बफेलो हल्ल्याला एक आठवडा झाला असतानाच, टेक्सास येथील प्राथमिक शाळेत एका 18 वर्षीय माथेफिरूने बेछूट गोळीबार करत 19 मुले व 2 मोठ्या माणसांचा बळी घेतला. स्वरक्षण या नावाखाली मिळणार्‍या बंदुका व त्याचे परवाने याचा वापर ग्रेट रिप्लेसमेंटसारख्या संकल्पनेतून, मानसिक आजारातून, थ्रिल म्हणून निष्पाप लोकांना मारण्यासाठी केला जात आहे. स्वतःला महासत्ता म्हणवून घेणार्‍या अमेरिकेला हिंसाचारावर नियंत्रण ठेवता येत नाही कारण त्यापाठीमागेही राजकीय स्वार्थ आहे. बंदुकीचा परवाना काढून घेणे दोन्हीही पक्षाला जमत नाही. त्याचा परिणाम थेट मतांवर होईल म्हणून कोणी धजावत नाही. जगातील दहशतवादाला, हिंसाचाराला आळा घालून लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यापेक्षा अमेरिकेने आधी स्वतःच्या घराला सावरण्याची गरज जास्त आहे. नाहीतर दहशतवादी राष्ट्रांच्या यादीत नाव यायला वेळ लागणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT