Latest

सद्भावना यात्रेतून समतेचा संदेश, कोल्हापूरने दाखविली एकजूट;  पुरोगामी ओळख कायम राखण्याचा निर्धार

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापुरात नुकत्याच घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे आयोजित शिव शाहू सद्भावना यात्रेतून रविवारी सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला. या यात्रेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकजुटीचे दर्शन घडवत राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांची कोल्हापूरची ओळख कायम राखण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे सद्भावना यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शाहू समाधी स्थळी शाहू महाराज यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून सद्भावना यात्रेस सुरुवात झाली. महापुरुषांच्या विचारांचा जयघोष, प्रबोधनाची गाणी, हातात भगवे ध्वज, छत्रपती शिवरायांचा जयघोष अशा उत्साही वातावरणात सुरू झालेल्या यात्रेत महात्मा फुले, महाराणी ताराराणी, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा बसवेश्वर, अहिल्याबाई होळकर, साहित्य सम—ाट अण्णाभाऊ साठे यांच्यासह सर्वच महापुरुषांच्या विचारांचा जयघोष करण्यात आला. 'जगात भारी, आम्ही कोल्हापुरी' असा आशय असणार्‍या गांधी टोप्या परिधान करून नेत्यांसह कार्यकर्त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शाहू समाधी स्थळ, सीपीआर चौक, भाऊसिंगजी रोडमार्गे सद्भावना यात्रा शिवाजी चौकात दाखल झाली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास शाहू महाराज यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिवादन केले. राष्ट्रगीत सादर झाल्यानंतर यात्रेचा समारोप झाला.

भरपावसात शाहूप्रेमी सहभागी

दुपारी चार वाजल्यापासूनच शाहू समाधी स्थळी कार्यकर्त्यांची वर्दळ होती. अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. भर पावसातही उपस्थितांनी शाहू समाधी स्थळ परिसर सोडला नाही. यात्रा सुरू असतानाही पाऊस झाला. पावसाची तमा न बाळगता नागरिक यात्रेत सहभागी झाले होते.

शाहिरीने भरला जोश

शाहीर दिलीप सावंत व त्यांच्या सहकार्‍यांनी पुरोगामी आणि प्रबोधनात्मक कवने सादर करून उपस्थितांमध्ये जोश भरला. शाहीर सावंत यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे कोल्हापूर पुरोगामी आहे आणि पुरोगामी राहणारच, असा संदेश शाहिरीतून दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT